३ एप्रिल १६८०,चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२,सहस्त्रसूर्यांच्या तेजालाही झाकोळून टाकणारा शिवसूर्य भर मध्यान्ही अस्ताला गेला.
महाराजांचा असा अकाली ध्यानीमनी नसताना झालेला मृत्यू मनात शंका उत्पन्न करू शकतो.त्यातुनंच काही बखरी आणि इतर पत्रांतून असा संशय व्यक्त केलेलाही दिसतो.कांदबरीकार,कथाकार,नाटककार यांना त्यात आपली कथा रंगवण्यास साजेसे नाट्य दिसते.
महाराजांचा मृत्यू कसा झाला,हे आता उपलब्ध कागदपत्रांवरून काहीसे स्पष्ट आहे.महाराजांच्या मृत्यूबद्दल काही समकालीन व उत्तरकालीन नोंदी पुढीलप्रमाणे देता येतील-
१.सभासद बखर
कृष्णाजी अनंत सभासद हा शिवछत्रपतींचा मुतालिक (सल्लागार) होता.शिवछत्रपतींचे कनिष्ठ पुत्रराजाराम महाराजांच्या आज्ञेवरून त्याने जिंजी येथे थोरल्या महाराजांचे चरित्र लिहिले होते.
त्यात म्हटले आहे,
"मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले..."
२.जेधे शकावली
शिवछत्रपतींचे सरदार कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडील या शकावलीत लिहिले आहे,
'शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला.'
३.मुंबईकर इंग्रजांचे सुरतकरांना पत्र
(28th April1680)
We have certaine news that Sevajee Rajah is dead.It is now 23 days since he deceased,it is said of a bloody flux being sick 12 days.
४.शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २,लेखांक-२२८६,डाग रजिस्टर १६८० मधील नोंदीतही 'गोवळकोंड्याहून आलेल्या बातमीनुसार शिवाजीवर त्याच्या बायकोने विषप्रयोग केल्याचा' संशय व्यक्त केला आहे..
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी,की वरील साधनातही केवळ संशय व्यक्त केला आहे:पत्रातील उल्लेख ऐकीव माहितीवर आधारीत आहे;म्हणजे तो विश्वसनीय ठरत नाही,इतरत्र त्याला दुजोरा दिल्याचेही दिसत नाही.याव्यतिरीक्त 'शिवदिग्विजय'बखरीतील सोयराबाईंनी महाराजांस विषप्रयोग केल्याचे अतिरंजित वर्णन आहे;पण त्यास काहीच आधार नाही.
५.Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ)
निकोलाओ मनुची या समकालीन इटालियन प्रवाशाने शिवकालातील व शंभूराजांच्या कारकिर्दीतील घटनांची अनेक वर्णने केली आहेत.त्यात तो म्हणतो -
तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला.
६.मासिरे आलमगिरी
साकी मुस्तैदखान या औरंगजेबाच्या दरबारातील 'वाकेनवीसाने' लिहिलेले वर्णन-
आमदानीचे २३वे वर्ष १०९१ हि.(मे १६८०) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली.[मासिरे आलमगिरी पृ.१५४]
७.History of Sevagi and his successor,recent Conquerors in India by Father Pierre Joseph d'Orleans.
"..... he was preparing for still greater conquests when a violent attack of colic put end to his life and projects."
८.भोसले घराण्याची बखर
शके १६०२रौद्रनाम संवत्सरे फसली सन १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते.तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली,ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.
९.History of the Marathas- Grant Duff(मराठी अनुवाद-कॅ.डेव्हीड कॅपन)
यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला.तो प्रकार असा;शिवाजी रायगडी असताना त्याला गुडघी म्हणून रोग झाला,तो प्रतिदिवशी वृद्धींगत होत चालला.मग त्याच्या योगेकरून मोठा ज्वर आला.ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.
१०.'तारीखे शिवाजी' या माॅडर्न रिव्ह्यू मासिकातील जदुनाथ सरकार यांनी प्रकाशित केलेल्या फारसी चरित्राचा वि.स.वाकसकर यांनी ९१ कलमी बखरीत इंग्रजी अनुवाद दिला आहे, '.....as the maharajah's destined period of life had come to it's end the queen's heart changed and she did an act (poisoning ?) which made Shivaji give up his life..'
११.शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मध्ये लेखांक २२४९ ते २२५३,२२५८ ते २२६१ ,२२७५,२२८१,२२८६,२३०२,२३०७ इ. मध्ये परदेशी व्यापा-यांच्या पत्रांत महाराजांच्या मृत्यूविषयी अनेक नोंदी आहेत;मुळात महाराजांचा मृत्यू झाला की नाही याबद्दल शत्रुंच्या मनात गोंधळ उडालेला दिसून येतो.परंतु लेखांक २२८६ वगळता अन्यत्र कोठेही महाराजांच्या मृत्यूविषयी संशयास्पद घटनेची नोंद नाही.
१२.History of Aurangzib(vol. IV,southern India 1645-1689) -Jadunath Sarkar
"On 23rd of March 1680,the Rajah was seized with fever and blood dysentry.The illness continued for twelve days.Gradually all hopes of recovery faded away,and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ....the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance,which imperceptibly passed into death."
याव्यतिरिक्त बखरीतील इतर नोंदी पाहू,
१.सभासद बखर,चिटणीस बखर,९१ कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इ.सर्वच बखरींत शिवरायांनी अंत्यसमयी भल्या व विश्वासू व्यक्तींना जवळ बोलावून सावधपणे देह ठेवला असे वर्णन आहे.
२.यापैकी भारतवर्षमध्ये प्रकाशित झालेली,प्रभातमध्ये वि.का. राजवाडे संपादित केलेली व फिजेलकृत फाॅरेस्टची अशा तीन प्रतींनुसार ९१ कलमी बखरीत मोरोपंत व अण्णाजीपंत महाराजांच्या मृत्यूसमयी उपस्थित होते,असे म्हटले आहे,तर काव्येइतिहाससंग्रहात साने यांनी प्रकाशित केलेल्या
बखरीत अशी नोंद नाही.जदुनाथ सरकार यांनी प्रकाशित केल्यानुसार('तारीखे शिवाजी'चे इंग्रजी भाषांतर),"....Moro Panth Peshwa who was living in the district of Sri Trimbak Kshetra and Abaji Panth who had gone out on a tour of inspection on hearing of this calamity came with a force of 10000 cavalry."
३.सभासद बखरीत व भोसले घराण्याच्या बखरीत महाराजांच्या अंत्यसमयी उपस्थित व्यक्तींची यादी दिली आहे,ती पुढीलप्रमाणे-
# कारकून वगैरे-
निळकंठ मोरेश्वर प्रधान(दोन्ही ब.)
प्रलाधपंत/प्रल्हादपंत(दोन्ही ब.)
गंगाधर जनार्दन(दोन्ही ब.)
रामचंद्र निळकंठ(दोन्ही ब.)
आबाजी महादेव(भो.घ.ब.)
रावजी सोमनाथ(सभा. ब.)
जोसीराव(भो.घ.ब.)[जोतीराव(?)-सभा.ब.]
बाळ प्रभू(दोन्ही ब.)
# हुजरे लोक,इतर मराठे
बाबाजी घाडगे(दोन्ही ब.)
बाबाजी कदम(भो.घ.ब.)[बाजी कदम(?)-सभा.ब.]
सुर्याजी मडसरे(भो.घ.ब)सुर्याजी मालुसरे(सभा.ब.)
महादजी नाईक(दोन्ही ब.)
हैबतराव निंबाळकर सरलष्कर (भो.घ.ब.)
संताजी घोरपडे समशेर बहाद्दर(भो.घ.ब.)
बहिरजी घोरपडे विश्वासराव(भो.घ.ब.)
मुधोजीराव सरखवस(दोन्ही ब.)
हिरोजी फर्जंद कुंवर(दोन्ही ब.)
सिदोजीराव नींबाळकर पंचहजारी(भो.घ.ब.)
गणोजी राजे सीरके मलेकर(भो.घ.ब.)
संभाजी कावजी(भो.घ.ब.)
महादजी पानसंबळ(भो.घ.ब.)
कृष्णाजी नाईक(भो.घ.ब.)
बहिरजी नाईक जासूद(भो.घ.ब.)
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२,लेखांक २२२४ मधील चोपडे येथील इंग्रजांनी सुरतकरांना लिहिल्यानुसार ,-
शिवाजीच्या सैन्यानी १६८० फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या भागात सरसहा जाळपोळ केली.मोरोपंडीतांच्या हाताखालचे सैन्य अद्यापि याच सरहद्दीवर हाताला लागतील ते किल्ले घेण्यात गुंतले आहे.मुल्हेर घेण्याची त्यांची मोठी खाज असून त्यावर ते दोनतीनदा प्रयत्न करून गेले.(....His armys under "Mora Punditt" continues still upon these borders,They have great itching towards Moleer castle...)
'तारीखे शिवाजी' मध्ये मोरोपंत त्र्यंबक क्षेत्री,तर आबाजी पंत(अण्णाजी पंत?) बाहेर राज्याच्या टेहळणीसाठी स्वारीवर होते,ते ही दुःखद वार्ता ऐकून आले अशी नोंद आहे.
मराठी साम्राज्याची छोटी बखर मध्ये दिलेला उल्लेख असा,"...महाराज निधन पावताच किल्ल्याचे दरवाजे लागले.आपाजीपंतास(अण्णाजीपंतास?) व निळोपंतास(इथे तपशीलात चूक आहे,निळोपंत रायगडावरच होते,मोरोपंत हवे) पत्र पाठवून सहावे रोजी आणविले.
मोरोपंत याकाळात नासिक भागात(हणमंतगड-त्र्यंबकक्षेत्र-मुल्हेर)स्वारीवर होते,असा वेळोवेळी उल्लेख येतो.
महाराजांच्या मृत्यूसमयी हंबीरराव मोहिते क-हाडला,अण्णाजीपंत दत्तो चौलला,तर मोरोपंत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून नासिक परिसरात होते,ते थेट महाराजांच्या मृत्यूनंतरच रायगडावर आले.यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
बखरींतील उल्लेख पहाता अंत्यसमयी अष्टप्रधानांतील महत्वाच्या व्यक्ती रायगडावर नव्हत्याच.काही ब्राह्मण मंत्री,कारकून यांबरोबर सरदार,हुजरे व इतर काही मराठेही राजांजवळ होते;अशावेळी कोणीही दोघा तिघांनी महाराजांचा खून केला असावा आणि पुढे अगदी कोणालाही या गोष्टीची कानोकान खबरही लागली नाही,हे शक्य वाटत नाही.
वर उल्लेखलेल्या घटना व संदर्भ लक्षात घेता पुढील गोष्टी समजतात,
१.उपलब्ध साधनांत शिवरायांच्या मृत्यूची तारीख व इतर बारीकसारीक तपशील यात चुका आहेत;पण सर्व साधनांमध्ये महाराजांचा मृत्य ज्वराची व्यथा व रक्तसार यामुळे झाल्याचे जवळपास एकमत दिसते.अंगात ज्वर,नंतर रक्तसार ही विषमज्वराची लक्षणे आहेत.यात आतड्यास व्रण पडतात,त्यामुळे रक्ती हगवणसुद्धा संभवते.या प्रकारास वैद्यकीय भाषेत 'Enteric fever' (एंटेरीक फिव्हर) असेही म्हणतात.
२.थोड्याफार फरकाने विश्वसनीय समकालीन व उत्तरकालीन साधनांमध्ये शिवरायांचा आजारपणाने नैसर्गिक मृत्यू झाला यावर एकमत आहे.
३.कोणीही व्यक्ती शिवरायांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असती,तर संभाजीराजांनी त्या व्यक्तीला माफ करणे अशक्य होते.
४.मोरोपंतांचे जवळपास सहा महिन्यांनी (ऑक्टोबर १६८०) वृद्धपकाळाने निधन झाले,तर अण्णाजी पंत शिवरायांच्या मृत्यूनंतर सव्वावर्ष जिवंत होते.शिवरायांचा खून केला असता,तर संभाजीराजांनी त्यांना जिवंत सोडले असते का??त्यांना अष्टप्रधानांत स्थान दिले असते का?
मोरोपंतांचे सुपुत्र निळोपंत पिंगळे यांना स्वतः शंभूराजांनी पेशवेपद बहाल केले होते.
निळोपंतानीही इमानइतबारे शंभूराजांची व पुढे शाहू महाराजांच्या कारकीर्दीपर्यंत स्वराज्याची सेवा केली.त्यांची कारकिर्द पूर्णपणे निष्कलंक आहे.
५.कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराज,संभाजीराजे व राजाराम या तिघांनाही समकालीन होता,राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून राजारामांच्या हयातीतच त्याने शिवचरित्र लिहिले.मग वडिलांच्या मृत्यूचं काही गूढ होतंच,तर राजारामांनी ते सर्वांसमोर का उघड होऊ दिलं नाही,असा प्रश्न उपस्थित होतो.
महाराजांचा मृत्यू भारतवर्षाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे;परंतू उपलब्ध साधनांतील उल्लेख आणि निष्पक्षपाती तर्कबुद्धीने विचार केला असता, महाराजांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात या शंकेस काही अर्थ उरत नाही.
बहुत काय लिहिणे,सुज्ञ असा.
आमचे अगत्य असू द्यावे
धन्यवाद !
-©सागर पाध्ये
संदर्भ ग्रंथ सूची
१.असे होते मोगल(Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci)मराठी अनुवाद-ज.स. चौबळ
२.एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
३.ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा-सदाशिव शिवदे
४.मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
५.मराठी साम्राज्याची छोटी बखर-संपादक, जनार्दन बाळाजी मोडक
६.शिवचरित्र प्रदिप(जेधे शकावली साठी)-द.वि आपटे,प्र.स.दिवेकर
७.शिवकालीन पत्रसारसंग्रह- भा.इ.सं.मंडळ
८.सभासद बखर
९.शककर्ते शिवराय-विजय देशमुख
10..English records on Shivaji
11.History of Aurangzib(vol. IV,southern India 1645-1689)
-Sir Jadunath Sarkar
12.History of the Marathas-Grant Duff(मराठी अनुवाद-कॅ.डेव्हीड कॅपन)
13.Shivaji Souvenir -G.S. Sardesai
-सागर पाध्ये
खूप छान रीतसर मांडणी केली आहे....पण तथापि विषय अर्धवट.....या विषयावर जेवढा अभ्यास करू आणि जेवढे लिहू तेवढे कमीच..... खूप जणांचे मत ऐकले आहेत पण अजून तरी कोणी तटस्थ पणे सांगत नाही कारण रेफरन्स पण काही स्पष्ट बोलत नाहीत..... समकालीन संदर्भ पण अजून मूक आहेत..... खूप छान होता ब्लॉग.... या मध्ये सर्वांची मत आली आहेत
ReplyDeleteवैभवजी 'विषय'अर्धवट म्हणजे आपल्याला त्यात अजून काय अंतर्भूत असायला हवे असे वाटते ?
ReplyDeleteशिवछत्रपतींसोबत वावरणारा सभासद प्रत्यक्ष राजाराम छत्रपतींसमोर 'राजास ज्वराची व्यथा झाली' म्हणतो.. समकालीन इंग्रजी पत्रात शिवाजीराजा २३ दिवस आजारी होता असे म्हटले आहे.
कोणते समकालीन संदर्भ मुक आहेत ?
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. किंतु शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २,लेखांक-२२८६,डाग रजिस्टर १६८० मधील नोंदीतही 'गोवळकोंड्याहून आलेल्या बातमीनुसार शिवाजीवर त्याच्या बायकोने विषप्रयोग केल्याचा' संशय व्यक्त केला आहे..
ReplyDeleteहा विषया वर थोडा प्रकाश टाकावा म्हणजे नाण्याची दुसरी बाजू सुद्धा समजून येईल अशी आशा👍
🙏
वैभवजी, छत्रपतींचा मृत्यू झाला रायगडावर आणि विषप्रयोग झाल्याची अफवा आली गोवळकोंड्याहून..यावर कितपत विश्वास ठेवावा..?
Deleteप्रत्यक्ष शिवछत्रपतींचे सुपूत्र राजाराम महाराज यांच्यासमोर सभासद राजांना ज्वराची व्यथा झाली म्हणतो..पुन्हा शिवछत्रपतींस विषप्रयोग होणे ही साधीसुधी घटना नाही ,असे झाले असते, तर शिव-शंभुछत्रपतींच्या काळातील कागदांत त्याचे पडसाद निश्चित उमटलेले दिसले असते !!
त्यामुळे विषप्रयोग ही अफवाच..!
Khup sundar sir .dhanywad
ReplyDeleteआता आमच्या मनात काहीही शंका नाहीत धन्यवाद 🙏 🙏 🙏 पाध्ये साहेब
ReplyDeleteअप्रतिम मार्गदर्शन गुरुजी
ReplyDelete