'गड आला पण सिंह गेला' ही तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मराठी माणसाला अत्यंत जिव्हाळ्याची वाटतेच; पण शाहीरांनीही तानाजीरावांच्या शौर्याचे, हौतात्म्याचे जे पोवाडे गायले, त्याचे नाद अखिल हिंदुस्थानात निनादत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाच्या निमित्ताने सध्या हा विषय अधिक चर्चेत आहे. काय खरे काय खोटे अशी पृच्छा सतत अनेकजण करत आहेत. इंटरनेटवर, समाजमाध्यमांवरही याविषयावर फारशी माहितीही उपलब्ध नाही. मुळ इतिहास व चित्रपट यांच्याशी निगडीत जे विविध प्रश्न विचारले जातात, त्या सर्वांची उत्तरे इथे एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न करत आहे. मराठ्यांच्या इतिहासावर अशाप्रकारचा बिग बजेट चित्रपट बनावा, ही गोष्टच मुळात सुखावणारी आहे. वेगवान कथानक, स्पेशल इफेक्ट्स यामुळे चित्रपट खरंच नेत्रदिपक झाला आहे. तेव्हा आधी चित्रपट बघा, मगच या लेखाकडे वळा ! इतिहासातील एखादी घटना खरी किंवा खोटी कशी ठरवली जाते ? भुतकाळात काही शतके आधी घडून गेलेली गोष्ट जशीच्या तशी जाणून घेणे जवळजवळ अशक्य आहे. पण मग आपण आपल्याला वाटतील तसे तर्क करावेत, मनाला वाटतील तसे कल्पनेचे इमले बांधावेत असा न...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।