छत्रपती संभाजी महाराज,हा तमाम मराठी बांधवांच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे.स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीचं चरित्र तेजस्वी तरीही दुर्दैवीच म्हणावं लागेल.
शंभूराजांच्या चरित्रात नाट्यमय घटना आहेत,हेवेदावे आहेत,बेफिकीर शौर्याचे लखलखते कल्लोळ आहेत,सुखाच्या श्रावणसरी आहेत आणि दुःखाचे काळेकुट्ट मळभही आहे.अशा चरित्राने नाटककार,कादंबरीकारांना भुरळ घातली नसती,तर नवलंच !
इतकेच कशाला मी स्वतः इतिहासाकडे वळलो,तो लहान वयातच शिवाजी सावंताचे 'छावा' वाचून जे प्रश्न पडले,त्याची उत्तरे शोधण्याच्या नादातुनंच !
बखरकारांपासून ते आजकालच्या स्वयंघोषित इतिहासकारांपर्यंत आजवर 'संभाजी' या ऐतिहासिक पात्रावर पुष्कळ लोकांनी लिहिले आहे.ज्याने-त्याने आपापल्या कुवतीनुसार,अपेक्षांनुसार स्वतःला हवे तसे संभाजीराजे रंगवले. यातून संभाजीराजांची तीन प्रकारची व्यक्तीमत्वे प्रामुख्याने रंगवलेली दिसतील.एक, जुन्या बखरकारांनी रंगवलेले हट्टी,दुराग्रही,कोपिष्ट,व्यसनी,बदफैली,नाकर्ते संभाजीराजे;अखेरच्या क्षणी फिल्मी स्टाईलने त्यांना आपली चुक उमगली आणि देशधर्मासाठी अजोड असे बलिदान त्यांनी दिले.गेल्या कित्येक वर्षाच्या संशोधनातून आज हे व्यक्तीमत्व पूर्णतः बाद ठरवले गेले आहे.कै. वा.सी. बेन्द्रे यांनी सुमारे बेचाळीस वर्षे अभ्यास करून लिहिलेल्या चरित्रातून आपल्या कर्तृत्वान वडिलांच्या तालमीत तयार झालेले,दिर्घसुत्री,शूर,दूरदृष्टी असलेले,परंतू नालायक आणि स्वार्थी वृत्तीच्या मंत्र्यांमुळे विनाकरण बदनाम झालेले संभाजीराजे सर्वप्रथम अभ्यासकांच्या समोर ठेवले.यातून शंभूचरित्राविषयी जी प्रचंड उत्सुकतेची,आदराची नी सहानुभूतीची लाट आली ती आजवर कायम आहे. यातूनच पुढे दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारची व्यक्तीमत्वे तयार झाली.दुसऱ्या प्रकारात नाकर्ते आणि लोभी मंत्री,सोयराबाईंचे स्वार्थी राजकारण आणि तारूण्यात चुका करणारे हळवे संभाजी आणि मग छत्रपतीपदाचा भार समर्थपणे संभाळून औरंगजेबाला हतबल करून सोडणारे संभाजीराजे येतात.तिसऱ्या प्रकारात मंत्री आणि सोयराबाई चुकीचे वागतातंच,पण संभाजीराजांकडून एकही चुक घडली नाही.त्यांचे दिलेरखानाला जाऊन मिळणं हे शिवरायांचेच राजकारण,मंत्री मात्र अतिशय स्वार्थी,नीच आणि कपटी आणि शंभूराजे शंभर-सव्वाशे लढाया लढून अजिंक्य ! (चौथा प्रकार हातात बाटली,छातीत दुराभिमान आणि टाचेत मेंदू असलेल्यांनी निर्माण केला आहे; २०० किलो वजनाचे,७० भाक-या खाणारे,६५ किलोची तलवार उचलून ४०० लढाया लढून अजिंक्य राहणारे पुर्णतः काल्पनिक 'सुपरमॅन संभाजीराजे' !! असो,या प्रकाराकडे बिलकूल लक्ष देण्याची गरज नाही.)
[छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र - ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे ] -
साहित्यिकांनी सोयीप्रमाणे हवे ते संभाजीराजांचे व्यक्तीमत्व उचलले.हवे तसे रंगवले.त्यात हव्या त्या थापा सहज रंगवल्या.यातून या व्यक्तीमत्वांना विविध रंगछटा येत राहिल्या.
प्रत्यक्ष पुराव्यांचा,विश्वसनीय संदर्भ साधनांचा अभ्यास केला,तर जे दिसते;त्याचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न.यात पुराव्यांनिशी मी काही विवेचन करणार नाही,तेवढी माझी कुवतही नाही,हे मी जाणतो.रक्ताचे पाणी करून,त्यागाने वर्षानुवर्षे काटेकोरपणे अभ्यास करून आजवर इतिहासकारांनी शंभूचरित्र लिहिले आहे.इच्छुकांनी अशी चरित्रेच अभ्यासावीत.मी इथे फक्त ठराविक कादंबऱ्यांतून शंभूराजांबद्दल मांडल्या गेलेल्या गोष्टींबद्दल थोडक्यात काही चर्चा करणार आहे. त्याबाबतीतला निर्णय वाचकांनीच घ्यायचा आहे.
यामध्ये प्रामुख्याने तीन कादंबऱ्यांचा विचार आपण करणार आहोत, शिवाजी सावंत लिखित 'छावा',अनंत तिबिले लिखित 'शापित राजहंस' आणि विश्वास पाटील लिखित 'संभाजी'.
संभाजीराजांच्या कारकिर्दीचा विचार करताना साधारणतः युवराज संभाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे असा दोन भागांत विचार करता येईल.
'युवराज संभाजीराजे' रंगवताना कादंबरीकारांना सामान्यतः पुढील मुद्द्यांवर भाष्य करायचे होते.
१.युवराज शंभूराजांचे कर्तृत्व
२.गृहकलह आणि मंत्र्यांशी बेबनाव
३.शंभूराजांचे परस्त्रियांशी वर्तन
४.शंभूराजे व्यसनाधीन होते अगर नव्हते.
५.शंभूराजांचे दिलेरखानास जाऊन मिळणे.
वाचकांनी एक गोष्ट कायम ध्यानी ठेवायला हवी,की ऐतिहासिक कादंबरी आणि सप्रमाण लिहिलेले चरित्र यात बराच फरक असतो. थोडाबहुत अभिनीवेषाचा दोष कादंबरीकाराच्या माथी बसतोच.ही बाब खरं तर वाचकांनी ध्यानात घेतली पाहिजे.आपल्याला कादंबरीत आवडलं तेच सत्य हा हेका ठेऊ नये.
युवराज म्हणून शंभूराजांच्या कर्तृत्वाची सुरूवात शिवराज्याभिषेकाच्या थोडी आधीच झाली आहे.शके १५९२ माघ वद्य येकादसीस संभाजीराजे यास कारभार सांगितला.(शिवापुर दप्तरातील यादी;ज्यु.कॅ.२६ जानेवारी १६७१) ते इंग्रजांच्या वकिलांची भेट घेत होते,निवाडे करत होते;यामध्ये त्यांच्या कारभारावर सर्व संतुष्ट असल्याचेच दिसते.नायक म्हणून 'संभाजीराजे' रंगवताना कादंबरीकारांची इथुन पुढे कसोटी लागते.संभाजीराजे मद्यपान करत होते,असे उल्लेख सर्व समकालीन आणि उत्तरकालीन कागदपत्रांत दिसतात.
Sambhaji was intoxicated with the wine of folly and pride' अशा ग्रॅन्ट डफने केलेल्या इंग्रजी उल्लेखातून 'वाईन' शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यास पुढे विपर्यस्त स्वरूप आले,वगैरे भलावण करणे शतमुर्खपणाचे लक्षण आहे.ग्रॅन्ट डफने असा उल्लेख केलेला असो वा नसो;निकोलाओ मनुची व फ्रान्सिस मार्टीन हे समकालीन प्रवासी,सभासदाची व चिटणीसाची या उत्तरकालीन परंतु ग्रॅन्ट डफ पुर्वीच्या बखरी शंभुराजांच्या मद्यपानाचा उल्लेख करतातच.शंभूराजे युवराज असताना 'टाॅमस निकल्स' किंवा पुढे छत्रपती झाल्यावर 'हेन्री स्मिथ', 'कॅप्टन गॅरी' हे काही काळ रायगडावरंच राहिले होते,शंभूराजांना प्रत्यक्ष भेटले होते;पण या इंग्रजांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रातून शंभूराजे 'सदैव नशेत असतात' किंवा 'पुर्णतः व्यसनाधीन आहेत' असा कुठलाही उल्लेख नाही.वैयक्तीक जीवन विलासी असलं तरी व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला त्यामुळे बाधा येत नाही हे पहावं.स्वतः बाजीराव पेशवेही मद्यमांस भक्षण करत असत,त्याचा कर्तृत्वावर परिणाम नाही.नऊ वर्षे युद्धमय जीवन जगणारी,त्याच वेळी प्रजाहितदक्ष,धर्मकार्याप्रतीजागृत व्यक्ती उपभोगवादी,चंगळवादी असणे शक्य नाही.
कादंबरीकारांना हे दिसतं,मग ते शंभूराजांच्या वैयक्तीक जीवनाला कधी दुःखाचे,तर कधी कल्पनेचे पदर जोडत,एक एक मुद्दा सौम्यपणे पुढे आणतात.उत्तरकालीन बखरी,परमानन्दकाव्य(यात भरपूर अतिशयोक्ती आहे) आणि शंभूराजांचे दानपत्र यातून सोयराबाईंच्या मनात सापत्न भाव होता,असे दिसते.यातून लगेचच सोयराबाईने आपल्या स्वार्थासाठी काही अक्षम्य दुर्वर्तन केले या निष्कर्षाप्रती धावण्याची घाई करण्याची गरज नाही. असा निष्कर्ष काढण्यास एकही विश्वासार्ह पुरावा नाही.
ज्या घराण्यात हंबीरराव,महाराणी ताराबाई अशी कर्तृत्ववान माणसे जन्माला आली,त्याच घराण्यात जन्मलेल्या सोयराबाई या शिवछत्रपतींच्या अभिषिक्त पट्टराणी होत्या,हे लक्षात घ्यायला हवे.कादंबरीकार मात्र लगेच सोयराबाईस स्वार्थी,कपटी,कारस्थानी आणि सर्व कलहाची व कारस्थानांची मुळ सुत्रधार ठरवून मोकळे होतात,कारण कादंबरीतून लेखकाला कथा पूर्ण करून लिहायची असते.मग जमलं तर पुरावे नाहीतर त्यातील गाळलेल्या जागा भरण्यासाठी तर्काचा व कल्पनेचा आधार घ्यावा लागतो.मग कधी यासाठी बखरींतून सोयीस्कर भाग उचलला जातो.
हे बंधन चरित्रकारांवर नाही.ते निष्पक्षपणे फक्त पुरावे काय म्हणतात,ते सांगून पुढे जाऊ शकतात;जिथे पुरावा नाही तिथे विश्वसनीय पुरावा नाही असे सांगू शकतात.कादंबरीकारांचे तसे नसते;परंतु हा दोष कादंबरीकारांचा नाही,एकदा काय ते कादंबरीत सोयीस्कर उल्लेख वाचले,की मग तोच तेवढा सत्य इतिहास असे मानून चालणा-या अतिशहाण्यांचा हा दोष आहे.
तिच गोष्ट मंत्र्यांच्या बाबतीतही दिसते.बहुतेक सर्व कादंबरीकार मंत्र्यांच्या माथी दोष मारतात.आधार परमानन्दकाव्याचा घेतात.काही काही ठिकाणी कादंबरीकारांनी आपापल्या पद्धतीने परमानन्दकाव्याचा मराठी अनुवादच लिहीला आहे,असे वाटते.परमानन्दकाव्य पक्षपाती आहे;पण मंत्र्यांकडे बोटे दाखवताना,तिच बोटे मंत्र्यांच्या कार्यकर्तृत्वाला दिशा देणाऱ्या ,त्यांच्या कुवतीनुसार त्यांस अधिकार देणाऱ्या ,त्यांचा गौरव करणाऱ्या शिवछत्रपतींकडेही वळतात हे कोणाच्या ध्यानात येत नाही.'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो' म्हणणारे शिवछत्रपती स्वार्थी आणि लाचखोर मंत्र्यांचे अपराध पोटात का घालतील ?
कादंबरीकार आधी या घटनांमधील नाट्य रंगवतात.मग दुखावले गेलेले,कष्टी झालेले संभाजीराजे सावकाश शाक्तपंथापर्यंत आणून मद्याचा प्याला त्यांच्या तोंडाला लावतात.अनंत तिबिले यामध्ये अजून एक मुद्दा मांडतात.संभाजीराजे लहान वयात मोगलांच्या संगतीत आल्याने विलासी जीवनाकडे ओढले गेले असे तिबिलेंचे म्हणणे आहे.त्यात ते संभाजीराजांना रामसिंग आणि शहाजादा मोअज्जम यांनी मदिरापान करायला लावल्याचे वर्णन करतात.मुळात या दोन्ही गोष्टी निराधार आहेत.दोन्ही वेळेस शंभूराजांचे वय नऊ ते दहा वर्षांचे आहे.हे वय विषयासक्त होण्याचे आहे का ?
शंभूराजे-मोअज्जम भेट झाली,त्यावेळेस मोअज्जम शंभूराजांच्या दुप्पट वयाचा होता.अॅब कॅरे म्हणतो तशी घनिष्ट मैत्री त्यांच्यात संभवत नाही.ती राजकीय स्वरूपाची असू शकेल.शंभूराजे मोगल छावणीतही फार काळ थांबलेले नाहीत.'जेधे शकावली' व 'तारीखे दिल्कुशा' नुसार ते मोगल छावणीतून दोन महिन्यांतच राजगडावर परतले आहेत.( ९ ऑक्टो. १६६७ ते ५ नोव्हे. १६६७ ).
त्यामुळे अनंत तिबिले यांच्या तर्काशी सहमत होता येत नाही.
पोरकेपणाचे दुःख शंभूराजांच्या वाट्याला आले असे सांगणाऱ्याना स्वतः शिवाजीमहाराजांना पित्याचा सहवास कितपत घडला होता,हे लक्षात येत नाही.जडणघडणीच्या पहिल्या सतरा वर्षांत प्रत्यक्ष जिजाऊसाहेबांनीच शंभूराजांचा सांभाळ केला हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.१६७१ पर्यंत शंभूराजेच भोसले कुटूंबातील एकमेव पुत्र होते,त्यांच्या वाट्यास सख्खी आई नसल्याची बोचरी जाणीव असेल;पण कादंबरीकार रंगवतात तसे पोरकेपणाचे व एकटेपणाचे कितीसे दुःख वाट्याला आले असेल ?
१७ जानेवारी १६७६ च्या पत्रातून मुंबईकर इंग्रज सुरतकरांना संभाजीराजांनी शिवरायांवर विषप्रयोग केल्याचे सांगतात,याशिवाय संभाजीराजांनी शिवरायांच्या एका मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचे सांगतात.(E.R.S.॥-139).शिवाजी महाराज या काळात बरेच आजारी होते,हे खरं आहे;विषप्रयोग वगैरे या अफवा होत्या.याच बाबतीत 'छावा' कादंबरीत समर्थ रामदासांनी शिवरायांसाठी औषध पाठवले होते,असा उल्लेख आहे,मराठी रियासतीत 'त्यास (शिवरायांस) या संधीस अत्यंत उद्वीगनता प्राप्त होऊन,तें त्यांचे औदासीन्य श्रीसमर्थांनी दूर केले..',असा उल्लेख आहे. निकोलाओ मनुची हा समकालीन प्रवासी 'संभाजी स्रियांशी बदकर्मे करत असे' असं म्हणतो.तो पाल्हाळीक व अतिशयोक्तीपूर्ण वर्णनं करण्यासाठी प्रसिद्ध आहे.मात्र पुढे पुढे बखरींनी,साहित्यिकांनी यास विपर्यस्त स्वरूप दिले.अण्णाजी पंत दत्तोंच्या नात्यातली गोदावरी,हंसा,थोरातांची कमळा अशा वाटतील तशा कथा रंगवल्या,त्यास काडीमात्र आधार सापडत नाही.कादंबरीकारांनी आपापल्या मनाप्रमाणे यातील एक-दोन स्त्रिया संभाजीराजांच्या चरित्रात चिकटवून दिल्या.
येथे एकच सांगणे आहे, गोष्ट आणि निष्कर्ष काहीही असला तरी याबातीत त्यास आधार काहीही नाही,हे वाचकांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे.'छावा' मधली देवळात भेटणारी नखशिखा 'गोदावरी' अगर वाघ दरवाज्यावरून तोफा डागून शिवरायांचा घातपात करण्याचा कट उधळून लावणारी 'संभाजी' मधली 'गोदू' पूर्णपणे काल्पनिक आहे.
'का ल्प नि क' !!
विश्वास पाटील रात्रीच्या वेळी रायगडाखाली कोणालाही उतरण्याची परवानगी नव्हती,याकडे लक्ष वेधतात.आपल्या कादंबरीच्या शेवटीही हाच मुद्दा मांडतात;पण चिटणीस बखरीत शितळागौरीच्या हळदीकुंकूसमारंभातील जी गोष्ट सांगितली आहे, विश्वास पाटील त्यात 'हंसा' हे पात्र आणून सगळा दोष तिच्या माथ्यावर मारतात.अर्थात या दोन्हीही गोष्टींस काहीसुद्धा आधार नाही,हे लक्षात घ्यावे.चिटणीसाच्या बखरीत पुष्कळ चुका आहेत.विश्वसनीयतेत तिचा क्रमांक इतका वरचा नाही,असे मत इतिहासकार व्यक्त करतात.अर्थात चिटणीसाचे लिखाण अभ्यासपूर्ण नाही;पण म्हणून संभाजीराजांना बदनाम करण्यासाठी त्याने बखर लिहिली असे म्हणता येत नाही.
तुर्तास राज्याभिषेकापश्चात मानवी स्वभावास अनुसरून सोयराबाईंच्या मनात सापत्न भाव होता (पण त्या कपटी कारस्थानी नव्हत्या),तरूण तडफदार शंभूराजे आणि जाणते,अनुभवी,वृद्ध मंत्रीगण यांचे आपसांत पटत नव्हते आणि १६७६ च्या आसपास कदाचित शंभूराजांकडून काहीतरी चुक घडली असावी, ज्यामुळे शिवछत्रपती शंभूराजांवर नाराज झाले असावेत एवढांच निष्कर्ष काढता येतो.
यातून आपापसांतील हेवेदावे वाढीस लागले.तेव्हाच आपणंही आपले कर्तृत्व सिद्ध करावे,अशा भाबड्या अविचाराने संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले.आपली चुक उमजताच तेथून परतही आले.येथे संभाजीराजांनी दिलेरखानाला जाऊन मिळावे ही सर्व शिवरायांचीच योजना होती असे वाटण्याचे कारण नाही.स्वतः शिवराय व्यंकोजी राजांना जानेवारी १६८०मध्ये लिहिलेल्या पत्रात 'चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईंत गेले होते.... ....घरोब्याचे रीतीने जैसें समाधान करून यै तैसें केलें..' म्हणतात. (शि.प.सा.सं. खंड २, ले. २२२६) ; पुढे शिवरायांच्या मृत्यूपश्चातही परमानन्दकाव्य अगर संभाजीराजांनी लिहिलेल्या दानपत्रातून त्यांनी स्वतःची बाजू मांडली आहे.त्यामधून त्यांना खरे-खोटे काय ते सांगणे शक्य होते; पण त्यांतील उल्लेखावरून संभाजीराजे रागावूनंच दिलेरखानाकडे गेले होते,हे स्पष्ट होते.
यामुळे मंत्रिगणांचा शंभूराजांवर कायमचा रोष झाला.शिवाजी महाराजही नाराज झाले असावेत. पन्हाळयाला शंभूराजे कैदेत बिलकूल नव्हते;परंतू रायगडावरील वातावरण मात्र शंभूराजांना अनुकूल नव्हते. इथे लग्नप्रसंगी राजाराम महाराज संभाजीराजे नाहीत म्हणून रुसून बसले होते वगैरे यांस काहीही आधार नाही. शिवरायांच्या मृत्यूपश्चात युवराज संभाजीराजांचा छत्रपतीपदाचा जन्मसिद्ध हक्क नाकारला गेला. जनतेचा व सैन्याचा ओढा मात्र शंभूराजांकडे होता. सावधपणे पावले उचलत शंभूराजांनी कारभार हाती घेतला. कटात सामील सर्व व्यक्तींना आधी कैद परंतु नंतर मुक्त केले; या सर्व घटनांचा परिणाम असा,की कोणाचाही कोणावर विश्वास उरला नाही. एक एक करत सर्व जुनी अनुभवी माणसे पाठीमागे सारली गेली,काही मारली गेली आणि कवी कलश हा शंभूराजांचा प्रमुख सल्लागार बनला.
कवी कलश कोण,कुठचा याबद्दल मतमतांतरे आहेत. हा कवी कलश भोसले घराण्याच्या काशी क्षेत्रातील कुलोपाध्याय घराण्यातील होता, असे खाफीखान म्हणतो. त्याबद्दल निश्चित सांगता येत नाही. जदुनाथ सरकारांच्या 'Shivaji's visit to Aurangzeb' मध्ये परकलदासने कल्याणदासाला लिहिलेल्या पत्रातून आग्र्याला शिवरायांच्या माघारी कवी कलश पकडला जाऊन त्याला बेड्या घातल्या असा उल्लेख आहे. खाफीखान याच काळात शंभूराजे बनारसला कवी कलशाच्या घरी असल्याचे म्हणतो. ईश्वरदास नागर आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी गोकल नावाच्या पुरोहिताच्या घरी मुक्काम केल्याचे सांगून,शिवरायांनीच त्यास 'कवी कलश' ही पदवी दिल्याचे सांगतो. विश्वास पाटील कवी कलश म्हणजे भोसले घराण्याच्या कुलोपाध्याय घराण्यातील मुरलीधरशास्त्र्यांचा मुलगा तो उमाजी पंडीत म्हणजेच कवी कलश असे म्हणतात;यास संदर्भ सापडत नाही. जेधे शकावलीतील दोन उल्लेख असे, 'शके १६०६ पौश व ४ शाबुदीखान पुण्याहून आला दवड करोन बोरघाटें उतरोन गांगोलीस आला.कवी कलशें भांडण दिल्हें. फिरोन घाटावर घातला.' कलशाने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतल्याची ही एकमेव नोंद ! पण औरंगजेबाच्या अखबारात यास पुष्टी मिळत नाही.दुसरी नोंद अशी, 'शके १६०७ आशाढ मासीं संभाजीराजे याणी विजापुरचे मदतीस कब्जीस पाठवले.पन्हाळा राहून फौज रवाना केली.' म्हणजे कवी कलश पन्हाळ्यावरंच थांबले होते. याव्यतिरिक्त कवि कलशाने प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊन पराक्रम गाजवल्याचा एकही उल्लेख नाही. प्रतिकुल परिस्थितीत हा माणूस शंभूराजांना साथ देत राहिला. स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्मात येऊ इच्छिणा-या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचे शिवरायांचे कार्य शंभूराजांच्या काळात चालूच होते,याबाबतीत कवी कलशानेही लिहीलेली पत्रे आहेत.शेवटी आपल्या मृत्यूसही त्याने शंभूराजांइतकेच धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून तो विद्वान कवी, धर्माभिमानी आणि संभाजीराजांचा हितचिंतक व जिवलग मित्र असल्याचे सिद्ध होते; पण कादंबरीकार रंगवतात तसा मुत्सद्दी, धुर्त राजकारणी, शूर सेनापती कवी कलश कुठेही दिसत नाही. कादंबरीकारांना त्यास 'कवि+कुल+ईश' असे रंगवण्याची पूर्ण मुभा आहे. वाचकांनी मात्र प्रत्यक्ष साधनांतून एखादा विसंगत मुद्दा दिसला, तर तो स्विकारण्याची तयारी ठेवावी. बाहेरून आलेला आणि इतक्या उच्चपदापर्यंत पोहोचलेला कवी कलश आणि राजाचीही त्यावर विशेष मर्जी असावी,हे मात्र सर्वच कारभाऱ्यांना पटणे शक्य नव्हते. आधीच्या घडलेल्या घटनांचे, दोन्ही बाजूंनी केलेल्या चुकांचे पडसाद उमटत होते.
बहुतेक कादंबरीकार 'युवराज संभाजीराजे ते छत्रपती संभाजीराजे' या काळातील नाट्यमय घटनांवर विशेष भर देतात.छत्रपती संभाजीराजांच्या कर्तृत्वावर कादंबरीतून विशेष लिहिले गेले नाही.यामध्ये अपवाद आहे तो विश्वास पाटलांच्या संभाजीचा.संभाजीराजांनी 'छत्रपती' म्हणून केलेल्या कार्यकर्तृत्वावर विश्वास पाटलांनी भर दिला आहे;पण त्यात मधे मधे अतिरंजक भाग आला आहे.
पोर्तुगीजांवरील स्वारीत कुशल सेनानी म्हणून संभाजी राजांच्या शक्तीचा आणि आक्रमकतेचा प्रत्यय येतो.चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला,त्यास मराठ्यांनी जशास तसे उत्तर दिले.पुढे थेट गोव्यापर्यंत धडक मारून मराठ्यांनी पोर्तुगीजांचे प्राण कंठाशी आणले.मांडवी नदीतून मचव्यातून पळून जाणा-या विजरईच्या पाठी संभाजीराजे जीवाची पर्वा न बेधडकपणे नदीत घुसले. बिचारा विजरई सेंट झेविअरचे शव बाहेर काढून त्याची करूणा भाकत बसला.इथे विश्वास पाटलांच्या कादंबरीत संभाजीराजांनी साधुच्या वेषात विजरईच्या हातावर तुरी दिल्याची गोष्ट आहे.या गोष्टीस काहीही आधार नाही.कौंट दी आल्व्हर याचा शंभूराजांना जिवंत पकडण्याचा डाव होता.गोकुळाष्टमीस नार्वे येथे पंचगंगा नदीत स्नानासाठी संभाजीराजे येणार असल्याची विजरईस खबर होती;म्हणून त्याने छापा टाकला;पण संभाजीराजे तेथे आलेच नाहीत.एवढीच काय ती हकीकत कागदपत्रांतून मिळते. (Portuguese-Mahratta relations-Pissurlencar,translation by T.V. Parvate)संभाजीराजे वेषांतर करून आले असतील,नसतील अशा जर-तरच्या गोष्टींना पुराव्याविना इतिहास म्हणता येत नाही.
इंग्रजांचे संभाजीराजांशी धोरण कायम शक्य तितका समन्वय राखून स्वतःचा फायदा घेण्याचं राहिलं होतं.३१ मार्च १६८६ च्या पत्रात इंग्लंडच्या राजाने मुंबई आणि सुरतेच्या व्यापा-यांना संभाजीराजा हा युद्धसंमुख आहे,त्याच्याशी काळजीपुर्वक वागा,त्याला मदत करा असे लिहिले आहे.त्यापुर्वी २० नोव्हेंबर १६८० रोजी संभाजीराजांनी पाठवलेल्या आवजी पंडीत वकीलाने, "शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारतील" अशी धमकी दिली होती.
एकाच वेळी अनेक शत्रु अंगावर घेऊ नयेत,ही शिवरायांची युद्धनिती होती.तिच युद्धनिती पुढे संभाजीराजांनीही अवलंबलेली दिसते.आधीच पोर्तुगीज,सिद्दी,मोगल यांच्याशी झगडत असताना,कधी वचक ठेऊन तर कधी संमजसपणे संभाजीराजांनी इंग्रजांना आपल्या बाजूस राखले.ऑक्टोबर १६८२ पूर्वी प्रल्हाद निराजी इंग्रजांना भेटले होते.एप्रिल १६८४ च्या दरम्यान मुंबईच्या लाॅर्ड केजविनने कॅप्टन गॅरीला संभाजीराजांकडे पाठविले.
प्रत्येक वेळेस दोन्ही पक्षांनी आपापला फायदा बघत आपापसांत सलोखा राखला आहे.२८ ऑक्टोबर १६८५ च्या पत्रात लंडनहून सुरतकरांना 'संभाजीराजांशी मित्रत्वाचे संबंध राखल्यास तुम्हाला मोगल अगर पोर्तुगीजांना भिण्याचे कारण नाही' अशा अर्थाचे पत्र आले होते.इंग्रजांवर आयात निर्यातीसाठी जकात लादली होती.संभाजीराजांनी गुलामांवरही कर लादला होता.१६८४ च्या या तहात संभाजीराजांनी 'माझ्या प्रदेशातून कोणताही माणूस गुलाम म्हणून खरेदी करू नये किंवा त्याला ख्रिश्चन करू नये.' तसेच 'माझ्या प्रदेशात कोठेही वखारी बांधाव्यात.पण त्यांची लांबी ६० कोविद व रुंदी १५ उंची अडीच आणि भिंतीची जाडी अर्धा कोविद अशा मापाच्या असाव्यात.'अशा अटी लादल्या होत्या.
मात्र 'संभाजी' कादंबरीत, संभाजीराजांचे इंग्रजी सत्तेविषयी आलेले रंजक संवाद लेखकाच्या पदरचे आहेत.
रामशेजचा लढा ही मराठ्यांच्या इतिहासातली अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.चिवट मराठ्यांनी पाच वर्षे मोगलांना जबरदस्त तडफेने तोंड दिले.या युद्धाचे वर्णन खाफीखानाने व भीमसेन सक्सेनाने केले आहे.विश्वास पाटलांनी हा भागही थोडाफार रंजक केला आहे,यात त्यांनी रामशेजच्या किल्लेदाराचे नाव 'सुर्याजी जेधे' असे लिहिले आहे,ज्याला काहीही आधार नाही.वरून हा 'सुर्याजी जेधे' 'शेलारमामांच्या' तालमीत तयार झाला होता,अशी लोणकढीही बिनदिक्कतपणे ठोकून देतात.यास संदर्भ काय ?
दुर्दैवाने रामशेजच्या शूर किल्लेदाराचे नाव आजवर कळू शकले नाही.
शंभूराजांच्या चरित्रात दक्षिण विजयाबाबतचा एक कौतुकास्पद भाग येतो.म्हैसुरकरांनी मदुरेच्या राज्यात घुसायला सुरूवात केली होती.म्हैसुरकर आणि मराठे यांच्यात आधीपासूनंच बेबनाव होता.म्हैसुरकरांनी त्रिचिनापल्ली ताब्यात घेतल्यास मराठ्यांचे तंजावर आणि जिंजी हे लगतचे प्रांतही सुरक्षित राहिले नसते शिवाय मोगलांशी लढताना दक्षिणेचा महसूल हे महत्वाचे आर्थिक उत्पन्नाचे साधन होते; म्हणूनंच संभाजीराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली.
डाॅ. बी. मुद्दाचारी यांनी मराठी कागदपत्रे,जेझुईट रेकाॅर्डस्,दक्षिणेतील शिलालेख,चिकदेवराजविपन्नम् तसेच अप्रतिमवीरचरितम् इ. ग्रंथ यांचा अभ्यास करून 'Mysore-Maratha relations in 17th century' लिहिले आहे.यानुसार संभाजीराजे व इक्केरीचा बसप्पा नाईक यांनी गोवळकोंड्याच्या फौजेचे सहकार्य घेऊन म्हैसूरवर आक्रमण करण्यासाठी 'बाणावर' येथे तळ दिला.तिथे चिकदेवरायाने त्या सर्वांचा दारूण पराभव केला,संभाजीराजांनी आपला तळ बाणावर येथून त्रिचिनापल्लीस हलवला.तेथे त्यांना एकोजी राजेही येऊन मिळाले व संभाजीराजांनी चिकदेवरायाचा पराभव केला.उपलब्ध पुराव्यांवर एवढीच माहिती उपलब्ध होते.याव्यतिरिक्त कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे लढाईत बाणांचा वापर केला की नाही,परस्परविरूद्ध पक्षांची रणनिती काय होती,याविषयी काहीही माहिती मिळत नाही.
१६८१ पासून तीन वर्षे महाराष्ट्रराज्य सतत युद्धमान होते.याची सर्वाधिक झळ महाराष्ट्रातील सामान्य जनतेला पोहोचत होती.१६८४ मध्ये अकबर आणि संभाजीराजांनी आपले वकील तहाची बोलणी करण्यासाठी औरंगजेबाकडे पाठवले होते.औरंगजेबाने तो तह अमान्य केला,अशी हकीकत मोगल दरबाराच्या अखबारात आहे. यात कमीपणा घेण्याचा प्रश्न नाही.मोगली फौजा केव्हाच्या महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्या होत्या.महाराष्ट्र सतत युद्धाच्या वणव्यात होरपळत होता.तह झाला असता काही काळ इथल्या जनतेच्या जीवनात, स्थैर्य आले असते.शिवरायांनीही मिर्झाराजाशी तह करताना हाच विचार केला होता.
संभाजीराजे संगमेश्वरास पकडले गेले,त्यावेळेस ते खेळण्याहून रायगडास जात होते.त्यावेळेस संभाजीराजांजवळ फारसे सैन्य नव्हते.कवी कलश त्यावेळी पुजा व अनुष्ठानात मग्न होते.शेखनिजाम मुकर्रबखान अचानक संभाजीराजांवर चालून आला.खाफीखान, संभाजीराजांनी केस काढून अंगाला राख फासली होती असे म्हणतो.अन्यत्र असा उल्लेख नाही.
मुकर्रबखान नक्की कोणत्या मार्गाने बहादुरगडाला गेला,त्याने शंभूराजे आणि कवी कलशांचे केस,दाढी-मिशा काढल्या होत्या का,वाटेत कोणी मराठ्याने त्यास प्रतिकार केला होता का,याबद्दल काहीसुद्धा ठोस पुरावा सापडत नाही.तुर्तास अतिशय वेगाने अवघ्या बारा-तेरा दिवसांत मुकर्रबखान बहादुरगडास पोहोचला एवढेच म्हणता येते.
पुढे बादशहाने केलेल्या क्रूर छळास या शिवपुत्राने आपल्या व आपल्या पित्याच्या किर्तीस साजेसेच तोंड दिले;पण मराठी स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जाऊ दिले नाही.संभाजीराजांनी आपल्या मृत्यूंजय तेजाचे दर्शन घडवले आणि शंभूराजे महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे अखंड स्फुर्तिस्त्रोत ठरले.
विविध कादंब-यांत प्रामुख्याने आलेली वर्णने,उल्लेख आणि उपलब्ध विश्वसनीय संदर्भसाधने यांतून आलेले मुद्दे आपण थोडक्यात पाहिले.
आता 'शापित राजहंस' , 'छावा' आणि 'संभाजी' या तीन रचनांविषयी काही ठराविक बाबी पाहू.
अनंत तिबिले यांच्या कादंबरीतील पात्रे स्वतः आपला वृतान्त कथन करीत आहेत.प्रत्यक्ष घटना,घटनाक्रम,त्यातील तथ्य कथन करण्याऐवजी कादंबरीतील महत्वाची पात्रे घटना घडून गेल्यावर त्याविषयीचे आपले मनोगतंच व्यक्त करताना दिसतात.ऐतिहासिक पात्रांच्या मनोभूमिकेचा वेध घेणारी ही कादंबरी अर्थातंच चित्तरंजक आहे;पण त्यातील ऐतिहासिक तथ्यांचा विचार करता,त्यात त्रुटी आढळतात.शंभूराजे मुलूखगिरीवर जाण्याची इच्छा व्यक्त करतात(पृ.क्र ९५),एका पुरूषाने परस्त्रीचा हात पकडला म्हणून त्यांचा राग अनावर होतो(पृ.क्र.९७), आग्र्याच्या भेटीत एका गायिकेला कंठा बहाल करतात(पृ.क्र. १४५).या सर्व घटनांच्या वेळी शंभूराजांचे वय फक्त सात ते नऊ वर्षे आहे.इतकं प्रौढत्व या वयात असतं का ? व्यक्तीची बौद्धिक कुवत अधिक असू शकते,शंभूराजांना आग्र्याच्या राजकारणापासून बरीच समजही आली असेल,पण या घटना आणि संवाद शंभूराजांच्या त्या वयाला शोभणारे नाहीत.सोयराबाईंनी उमाजी पंडीत यांच्याकरवी शंभूराजांना व्यसनांची संगत लावल्याचे लिहिले आहे. कमल गोखलेंनी लिहिलेल्या चरित्रात या बाबीचा उल्लेख स.ब. मुजुमदारांच्या 'प्रभुरत्नमालेत' आल्याचे म्हटले आहे. त्याला अनुसरून लेखकाने 'एक गणिका उमाजी पंडीतकडून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी शंभूराजांना मद्य पाजते' अशी कथा लिहिली आहे.केशवपंडीतकृत दण्डनितीप्रकरणात उमाजी पंडीत शंभूराजांचे शिक्षक असल्याचे म्हटले आहे.चिटणीस बखरीतील उल्लेखानुसार निदान १६८२ पर्यंत उमाजी पंडीत हयात होते.
शिवाजी सावंतांनी लिहिलेली 'छावा' ही कादंबरी शंभूराजांवरील अतिशय सुंदर,अजोड अशीच कादंबरी आहे.शिवाजी सावंतांसारख्या प्रतिभासंपन्न सरस्वतीपुत्राने शंभूराजांवर लिहिलेली कादंबरी वाचकाला मुग्ध करते.अशी कादंबरी जोडीला किचकट संदर्भग्रंथ घेऊन रूक्षपणे वाचणे हेच खरे तर कठीण काम आहे.कादंबरीतील दोन तृतीयांश भागात शंभूराजांच्या जन्मापासून ते शंभूराजे छत्रपती होईपर्यंतची कथा आली आहे.थोडक्यात सुरूवातीच्या नाट्यमय व वादग्रस्त बाबींवर सावंतांनी अधिक लक्ष पुरवले आहे,यातील प्रमुख मुद्द्यांवर यापुर्वीच लिहिले आहे.कादंबरीतील संवाद,वातावरण निर्मितीसाठी लिहिलेले नाट्यमय प्रसंग याबाबत सुज्ञ वाचकंच निर्णय घेतील.छत्रपती म्हणून शंभूराजांच्या जीवनातील युद्धप्रसंग,राजकारण याऐवजी ऐतिहासिक पात्रांची मन:स्थिती उलगडून सांगत वाचकांच्या भावनेला हात घालण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकानी केला आहे,असेच म्हणावे लागेल.कादंबरीत महंमद सैस,गोमाजी शंभूराजांचे अश्वारोहणकलेचे व युद्धशास्त्राचे शिक्षक असल्याचे म्हटले आहे,त्यास काहीच आधार नाही.बखरींतून संभाजीराजे अश्वारोहण,दांडपट्टा,तलवार,भालाफेक,धनुर्विद्या,कट्यार,जांबिया इ. शस्त्रांचा वापर करण्यास शिकले होते हे समजते;पण शिक्षकांची नावे समजत नाहीत.
विश्वास पाटीललिखित 'संभाजी' वाचकांच्या हृदयावर राज्य गाजवत आहे.छत्रपती म्हणून शंभूराजांच्या कार्यकर्तृत्वाचा असा गौरव आजवर अन्य कुठल्या कादंबरीत फार आढळत नाही.यामुळेच ही कादंबरी लोकप्रिय झाली असावी;पण तरीही ती कादंबरीच राहते,इतर कादंब-यांप्रमाणेच त्यातही कल्पनाविलास आहे,रंजक भाग आहे, अशी कादंबरी संदर्भग्रंथ ठरत नाही,हे वाचकांनी लक्षात घ्यायला हवे.
बरेचदा कादंबरी लिहीताना लेखकाने पाठीमागे दिलेल्या संदर्भग्रंथाच्या यादीवरून लेखकाने जे लिहिलंय त्यात तथ्यंच असणार,असा काहींचा समज असतो.त्यातूनंच एकदा का सोयीस्कर उल्लेख मिळाले,की तेच खरे बाकी सब झूठ असा लोकांचा हट्ट असतो.हे पुर्णपणे चुकीचे आहे.
'संभाजी' कादंबरीतील काही चुका पहा -
१.शिवरायांचा मृत्यू झाला तो दिवस चैत्र शुद्ध पौर्णिमेचा.त्यदिवशी विश्वास पाटलांनी रेखलेला पन्हाळगडावरील प्रसंग(पृ.क्र. १८४)-
चैत्र शुद्ध पौर्णिमा आली... ....आपल्या धर्ममपत्नीला दिलासा देत ते (शंभूराजे) बोलले, " आबासाहेबांच्या तब्येतीची तुम्ही कसली चिंता करता ? .... ....पन्नाशीचा उंबरठा गाठावयास त्यांना अजून एक मास बाकी आहे."
ज्यूलियन कॅलेंडरनुसार महाराजांची जन्मतारीख येते १९ फेब्रुवारी १६३०,महाराजांचा मृत्यू झाला ती तारीख येते ३ एप्रिल १६८०;म्हणजे महाराजांचे मृत्यूसमयी वय होते,पन्नास वर्षे,एक महिना आणि पंधरा दिवस;तरी विश्वास पाटलांच्या लेखी पन्नाशी पूर्ण होण्यास एक मास बाकी आहे.
२.'काझी हैदर मुल्ला' याचा विश्वास पाटील चक्क स्वराज्यातील विद्वान न्यायाधीश असा उल्लेख करतात. (पृ.क्र. ११) शिवराय वेळप्रसंगी त्याच्याकडून सल्ला घेतानाही दाखवले आहेत.शिवरायांच्या अष्टप्रधानातील न्यायाधीश निराजी रावजी होते. हा काझी हैदर साकी मुस्तैदखान या समकालीन लेखकाने लिहिलेल्या 'मासिरे आलमगिरीत' शिवरायांचा फारसी कारकून (मुन्शी) असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.पुढे १६८३ मध्ये तो शंभूराजांशी फितुरी करून औरंगजेबाजवळ गेला.तिथे औरंगजेबाने पुढे त्यास १६८५ नंतर न्यायाधीश केले.हाच काझी हैदर फितुरांचा लोंढा औरंगजेबाकडे ओढून बादशहाकडून खिल्लती मिळवत होता.
पुढे कोथळागड जिंकण्यासाठी या हैदरने मोगल सैन्य कोथळागडात घुसविण्यास मदत केली.त्यात कित्येक मराठे कापले गेले.(मोगल दरबारचे अखबार)
३. दर्यासारंग आणि दौलतखानाचा विश्वास पाटील संभाजीराजांच्या कारकिर्दीतही उल्लेख करतात. (पृ.क्र. २५५) वास्तविक दर्यासारंगला शिवाजी महाराजांनी स्वतःच १६७९ साली अटक केली. त्यानंतर त्याचा उल्लेख कुठेही येत नाही.(English records on Shivaji-॥-341;शिवछत्रपतींचे आरमार-ग.भा. मेहेंदळे )
४. संभाजीराजांना १८ मे १६८२ रोजी पुत्र झाला,त्याचे नाव 'शिवाजी' ठेवले.याच 'शिवाजी'चे औरंगजेबाने नाव बदलून 'शाहू' हे नाव ठेवले.
जेधे शकावली या विश्वसनीय मराठी साधनातील दोन स्पष्ट उल्लेख असे-
# शके १६०४ दुंदुभ संवत्सरे वैशाख वद्य ७ गुरूवारीं संभाजीराजे यांसी पुत्र जाला.शिवाजीराजें नांव ठेविले.
# शके १६११ शुक्ल नाम संवत्सरे कार्तिक मासीं रायगड सला करून मार्गशीर्ष सुध २ रविवारीं रायगड मोगलांस दिला.संभाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यास तुलापुरास औरंगजेब यानी नेलें.पादशाहें त्यास हप्त हजारी केलें.शाहू राजे नांव ठेविलें.
तरीही विश्वास पाटील सुरूवातीपासूनंच संभाजीराजांच्या पुत्राचा 'शाहूबाळ' असाच उल्लेख करतात. (पृ.क्र. ४३२)
या चुका प्रातिनिधीक आहेत,सहज नजरेस आल्या आहेत,मुद्दाम शोधु म्हणता शोधलेल्या नाहीत.
तरी कादंबरीला संदर्भग्रंथ मानणा-या लोकांनी याबाबतीत विचार केला पाहिजे.
पूर्वी कित्येक वर्षे बखरकारांच्या पाल्हाळीक अतिरंजित वर्णनांवरून कादंबरी, नाटके यांतून या शिवपुत्रावर अन्याय होत राहिला.आज त्यांचे सत्य चरित्र आमच्यासमोर आले असताना,पुन्हा काही साहित्यिक ते अतिरंजित करून सांगत आहेत.त्यामुळे शुद्ध इतिहास सामान्यजनांपर्यंत फार कमी पोहोचतो.जितका दोष अतिशयोक्तीपूर्ण वर्णनांतून संभाजीराजांना बदनाम करणा-यांना द्यावा लागेल,तितकाच दोष त्यांच्या चरित्रात सध्या अप्रमाण बाबी घुसडणा-या व्यक्तींस द्यावा लागेल.या दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींमुळे इतिहास अभ्यासामागचा जो मुख्य उद्देश - लोकांना जागृत करणे,प्रबोधन,तो विशुद्ध स्वरूपात होत नाही. वा.सी. बेंद्रे,कमल गोखले,सदाशिव शिवदे यांनी कित्येक वर्षे अपार मेहनत करून शंभूचरित्र लिहिले.वाटले असते,तर वाट्टेल तितक्या थापा मारून ते शंभूराजांचे हवे तितके अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करू शकले असते;पण त्यांनी तसे केले नाही,अन्यथा बाहेरच्या जगात त्या चरित्रास इतिहास म्हणून मान्यता मिळाली नसती.
कादंबरी लिहिण्यासाठी,कथा लोकांच्या मनास रूचेल अशा रितीने सांगण्यासाठी लेखकाकडे विशेष प्रतिभावान लेखनशैली असावी लागते;परंतु लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या आधारस्तंभावर जिथे ही इमारत उभी असते,तिथे अस्सल संदर्भसाधनांच्या,कागदपत्र-पुराव्यांच्या पायात फेरफार असू शकतात.सामान्यांसाठी चित्तरंजन आणि अभ्यासकांसाठी त्यासोबतंच अस्सल साधनांतून समोर येत असलेल्या घटनांमध्ये ज्या रिकाम्या जागा दिसतात,त्या भरण्यासाठी लागणा-या तर्कबुद्धीचा एक भिन्न दृष्टीकोन एवढाच या साहित्याचा उपयोग असू शकतो.त्याहून अधिक नाही.
कादंबरीकारांनीही आपणंच काय तो नवीन इतिहास शोधला,असा आव आणून लिहिण्याची, किंवा स्वतःस इतिहासकार समजून गप्पा ठोकण्याची काही एक गरज नाही.
आदरणीय इतिहासकार द.वा.पोतदार,डाॅ.कमल गोखले लिखित 'शिवपुत्र संभाजी' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "कादंब-या कथा,कहाण्या ,नाटके, काव्ये ही सर्व शबल इतिहास या वर्गात मोडतात.... ....कवि-कथाकारांची प्रतिभा स्वैर संचार करू शकते.शुद्ध ऐतिहासिकांची प्रतिभा अभ्यासाने परिनिष्ठीत झालेली असते.कवि-कथाकार यांच्या मनात ऐतिहासिक विषय येतो तेव्हा तो त्या विषयाकरता शुद्ध ऐतिहासिकाप्रमाणे घटित निश्चितीची तपश्चर्या करीत नाही.कच्चा ऐतिहासिक माल घेऊन त्याला आपल्या आवडीचा रंग देऊन कार्यसिद्धी करतो.तो लोकप्रिय झाला तरी त्याच्या लिखाणाला इतिहास म्हणणे ही भ्रांती होईल.एवढा भेद नीट लक्षात वागवून चालले असता,जिज्ञासू वाचकांचा घोटाळा होणार नाही."
धन्यवाद !
- ©डॉ. सागर पाध्ये
संदर्भ -
# इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - राफ्टर प्रकाशन
# छत्रपती संभाजी यांचे विचिकित्सक चरित्र - वा.सी.बेंद्रे
# छावा - शिवाजी सावंत (मेहता पब्लिशिंग हाऊस,अठरावी आवृत्ती)
# ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे
# मराठी रियासत (खंड २ उग्रप्रकृती संभाजी,स्थिरबुद्धी राजाराम) - गो. स. सरदेसाई
# मागोवा - नरहर कुरुंदकर
# राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख
# शापित राजहंस - अनंत तिबिले (अजब प्रकाशन,पहिली आवृत्ती)
# शिवचरित्रप्रदीप - संपादक- द.वि.आपटे, स.म.दिवेकर
# शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले
# संभाजी - विश्वास पाटील (आठवी आवृत्ती)
# A history of the Marathas - James Grant Duff
# English records on Shivaji
# Maasir-i-alamgiri - Saqi Must'ad Khan,translated by sir Jadunath Sarkar
# The Mysore-Maratha relations in the 17th century - B.Muddachari
# Portuguese-Mahratta relations - Dr. P.S.Pissurlencar,translated by T.V. Parvate
# Storia de Mogor - Niccolao Manucci (मराठी अनुवाद - ज.स.चौबळ)
https://m.facebook.com/Maharashtradharma1may/
सुंदर लेख....मित्रा. उत्तम पद्धतीने विवेचन केले आहेस.
ReplyDeleteमाझ्या वाचनात "छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ" - जयसिंगराव पवार. हे ही पुस्तक आले होते आपण तेही बघावे.
खूप खूप धन्यवाद सुशांतजी..हो 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' अतिशय उत्तम पुस्तक आहे संभाजीराजांवर.माझ्याही वाचनात आलं होतं
Deleteछान लेख-विवेचन. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे, यावर दिलेला भर कौतुकास्पद!
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद अनिलजी!
Deleteपूर्वी काहीजणांनी संभाजीराजांना 'डोक्यात ठेवून' लेखन केले त्यांनी नकारात्मक मांडणी करून बदनामीचे काम केले. अलीकडे काहीजण त्यांना 'डोक्यावर ठेवून' अतिशयोक्ती करत लेखन करत आहेत. दोन्हीही प्रकारच्या लेखनातून संभाजीराजांच्या चरित्रावरच अन्याय केला जातोय.
ReplyDeleteकधीतरी संभाजीराजांना काळजात ठेवून आचार विचारात घेऊन अभ्यासणे गरजेचे आहे. अर्थात असा सन्माननीय अभ्यास होऊ लागलाय ही समाधानाची गोष्ट आहे.
सुंदर लेख आवडला
ReplyDeleteछत्रपती संभाजी महाराज यांचा अंतीमविधी वढू बुद्रुक व तुळापूर येथील विषयावर काही माहिती मिळावी विनंती
खुप छान , सविस्तर व सत्य माहिती आपणामुळे मिळाली
ReplyDeleteखूप छान लेख. संभाजी महाराज यांच्या चरित्राचा किंवा इतिहासाचा अभ्यास करणे हे खरेच कठीण काम आहे . संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे काय झाले, अंत्यसंस्कार कोणी केले याबद्दलही माहिती द्यावि ही विनंती.
ReplyDeleteयशवंतजी, मन:पूर्वक धन्यवाद !
Deleteछत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे काय झाले व अंत्यसंस्कार कोणी केले, याबद्दलची माहिती 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' या पुस्तकात सदाशिव शिवदे यांनी पुराव्यांसकट दिलेली आहे. सदर संदर्भग्रंथ पहावा.
खरतर या शिवपुत्रावर इतिहाकारांनी घोर अन्याय च केला
ReplyDeleteHi Dr. Sagar. Your blog is very insightful. I have gone through Sambhaji and Chhawa both books. Few discrepancies I too have observed. Later I read research oriented writings of Kamal Gokhale and Sadashiv SHivde. It has clarifed few things. However I still have some doubts. Can I discuss it with you? I am reachable at drsandeep85@gmail.com. Please email, so that can get in touch with you. Thanks a lot .
ReplyDelete