'गड आला पण सिंह गेला' ही तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मराठी माणसाला अत्यंत जिव्हाळ्याची वाटतेच; पण शाहीरांनीही तानाजीरावांच्या शौर्याचे, हौतात्म्याचे जे पोवाडे गायले, त्याचे नाद अखिल हिंदुस्थानात निनादत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाच्या निमित्ताने सध्या हा विषय अधिक चर्चेत आहे. काय खरे काय खोटे अशी पृच्छा सतत अनेकजण करत आहेत. इंटरनेटवर, समाजमाध्यमांवरही याविषयावर फारशी माहितीही उपलब्ध नाही. मुळ इतिहास व चित्रपट यांच्याशी निगडीत जे विविध प्रश्न विचारले जातात, त्या सर्वांची उत्तरे इथे एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न करत आहे. मराठ्यांच्या इतिहासावर अशाप्रकारचा बिग बजेट चित्रपट बनावा, ही गोष्टच मुळात सुखावणारी आहे. वेगवान कथानक, स्पेशल इफेक्ट्स यामुळे चित्रपट खरंच नेत्रदिपक झाला आहे. तेव्हा आधी चित्रपट बघा, मगच या लेखाकडे वळा !
इतिहासातील एखादी घटना खरी किंवा खोटी कशी ठरवली जाते ?
भुतकाळात काही शतके आधी घडून गेलेली गोष्ट जशीच्या तशी जाणून घेणे जवळजवळ अशक्य आहे. पण मग आपण आपल्याला वाटतील तसे तर्क करावेत, मनाला वाटतील तसे कल्पनेचे इमले बांधावेत असा नसतं. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आपण ऐतिहासिक सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ शकतो.
पुरावे म्हणजे काय ? इतिहास जाणून घेण्याची साधने कोणती ?
प्रामुख्याने इतिहासातील व्यक्तींनी स्वतः लिहिलेली पत्रे, घडवलेले शिलालेख, ताम्रपट, नाणी इ. साधने सर्वात विश्वसनीय असतात. यासोबतंच त्याकाळी लिहिलेल्या शकावल्या, करिने, समकालीन व्यक्तींनी केलेल्या नोंदी यातूनही इतिहास जाणून घेता येतो. यानंतर काही नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या बखरी, पोवाडे यातूनही इतिहास समजतो, पण अशी साधने डोळसपणे तपासून घ्यावी लागतात. पत्रेही अस्सल की बनावट हे ओळखण्याचीही एक शास्त्रीय पद्धत असते. अशा पुराव्यांवर जो आधारलेला असतो, तोच खरा इतिहास अन्यथा त्यास निराधार म्हणावे लागेल.
एक गोष्ट कायम लक्षात असू द्या; कोणत्याही चित्रपट, मालिका, कथा, कादंबऱ्या यात सांगितलेल्या गोष्टीला वर सांगितल्याप्रमाणे जर काही पुरावा असेल, तरंच ती सत्य मानू शकतो. खरोखर आपण इतिहासप्रेमी असाल, तर नव्याने समजलेल्या इतिहासातील प्रत्येक गोष्टीकडे, अगदी या लेखाकडेही आधी संशयाने बघण्यास शिका, उपलब्ध पुरावे पडताळून घ्या, मगच त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवा. आपल्यासमोर कोणीही कुठल्याही प्रकारचा खरा इतिहास सांगत असल्याचा दावा करत असेल, तर त्याच्याकडे पुरावे मागत चला.अधिक माहितीसाठी वाचा -
१. श्री राजा शिवछत्रपती भाग २ - गजानन मेहेंदळे
२. ऐतिहासिक प्रस्तावना - वि. का. राजवाडे
३. साधनचिकित्सा - वा. सी. बेंद्रे
'तान्हाजी' चित्रपटाशी निगडीत इतिहास कोणत्या प्राथमिक साधनांतून जाणून घेता येईल ?
या घटनेबद्दलची माहिती प्राथमिक साधनांत फार कमी आहे. या घटनेबद्दलची जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचे एकमेव विश्वसनीय साधन म्हणजे सभासद बखर! कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांना समकालीन होता. त्याने राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहायला घेतलेले हे शिवचरित्र इ. स. १६९७ साली लिहून पूर्ण झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सतरा वर्षांनी शिवचरित्र लिहून पूर्ण झाले आहे. ते 'सभासद बखर' म्हणून ओळखले जाते. त्यात कालक्रमाची काही प्रमाणात मोडतोड झालेली असली, तरी शिवचरित्रविषयक उपलब्ध बखरींपैकी ही सर्वात विश्वसनीय बखर आहे. या शिवाय शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ, शूर सरदार कान्होजी जेधे यांच्या घराण्यातील कागदपत्रांपैकी शकावली 'जेधे शकावली' म्हणून ओळखली जाते. त्यात व शिवापूर घराण्याच्या शकावलीत या घटनेचा ओझरता उल्लेख आहे.
या बखरीतून काय माहिती मिळते ?
सभासद बखरीत या घटनेचे केलेले संपूर्ण वर्णन सोप्या मराठी भाषेत पुढीलप्रमाणे -
सभासद बखरीत या घटनेचे केलेले संपूर्ण वर्णन सोप्या मराठी भाषेत पुढीलप्रमाणे -
पुढे सत्तावीस किल्ले (तहानुसार) मोगलांना दिले होते, ते परत घ्यावेत असा निश्चय केला. मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजमदार, अण्णाजीपंत सुरनीस यांना महाराजांनी सांगितले, "तुम्ही (शक्य ते) प्रयत्न करून, राजकारण करून किल्ले घ्या !" मावळ्यांना म्हणाले "गड घेणे !"
त्यावरून तानाजी मालुसरे म्हणून हजार मावळ्यांचा होता. (तानाजींच्या हाताखाली एक हजार मावळ्यांचे पायदळ होते). त्याने कबूल केले की, 'कोंढाणा गड आपण घेतो." असे म्हणून (मानाची) वस्त्रे, विडे घेऊन गड घेण्यासाठी ५०० मावळे घेऊन गडाखाली गेला. दोन मावळे रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. जैसे वानर चढून जातात, त्याप्रमाणे कड्यावर चढून गेले आणि कडा चढून, गडावर जाऊन , तेथून माळ (दोराची शिडी) लावून इतर लोक व तानाजी मिळून ३०० लोक गडावर चढून गेले. गडावर उदयभान रजपूत होता. त्याला कळले की, शत्रुची माणसे आली. ही बातमी कळल्यावर (गडावरचे) सगळे रजपूत तयार होऊन हाती तोडा बार (बंदुकीची दारू), मशाल घेऊन, चंद्रज्योती लावून, तोफची, तिरंदाज, बरचीवाले, पट्टा चालवणारे (पटाईत) अशी शत्रुपक्षाची बाराशे माणसं लहान तलवारी, ढाल चढवून (मराठ्यांवर) चालून आले. तेव्हा मावळेही 'श्रीमहादेव' असे स्मरण करून रजपूतांवर चालून गेले. एक प्रहर मोठे युद्ध झाले. पाचशे रजपूत ठार झाले, चाळीस-पन्नास मावळेही पडले. उदेभान (उदयभान) किल्लेदार व तानाजी मालुसरे यांची एकमेकांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एकावर एक पडले. वार करत चालले. तानाजीच्या डाव्या हातातली ढाल तुटली. दुसरी ढाल वेळेवर हातात मिळाली नाही. मग तानाजीने आपल्या डाव्या हाताची ढाल करून त्यावर शत्रुचे वार झेलेले, दोघेही महारागांस पेटले. एकमेकांचे घाव वर्मी बसून दोघेही पडले आणि ठार झाले. मग सुर्याजी मालुसरे, तानाजीचा भाऊ, याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरलेले रजपूत मारले. कित्येक रजपूत कड्यावरून कोसळून मेले. अशी बाराशे माणसं मारली, किल्ला काबीज केला आणि गडावर पागेचे खण होते, त्यास आग लावली. त्याचा उजेड महाराजांनी राजगडावरून पाहिला आणि बोलले "गड घेतला. फत्ते झाली."
जासूद दुसऱ्या दिवशी बातमी घेऊन आला की, 'तानाजी मालुसरेनी मोठे शौर्य गाजवले. उदेभान किल्लेदारास मारिले आणि तानाजी मालुसरेही पडला (मृत्यू पावला). गड फत्ते केला.' असे सांगताच राजे म्हणाले, "एक गड घेतला, परंतु एक गड गेला !" महाराजांना फार दुःख झाले. पुढे गडावर ठाणे केले, सुर्याजी मालुसरेचा सत्कार करून तानाजीचा सुभा सुर्याजीस दिला. धारकऱ्यांना सोन्याची कडी बक्षिस दिली. पुष्कळ धन आणि जरीची वस्त्रे दिली. अशाप्रकारे प्रथम कोंढाणा घेतला.
तानाजींच्या कोंढाणा स्वारीची आणि त्यांच्या हौतात्म्याची ही एवढीच माहिती आज उपलब्ध आहे. याव्यतिरीक्त पोवाडा, चित्रपट, कादंबरी अशा कोणत्याही लोकसाहित्यातील माहितीवर विश्वास ठेवता येत नाही, कारण त्यांस पडताळून पाहण्यासारखे पुरावेच नाहीत. ज्या आहेत, त्या सांगीवांगीच्या गोष्टी. दुर्दैवाने समाजावर त्यांचाच पगडा अधिक आहे.
तुळशीदासाने लिहिलेला पोवाडा कितपत विश्वसनीय आहे ?
तुळशीदास नावाच्या शाहीराने एक दीर्घ पोवाडा तानाजींवर लिहिला आहे. परंतू तो अगदी अलीकडचा, म्हणजे इंग्रजांचे राज्य येथे नुकतेच आले होते, त्यासुमारास लिहिलेला आहे. तोपर्यंत तानाजींचा मृत्यू होऊन जवळपास दोनशे वर्ष झाली होती. इतक्या काळानंतर त्या शाहीराला सत्य कुठून ठाऊक असणार ? ऐतिहासिकदृष्ट्या त्या पोवाड्यात चूका आहेतच, मुळ कथा सांगताना शाहीराने आपल्या पदरचा पुष्कळ मिठमसाला वापरला आहे.
या पोवाड्यात शाहीराने पुढील काही गोष्टी आपल्या कल्पनेने सांगितलेल्या आहेत, ज्याला कोणताही पुरावा नाही. -
१. तानाजींचा मुलगा रायबा याचं लग्न ठरलेलं असतं आणि 'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' असं म्हणून तानाजी मोहीमेवर जातात.
२. तानाजी गोंधळ्याचा वेष घेऊन किल्ल्याचे पहारेकरी (मेटेकरी) 'नाईक' यांस फितवतात.
३. तानाजी घोरपड लावून गड चढतात.
४. तानाजी मृत्यूमुखी पडल्यावर शेलारमामा उदयभानला ठार करतात.
तुळशीदासाने भरपूर काल्पनिक घटना रंगवल्या आहेत. त्यापैकी वरील चार घटना विशेष प्रसिद्ध आहेत, परंतू या चारही घटनांस कोणताही पुरावा नाही हे कृपया वाचकांनी पुन्हा एकदा लक्षात घ्यावे.
अधिक माहितीसाठी वाचा -
१. श्री राजा शिवछत्रपती भाग १- गजानन मेहेंदळे (पृ. क्र. ६०)
२. ऐतिहासिक पोवाडे - य. न. केळकर (पृ. क्र. ७०-९१)
'गड आला पण सिंह गेला' या कथेबद्दल माहिती द्या.
'गड आला पण सिंह गेला' ही हरी नारायण आपटे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीची पहिली आवृत्ती १९०४साली आली होती. ही कादंबरी बरीचशी वरील पोवाड्यावरंच आधारलेली आहे. त्यामुळे जी गत पोवाड्याची तिच गत कादंबरीची झाली आहे. मुळ घटना घडून गेल्यानंतर इतक्या वर्षांनी सत्य कुठून ठाऊक असणार ? आपटेंनीही बरीचशी कथा आपल्या मनानेच लिहिली आहे.
तानाजींच्या शौर्याची आठवण म्हणून महाराजांनी कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' ठेवलं, असं कादंबरीत लिहिलं आहे, हे पुर्णतः खोटे आहे. तानाजींनी कोंढाणा सर केला ४ फेब्रुवारी १६७० रोजी, त्यापुर्वीच्या पत्रांमध्ये 'सिंहगड' हा उल्लेख सापडतो. यावरून या किल्ल्याचे नाव आधीपासूनच सिंहगड होते, हे लक्षात येते. उदाहरणार्थ इथे इ.स. १६६३चे (सदर घटनेच्या सात वर्षे आधीचे) एक पत्र दाखवत आहे. सदर पत्र कोल्हापूर पुरालेखागारात उपलब्ध असून, त्याचे छायाचित्र 'शिवछत्रपतींची पत्रे खंड २' या पुस्तकात पत्र क्र. १५ असे दिलेले आहे. या पत्रात 'सिंहगड' असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र एकूणंच लोकांमध्ये हा गैरसमज इतका रुढ आहे, की अगदी यदूनाथ सरकारांसारख्या साक्षेपी इतिहासकारानेही कोंढाण्याचे नाव तानाजींच्या हौतात्म्यानंतर 'सिंहगड' ठेवले गेले असे लिहिले आहे.
उदयभानचे एका 'कमलकुमारी'नावाच्या विधवेवर प्रेम होते, असे उपकथानक आपटेंनी आपल्या कादंबरीत रंगवले आहे. हे कथानक 'तान्हाजी' चित्रपटातही दाखवले गेले. त्याभोवती आणखी कल्पनेचे दोरे गुंडाळून तानाजी गुप्तपणे कोंढाण्यावर येतात, पकडले जातात, तरी याच कमलचा भाऊ तानाजींची सुटका करतो असा गुंता चित्रपटकर्त्याने केला आहे. या कथानकासही अर्थातच कोणताही पुरावा नाही. पुढे उदयभानच्या कुटुंबाबद्दल माहिती येणारंच आहे.
तसेच सभासद बखर प्रमाण मानली, तर कादंबरीत लिहिल्याप्रमाणे महाराजांचे उद्गार 'गड आला पण सिंह गेला'असे नसून 'एक गड घेतला परंतू एक गड गेला !'असे आहेत, हेसुद्धा लक्षात येते. साहित्यिकांनी सृजनात्मक स्वातंत्र्य घेतल्यावर सत्य कसे झाकले जाते आणि लोकसाहित्याचा समाजावर किती प्रचंड पगडा बसतो, हे यावरून लक्षात येईल !
अधिक माहितीसाठी वाचा -
Shivaji his life and times - G B Mehendale
तानाजी मालुसरेंबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ?
योग्य नाव 'तानाजी' की 'तान्हाजी' ?
लहान बाळांना 'ताना' किंवा 'तान्हा' असे म्हणतात. मुलींना 'तानी' किंवा 'तान्ही' असे म्हणतात. त्यावरूनंच ही नामे पडली आहेत. नावापुढे आदराने 'जी' लावले जाते. ऐतिहासिक बखरी वा कागदपत्रे पाहिली, तर 'तानाजी' आणि 'तान्हाजी' अशी दोन्ही नावे विविध कागदांत आढळून येतील. येथे केवळ उदाहरणार्थ एक पत्र दाखवत आहे, ज्यामध्ये 'तान्हाजी' असा उल्लेख आहे.
असे अनेक कागद सापडतील (उदाहरणार्थ पहा मराठ्यांच्या इतिहासाची साधने ८-१२, १५-३२६, २०-२२इ.). दिल्हे(दिले), कोण्हे(कोण,कोणत्या) असे फर्डे उच्चार त्याकाळात आढळतातच. यात चूक किंवा बरोबर असे काहीही नाही, हे बोलीभाषेतील वैविध्य आहे. 'श्रीशिवभारत' या समकालीन संस्कृत ग्रंथात तानाजी मालुसरेंचे नाव 'तानजित् मल्लसुरः' असे आले आहे.
असे अनेक कागद सापडतील (उदाहरणार्थ पहा मराठ्यांच्या इतिहासाची साधने ८-१२, १५-३२६, २०-२२इ.). दिल्हे(दिले), कोण्हे(कोण,कोणत्या) असे फर्डे उच्चार त्याकाळात आढळतातच. यात चूक किंवा बरोबर असे काहीही नाही, हे बोलीभाषेतील वैविध्य आहे. 'श्रीशिवभारत' या समकालीन संस्कृत ग्रंथात तानाजी मालुसरेंचे नाव 'तानजित् मल्लसुरः' असे आले आहे.
कविंद्र परमानन्दकृत 'श्रीशिवभारत' हे शिवचरित्राचे एक विश्वसनीय साधन आहे. हा ग्रंथ प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्याच दरबारात असणाऱ्या कविंद्र परमानन्द या संस्कृत विद्वानाने महाराज जिवंत असताना लिहिलेला आहे. आजवर उपलब्ध सर्व पुराव्यांच्या कसोटीवर 'श्रीशिवभारत' हा ग्रंथ सर्वाधिक विश्वसनीय ठरतो. तानाजी एक हजाराच्या पायदळाचे नेतृत्व करत असत, असा उल्लेख पूर्वी सभासद बखरीतील वर्णनात येऊन गेला आहे. शिवभारतानुसारही तानाजी मालुसरेंच्या हाताखाली हजार मावळ्यांचे पायदळ होते असे लक्षात येते. तानाजी मालुसरे सुरुवातीपासूनच महाराजांच्या चाकरीत होते. अफजलखानवधाच्या वेळेस महाराजांच्या ज्या योद्ध्यांनी खानाच्या सैन्याचा जावळीच्या अरण्यात पाडाव केला, तानाजी मालुसरे हे त्या योद्ध्यांपैकीच एक! १६६१साली उंबरखिंडीत कारतलबखानाचा पाडाव केल्यानंतर शिवाजी महाराज दक्षिण कोकणात गेले, त्यावेळेसही संगमेश्वरास महाराजांनी तानाजी मालुसरे यांस धाडले होते. पुढे जेव्हा सुर्यराव सुर्वेंनी संगमेश्वरात मराठ्यांवर अचानक हल्ला केला, त्यावेळेस महाराजांच्या सैन्यातील पिलाजी निळकंठराव घाबरून पळून जाऊ लागले. तेव्हा तानाजींनी त्यांचा धिक्कार केला आणि पिलाजींना एका दगडाला बांधून ठेवले. त्यादिवशी तानाजींनी युद्धात मोठे शौर्य गाजवले आणि शत्रुचा पूर्णपणे पराभव केला.
तानाजी मालुसरे हे 'उमरठे' गावचे. याव्यतिरीक्त तानाजींच्या भुतकाळाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. चित्रपटात जे काही दाखवले आहे, ते काल्पनिकंच म्हणावे लागेल; पण संगमेश्वर व कोंढाणा या दोन्हीही मोहिमा पाहता तानाजी मोठे हिमतीचे आणि शूर होते हेच त्यांच्या कृतीवरून दिसते. संगमेश्वराच्या मोहीमेत 'तानाजीच्या तेजाने त्या रात्री सूर्य उत्पन्न झाला' असे वर्णन शिवभारतात केले आहे. यावरून त्यांच्या शौर्याची कल्पना करावी.
अधिक माहितीसाठी वाचा -
श्रीशिवभारत - संपादक, स. म. दिवेकर. (अध्याय २२,२९,३०)
उदयभान राठोड कोण होता ? त्याच्याबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ?
उदयभान राठोडबद्दल माहिती देणारी प्राथमिक साधने मला मिळाली नाहीत. गो. स. सरदेसाई यांनी 'ऐतिहासिक वंशावळी' या पुस्तकात राठोड घराण्याची वंशावळ दिली आहे. या वंशावळीनुसार उदयभान हा तत्कालीन उच्च कुळातील रजपूत होता. उदयभानचे वडिल शामसिंह हे औरंगजेबाचे सहायक होते. उदयभान यास केसरीसिंह व सुरजमल अशी दोन मुले होती. उदयभानचे वंशज सध्या भिनाय (अजमेर) गावी राहतात. यावरून उदयभान धर्मांतर करून मुस्लिम झाला नव्हता, हे लक्षात येते; तसेच चित्रपटात सत्याचा किती विपर्यास केला आहे हेसुद्धा लक्षात येईल.
इ.स. १६६५साली मिर्झाराजा जयसिंग याने स्वराज्यावर स्वारी केली. पुढे पुरंदरचा तह झाल्यानंतर ऑगस्ट १६६५मध्ये त्याने विजापूरच्या आदिलशहाविरुद्ध मोहीम काढली. या मोहिमेत उदयभान राठोड सहभागी असल्याची माहिती मिळते. यावरून उदयभान राठोड पुर्वीपासूनंच महाराष्ट्रात आला असल्याचं लक्षात येतं. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८, लेखांक २२ या पत्रात उदयभान राठोड हा कोंढाण्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे औरंगजेबाने उदयभानला खास कोंढाण्याला पाठवणं, नाट्यमय पद्धतीने त्याने तानाजींच्या डोळ्यात धूळ फेकून नदीमार्गे कोंढाण्यास पोहोचणं हे चित्रपटाच्या कथालेखकांच्या कल्पनेचे खेळ आहेत.
उदयभानकडे 'नागिन' तोफ होती हे खरे आहे का ?
नाही. चित्रपटातील सर्वात मोठी चूक कोणती असे विचारले, तर मी या तोफेभोवती गुंफलेले कथानक ही सर्वात मोठी चूक आहे असे म्हणेन. एकतर चित्रपटनिर्मात्यांना मध्ययुगीन तोफांविषयी माहिती नसावी किंवा मग चित्रपट अधिक रंजक करण्याच्या हेतूने त्यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला असावा.
मोगल अजस्त्र तोफा बनवत हे खरे आहे, परंतू त्या फारशा प्रभावी नसत. तोफांचा पल्लाही एक-दीड किलोमीटरपेक्षा अधिक नसे. कोंढाणा ते राजगड अंतर या पल्ल्याच्या किमान दहा ते बारा पट आहे. तेव्हा चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तोफेने राजगड उडवण्याचा उदयभानचा जो काही 'मास्टर प्लॅन' दाखवला आहे, तो अक्षरशः हास्यास्पद झालेला आहे.
चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पोशाख पूर्वी मावळे वापरत असत का ?
अजिबात नाही. जॉन ग्रोस नावाच्या एका इंग्रजाने मराठ्यांच्या पोशाखाचं वर्णन केलं आहे. "त्यांच्या (मराठ्यांच्या) कपड्याइतकं खालच्या दर्जाचं आणखी काही असू शकत नाही. डोक्यावर एक जाडसर वस्त्र गुंडाळतात, ज्याला पगडी म्हणतात. जेमतेम नागडेपणा झाकला जाईल, अशा पद्धतीने कमरेभोवती एक लुंगी आणि खांद्यावर एक घोंगडी ठेवतात. तिच जमिनीवर झोपताना वापरतात. हा सामान्य सैनिकाचा वेष असला, तरी यांचे अधिकारीही यापेक्षा फार वेगळे नसतात." याउलट चित्रपटात मावळ्यांचा पोशाख बराच आधुनिक दाखवला आहे. अगदी तानाजींच्या पायात इंग्रजी सैनिकाप्रमाणे बुट दाखवले आहेत.
चित्रपटात घोरपड का दाखवली नाही ?
वर लिहिल्याप्रमाणेच 'घोरपड'लावून चढणे, ही तुळशीदास शाहीराची कल्पना आहे. त्यास कोणताही आधार नाही, त्यामुळे घोरपड दाखवली नाही, हेच योग्य आहे. अलीकडे कोणी 'यशवंत घोरपडे' नामक सरदार तानाजींच्या सोबत होते, असेही म्हणतात; परंतू दुर्दैवाने या विधानासही काहीही पुरावा मिळत नाही.
चित्रपट पहावा, की पाहू नये ? किंवा इतिहासावर आधारित ललित साहित्याचा आनंद घेऊ नये का ?
ललित साहित्याचा आनंद नक्कीच घ्यावा. चित्रपट, कादंबरी, नाटके, पोवाडे यामुळे सामान्य माणसासही इतिहास सुरस वाटतो. त्यामुळे इतिहासाचा जास्तीत जास्त प्रसार होणे शक्य होते. 'तान्हाजी' चित्रपटाच्या निमित्ताने एका शूर मराठ्याची शौर्यगाथा जगभरात पोहोचते आहे, हे काही कमी नव्हे. एक उत्तम कलाकृती म्हणून हा चित्रपट पहायला हवा. परंतू जे आपल्याला दिसते, तेच खरे असा अट्टहास बाळगू नये.
पुराव्यांवर आधारित सत्य इतिहासाचा आग्रह का धरावा ?
पोवाडा, कादंबरी, चित्रपट या माध्यमांतून सत्याचा किती विपर्यास झाला, हे आपण पाहिले. सभासद बखरीतले समकालीन वर्णनंही खोटे वाटेल इतका त्या लोककथांचा पगडा आपल्यावर आहे. इतिहासात अशा अप्रमाण गोष्टी घुसडल्या गेल्या म्हणजे इतिहास अभ्यासामागचा जो मुख्य उद्देश - लोकांना जागृत करणे, प्रबोधन, तो विशुद्ध स्वरूपात होत नाही. इतिहास केवळ एक मिथक आणि इतिहासातील व्यक्ती देव बनून राहतात. सामान्य माणसाला खरे-खोटे काय ते कळेनासे होते आणि इतिहासातील घडून गेलेल्या गोष्टींवर वाद होत राहतात.
शिवचरित्राच्या अभ्यासासाठी कोणती पुस्तकं वाचावीत ?
एखाददुसरे पुस्तक वाचले आणि शिवचरित्र समजले असे होऊ शकत नाही. विविध प्राथमिक साधने व त्यावरील भाष्ये वाचायला हवीत, तरी किमान खालील तीन पुस्तके (शक्यतो दिलेल्या क्रमानेच) वाचायला हवीत.
एखाददुसरे पुस्तक वाचले आणि शिवचरित्र समजले असे होऊ शकत नाही. विविध प्राथमिक साधने व त्यावरील भाष्ये वाचायला हवीत, तरी किमान खालील तीन पुस्तके (शक्यतो दिलेल्या क्रमानेच) वाचायला हवीत.
१. राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
२. शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
३. श्री राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे (किंवा इंग्रजीतून Shivaji his life and times)
अधिक माहितीसाठी मी या विषयावर लिहिलेला सविस्तर लेख वाचू शकता, येथे क्लिक करा - शिवचरित्र कोणते वाचावे ?
अधिक माहितीसाठी मी या विषयावर लिहिलेला सविस्तर लेख वाचू शकता, येथे क्लिक करा - शिवचरित्र कोणते वाचावे ?
चित्रपट पाहून, लोकांमध्ये इतिहासाविषयी कुतूहल, आस्था निर्माण होत आहे, ही चांगली गोष्ट आहे; परंतू त्यापाठी डोळस अभ्यास असावा. अंधभक्त होऊ नये, अन्यथा आपले इतिहासपुरुष हे केवळ मिथक बनून राहतील.
धन्यवाद !
डॉ. सागर पाध्ये.
संदर्भग्रंथ -
१. ऐतिहासिक पोवाडे - य. न. केळकर, डायमंड पब्लिकेशन्स, २००८.
२. सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिवछत्रपतींचे चरित्र) - संपादक, र. वि. हेरवाडकर, २०१४.
३. कवीन्द्र परमानन्दकृत श्रीशिवभारत - संपादक, स. म. दिवेकर, मेर्वन टेक्नोलॉजी, २०१८.
४. शिवछत्रपतींची पत्रे खंड १ व २ - डॉ. अनुराधा कुलकर्णी.
५. राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन, २०१०.
६. श्री राजा शिवछत्रपती - ग. भा. मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स, २००८.
७. मराठ्यांच्या इतिहासाची साधने (राजवाडे खंड १५,१८ - वि. का. राजवाडे)
८. शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर, २०१९.
९. गड आला पण सिंह गेला - हरी नारायण आपटे, वरदा प्रकाशन, २००८.
10. Historical Genealogies - G S Sardesai.
11. Shivaji his life and times - G B Mehendale.
संदर्भग्रंथ -
१. ऐतिहासिक पोवाडे - य. न. केळकर, डायमंड पब्लिकेशन्स, २००८.
२. सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिवछत्रपतींचे चरित्र) - संपादक, र. वि. हेरवाडकर, २०१४.
३. कवीन्द्र परमानन्दकृत श्रीशिवभारत - संपादक, स. म. दिवेकर, मेर्वन टेक्नोलॉजी, २०१८.
४. शिवछत्रपतींची पत्रे खंड १ व २ - डॉ. अनुराधा कुलकर्णी.
५. राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन, २०१०.
६. श्री राजा शिवछत्रपती - ग. भा. मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स, २००८.
७. मराठ्यांच्या इतिहासाची साधने (राजवाडे खंड १५,१८ - वि. का. राजवाडे)
८. शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर, २०१९.
९. गड आला पण सिंह गेला - हरी नारायण आपटे, वरदा प्रकाशन, २००८.
10. Historical Genealogies - G S Sardesai.
11. Shivaji his life and times - G B Mehendale.
Good one Sir !!
ReplyDeleteThanks a lot !
DeleteThanks a lot !
ReplyDeleteखूपच छान लेख
ReplyDeleteखूप नवीन माहिती मिळाली सर
संकेतजी, मन:पूर्वक धन्यवाद !
Deleteजबरदस्त माहिती....
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteखूप छान लेख!
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteडॉ सागर पाध्ये, आपले सिनेमाचे विश्लेषण वाचले.
ReplyDeleteह्या लढ्याला आजचे मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या विशाळगडाच्या मोहिमेची मांडणी कशी केली व तानाजी मालुसरे यांनी ती कशी पार पाडली यावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले आहे.
आपला ईमेल आयडी कळवावा. तो सहा भागात आहे.
विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049. Shashioak@gmail.com
Great सर
Deleteआम्हाला ही पाहायला मिळेल का
नमस्कार सर, आपण मला sagarpadhye12@gmail.com या आयडीवर मेल करू शकता.
Deleteतहात २३ किल्ले दिले होते की २७ ? विकी आणि बर्याच ठिकाणी २३ हाच आकडा आहे .
ReplyDeleteसंकेतजी नमस्कार !
Deleteसभासद बखरीत आकडा 'सत्तावीस' दिला आहे, म्हणून लेखात तो तसाच्या तसा दिला आहे.मिर्झाराजा जयसिंगचा पत्रव्यवहार 'इन्शा-इ-हफ्त-अंजुमन' असा प्रसिद्ध आहे. यातील काही पत्रांचं यदुनाथ सरकार यांनी 'House of Shivaji' या पुस्तकात भाषांतर दिलं आहे. या पत्रानुसार 'तेवीस' किल्ले दिले होते. ते किल्ले असे असावेत -
पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, पळसखोल, रूपगड, बख्तगड, मोरबखन, माणिकगड, सरूपगड, साकरगड, मरकगड, अंकोला, सोनगड व माणगड.
याशिवाय 'आलमगिरनामा' या ग्रंथातही तेवीस किल्ल्यांचाच उल्लेख आहे; पण काही किल्ल्यांची नावं वेगळी दिली आहेत. या ग्रंथाचं भाषांतर अजून झालेलं नाही. अधिक माहितीसाठी गजानन मेहेंदळे लिखित Shivaji his Life and Times हे पुस्तक पहावे.
आपल्या प्रतिक्रियेत आपण विकीपिडीयाचा उल्लेख केला आहे, पण विकीपिडीया इतिहास अभ्यासासाठी विश्वासार्ह नाही.
फारच अप्रतिम विश्लेषण. फेसबुकवर शेअर करु शकतो ना??
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteऋषिकेशजी, धन्यवाद !
Deleteलेख जरूर शेअर करा.. लिंक देत आहे
https://sagarpadhye.blogspot.com/2020/01/blog-post_68.html?m=1
खूप छान लेख... इतिहासाबद्दल माहिती कशी तपासावी, हे खूपच योग्य वाटले.
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteदिपकजी व महेशजी, मन:पूर्वक धन्यवाद !
ReplyDeleteKaddddk
ReplyDeleteदादा खूप छान माहिती. तुमचं लेखन ही खूप छान आहे. अतिशय सोप्या भाषेत आणि कमीतकमी शब्द वापरून पुराव्यानिशी मांडता हे खूपच भावत.
ReplyDeleteजय शिवराय