Skip to main content

राजा शंभूछत्रपती

आपल्या पराक्रमाने सर्व दिशा उजळून टाकणाऱ्या स्फुरोत्प्रतापोज्ज्वलदिग्विभागः शंभूराजांना आदरपुर्वक मुजरा.....

     राजा शंभूछत्रपती

  महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश!! राकट देश,कणखर देश..या दगडांच्या देशात जगन्मातेने दोन उत्तुंग लेणी कोरली.पहिलं लेणं म्हणजे विधात्याने सह्याद्रीच्या कळसावर चढवलेला राजमुकूटच-राजा शिवछत्रपती!!आणि दुसरं लेणं म्हणजे या राजमुकूटावर शोभून दिसणारा हि-यांचा शिरपेचंच जणू,हिऱ्यांइतकाच तेजस्वी आणि कणखर - राजा शंभूछत्रपती!!

  स्वराज्य- स्वभिमानाने चेतवलेलं पवित्र अग्निकुंड!! जिजाऊ आणि शहाजीराजांनी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत हे अग्निकुंड मांडलं.. शिवरायांनी पाहता पाहता हा वन्ही चेतवला,महाराष्ट्रधर्म जागवला;महाराष्ट्राच्या कणाकणांतून स्वाभिमानी उर्जेचा कल्लोळ जागवला.या पवित्र यज्ञाची धुरा शंभूराजांनी सांभाळली;प्रसंगी त्यात स्वतःची आहुती दिली;पण हे अग्निकुंड तसंच धगधगतं ठेवलं.

  संभाजी,सहस्त्रसुर्यांच्या दाहकतेलाही नमवतील,अशी ही तीन तेजस्वी ओजस्वी अक्षरं!संभाजी म्हणजे धगधगता स्वाभिमान,संभाजी म्हणजे शौर्य,संभाजी म्हणजे धैर्य,संभाजी म्हणजे रूद्र,साक्षात शंकर!! शत्रुच्या मस्तकावर पाय रोवून तांडव करणारा सांब सदाशिव! संभाजीराजांचं चरित्र म्हणजे शौर्यशील पण बेफिकीर, कोपिष्ट पण हळव्या व्यक्तीत्वाचा अविष्कार!!

  शंभूराजांचा जन्म झाला (१४मे १६५७) आणि दोनच वर्षांत ते मातृछायेला मुकले.स्वराज्यातील तमाम रयतेवर ज्यांनी मातृत्वाची छाया धरली,त्या जिजाऊंनी शंभूबाळावर मायेची पाखरण घातली.शिवरायांच्या देखरेखीखाली शंभूराजे शास्त्र,पुराण,युद्धकला,राजनिती इत्यादी विद्यांमध्ये पारंगत झाले.वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी 'बुधभूषणम्' हा राजनिती,राजाची कर्तव्ये,शिवाजी महाराज,हिंदू दैवते अशा विविध विषयांवर भाष्य करणारा संस्कृत ग्रंथ रचला.त्यापुढेही त्यांनी नखशिखा,सातसतक्,नायिकाभेद आदि ग्रंथ रचले.

  शिवरायांसमवेत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शंभूराजे राजकारणात सक्रीय झाले.पंधराव्या वर्षी शंभूराजे युद्धभुमीवर जाऊ लागले.अॅब कॅरे हा फ्रेंच समकालीन प्रवासी लिहितो,'हा युवराज(संभाजी) लहान असला,तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या किर्तीस शोभेल असा शूर वीर आहे.आपल्या युद्धकुशल बापाच्या समवेत तो युद्धकलेत तरबेज झाला असून एखाद्या वयोवृद्ध सेनापतीशी त्याची बरोबरी करता येईल इतका तो तयार झाला आहे.सैनिक त्याला शिवाजीइतकाच मान देतात.फरक इतकाच आहे,की संभाजीच्या नेतृत्वाखाली ते काम करण्यात धन्यता मानतात.ज्यांच्यावर तो(संभाजी) स्वारी करणार ते त्याच्या(संभाजीच्या) केवळ नावाच्या दरा-याने पळून गेले.या बालराजाची सर्वत्र इतकी वाहवा होते,की खास त्याच्या बापालाही काही हेव्यादाव्याच्या उर्मी असतील तर त्याचा(संभाजीचा) हेवा वाटावा.'

  शिवरायांच्या राज्याभिषेकसमयी संभाजीराजे स्वराज्याचे अभिषिक्त युवराज झाले(इ.स.१६७४).शिवरायांच्या बरोबरीने राज्यकारभार पाहू लागले.संस्कृत भाषेचे जाणकार व अभ्यासक,शास्त्रार्थाचे अर्थज्ञ संभाजीराजे स्वायत्त निर्णय घेत असत.तारूण्याच्या कैफात अविचाराने एखादा निर्णय घेतलाच,तर बेधडकपणे तो पूर्णत्वाला नेऊन होणा-या परिणामांना तोंड देण्याची धमक संभाजीराजांमध्ये होती.नेमकी हिच गोष्ट शिवरायांच्या मंत्रिमंडळाला रूचली नाही.तरूण संभाजीराजांचा बेफिकीर आणि कोपिष्ट स्वभाव,स्पष्टवक्तेपणा यामुळे युवराज व मंत्रिमंडळ यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागले. जिजाऊंच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने पोरके झालेले शंभूराजे, स्वराज्याच्या धामधुमीत व्यस्त असलेल्या शिवरायांपासून दुरावले गेले.

शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असताना,संभाजीराजे दक्षिण कोकणातील प्रभावळीच्या सुभ्याचे कामकाज पहात होते(इ.स.१६७६-१६७८).तेथे त्यांनी राज्यकारभारासोबत व्यायाम,काव्य-शास्त्र इत्यादी गोष्टींत मन रमविले. आपल्यावर आलेली अनिष्टे टळावीत,यासाठी कलशाभिषेक करून घेतला. शाक्तपंथीय साधुंच्या सल्ल्यानुसार कालीमातेची आराधना आरंभली. शाक्तपंथात मोक्षप्राप्तीसाठी मांसाहार,मत्स्याहार,मद्यपान,स्त्री-सहवास आदी मार्ग सांगितले जातात. यामुळे स्वराज्यात संभाजीराजांबद्दल भलत्या-सलत्या बातम्यांचे पेव फुटले. कर्नाटकाच्या स्वारीहून परत येताच संभाजीराजांविरूद्धच्या कागाळ्यांनी शिवराय व्यथित झाले व त्यांनी संभाजीराजांची भेट न घेताच त्यांना सज्जनगडावर जाऊन समर्थांच्या सहवासात जाऊन राहण्याची आज्ञा केली.

घरातून मिळणाऱ्या सावत्र वागणूकीमुळे संभाजीराजे आधीच व्यथित झाले होते. मंत्रिमंडळाशी होणारे सततचे कलह व प्रत्यक्ष शिवरायांची झालेली गैरमर्जी यामूळे दुखावले जाऊन,आपणही आपला पराक्रम सिद्ध करावा, स्वबळावर काही मिळकत करावी अशा अविचारापोटी संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले (१३ डिसें१६७८). दिलेरखानाकडून मिळणारी दुय्यम वागणूक,मोगली सैन्याचे क्रौर्य,स्वतःच्या चुकीची झालेली जाणीव यामुळे पश्चातापदग्ध संभाजीराजे जवळपास एक वर्षाने स्वराज्यात परत आले(४ डिसें. १६७९). शिवछत्रपती व्यंकोजीराजांना लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात, "चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईंत गेले होते.... ....घरोब्याचे रीतीने जैसें समाधान करून यै तैसें केलें.." (शि.प.सा.सं. ले. २२२६)

  शिवरायांच्या मृत्यूसमयी मोगली फौजा स्वराज्याच्या सीमेवर जमा होऊ लागल्या होत्या (इ.स.१६८०). कोल्ह्याप्रमाणे कावेबाज असलेली मोगली सत्ता अजस्त्र अजगरासारखी स्वराज्याचा घास घेऊ पाहत होती. औरंगजेबाशी होणाऱ्या या निर्णायक लढाईनंतर जे उरेल तेच खरे स्वराज्य याची शिवरायांनाही जाणीव होती;पण हे महाराष्ट्राचे केवळ दुर्दैवच,की या स्वराज्याचा संसार अर्ध्यावर असतानाच शिवप्रभु पंचत्वात विलीन झाले(३ एप्रिल १६८०). संभाजींची कठोर शिस्त,तापट वृत्ती,यापूर्वीच्या वर्तनाने डागाळलेली प्रतिमा यामुळे छत्रपती म्हणून संभाजी मंत्रिमंडळाला नकोसे झाले होते. औरंगजेबाच्या रूपात अजस्त्र संकट चालून येताना पाहून कोणीही सामान्य योद्धा गर्भगळीत झाला असता. अशा वेळी कोणी लोभी,नशाबाज,व्याभिचारी माणूस तो काटेरी मुकूट डोक्यावर चढवून लढा पुकारण्याऐवजी अलिप्त होऊन भोग विलासात रममाण झाला असता. कोणा कचदिल व्यक्तीने सहा महिने-वर्षभरात शस्त्र खाली ठेवले असते,तर आजचा महाराष्ट्र दिसलाच नसता;पण शिवरायांचा छावा सह्याद्रिच्या दऱ्याखोऱ्यात पाय घट्ट रोवून उभा राहिला.

  शंभूराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला(१६ जाने. १६८१).आधीपासून मंत्रिमंडळाशी उडणारे खटके,एकमेकांबद्दलची कलुषित मनं यामुळे निमित्त होऊन संभाजींनी काही जणांना मृत्यूदंड देऊन आपला वचक बसवला व एकछत्री अंमल प्रस्थापित केला. पण राज्य म्हणजे काही केवळ राजा नव्हे. स्वराज्याची कधीही भरुन न येणारी हानी झाली होती. एकमेकांबद्दलची मने स्वच्छं नाहीत म्हटल्यावर बाकी मंत्रिमंडळ मागे पडून एकटा कवि कलश तेवढा 'कुल-एखत्यार' झाला ! आता घडल्या चुकांचे चटके सोसत हिंमतीने पाय रोवून लढायचे होते.

  शंभूराजांच्या शिरावर छत्रचामरे ढळली.शंभूराजे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती झाले,त्यासमयी ते अवघ्या तेवीस वर्षे वयाचे होते.राज्यसाधना म्हणजे सोन्याच्या सिंहासनावर बसून केलेली कठोर तपश्चर्या!राजा म्हणजे देहावर अलंकार वागवणारा वैरागी!शंभूराजाच्या या वैराग्याला दुसरेही एक अंग होते- शिवशंकराचे!राज्याभिषेक होताच या शंकराने त्रिनेत्र मोगली सत्तेच्या उरावर रोखले.



  बुऱ्हाणपूर शहर म्हणजे मोगली सत्तेच्या अंगाखांद्यावर रूळणारा लखलखता दागिना!एखाद्या सौंदर्यवतीच्या गालावरील तीळ शोभावा तसे मोगलांच्या राज्यात बुऱ्हाणपूर खुलून दिसते,असे त्या शहराचे वर्णन केले जाई.शंभूराजांनी या संपूर्ण शहराची राखरांगोळी करून मोगलांच्या वर्मावरच घाव घातला.खुद्द औरंगजेबाच्या नावाने वसवलेले औरंगाबाद शहर, सरनोबत हंबीररावांनी जाळून,लुटून फस्त केले. वऱ्हाड,खानदेश,सोलापूर,अहमदनगर,पेडगाव या मोगली मुलखात सैन्य पाठवून लुटालूट केली.(इ.स. १६८२) औरंगजेबाच्या अंगाची लाही लाही झाली.औरंगजेबाचा मुलगा,अकबर आपल्या बापाशी बंड करून थेट महाराष्ट्रात पळून आला; संभाजीराजांच्या आश्रयाला!

 औरंगजेबाला बसलेली ही एक सणसणीत चपराक होती.औरंगजेबाचा अहंकार भयंकर दुखावला गेला.सर्वशक्तीनिशी आता महाराष्ट्रात स्वतः उतरण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते.खरंतर ह्याची तयारी औरंगजेबाने शिवाजीराजांच्या हयातीतच चालू केली होती;आता ती वेळ समीप येऊन ठेपली होती.

  खुद्द औरंगजेब स्वतः चालून येतोय म्हटल्यावर,भल्याभल्यांचे डोळे विस्फारले.मोगल साम्राज्य म्हणजे आशियातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक साम्राज्य आणि स्वराज्य तर नुकतंच बाळसं धरु लागलं होतं.तीन लाखांची शाही फौज आणि प्रचंड खजिना घेऊन मोगली वादळ घोंघावत आलं वाटेत इतर अनेक समर्थक औरंगजेबास येऊन मिळणार होते आणि स्वराज्यातील कुल फौज एक लाख पाच हजाराची!!वयाच्या तेविसाव्या वर्षी हा मोगली आक्रमणाचा महापूर थोपवून धरणे हे एका समरधुरंधराचेच काम !

  अंधाऱ्या आकाशात वीज लखलखावी तसे शंभूराजे पेटून उठले.पुन्हा एकदा भवानी तलवार परजली,आकाशाकडे रोखली; संभाजीराजांचे जीवनाचे इंगितंच हे होते,"तीर्थरूप आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणें आम्हांस अगत्य !" संभाजीराजांची शिकवणूकंच अशी होती; 'स्वराज्य म्हणजे श्रींच्या कृपाप्रसादाने आबासाहेबांनी निर्मिलेले गोमटे राज्य; ही भुमि आपली,इथली माती आपल्या पूर्वजांच्या रक्ताने अभिषिक्त झाली आहे.ज्यांची मने मेलेली असतात,शरीरं दुर्बल असतात त्यांना पारतंत्र्यातच सुख वाटते.गड्यांनो,या भुमातेच्या रक्षणार्थ,छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रधर्मार्थ,लढा ऽ,उभे रहा ऽ ,संघर्ष करा ऽ,हर हर ऽ  महादे ऽ व.....!!! "

  महाराष्ट्रात रणकुंड पेटले.स्वार्थाविरूद्ध स्वाभिमान प्राणपणाने लढत होता आणि थोड्याच काळात औरंगजेबाच्या साऱ्या इच्छा-आकांक्षा धुळीला मिळाल्या.तीन लक्ष फौजा,नवीन राजा,सर्व बाजूंनी चढाई;औरंगजेब म्हणजे फोडाफोड कपटनीतीचा तज्ञ व युद्धशास्त्राचा ज्ञाता; जय औरंगजेबाचेच होईल असे त्रयस्थांना वाटले खरे,पण औरंगजेबाला मराठ्यांनी असे काही तोंड दिले, की १६८५मध्ये मराठी मुलखातल्या फौजा औरंगजेबाने मागे घेऊन विजापूर-गोवळकोंड्याकडे वळवणे. मराठ्यांनी मोगलांना जेरीस आणले.रात्रीच्या अंधारात मोगली सैन्य जीव मुठीत धरून पहुडलेले असावे,अचानक शे-पाचशे मावळ्यांच्या फौजेने येऊन मोगलांच्या छाताडावर पाय देऊन थयथयाट करावा;दिसतील तेवढ्यांना मराठ्यांनी कापून काढावं आणि अचानक पसार व्हावं हे नित्याचेच झाले.स्वराज्याचे पहिले सरनोबत,हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत मोगली सैन्यास कितेकदा आसमान दाखविले.१६८४पर्यंतच्या युद्धात मराठ्यांविरूद्ध लढाईच्या मार्गाने औरंगजेबाला एकदाही उल्लेखनीय यश मिळाले नाही. नाशिकचा रामसेज किल्ला तब्बल पाच वर्ष लढला. आदिलशाही,कुतूबशाहीसारख्या अनुभवी,बुलंद सत्ता मोगलांसमोर जेथे वर्षभरात कोसळल्या तेथे मराठ्यांनी मोगलांच्या तोंडचे पाणी पळवले.रोगराई,भ्रष्टाचार आणि मराठ्यांचा गनिमी कावा यांनी मोगलांना त्राही त्राही करून सोडले.

  संख्याबळ कमी असलं,तरी मुठभर मावळ्यांचं मनोबल आभाळाएवढं विशाल होतं.कुठून आलं हे इतकं बळ?उद्या जर आमच्या देशातील घराघरांतून सोन्याचा धुर निघणार असेल,तर मग आज आमचं घर जळलं तरी बेहत्तर या भावनेने ही माणसं लढत होती.आजचा महाराष्ट्र दिसावा म्हणून कोणाचा हात तुटत होता,कोणाचा पाय तुटत होता,कोणाचं शिर तुटत होतं,संसाराची,घरादाराची राख होत होती;पर्वा नाही.त्या सर्व वीरांसमोर एकच ध्यास होता- स्वराज्य!आज या स्वातंत्र्यवीरांचा विसर पडणं,हे करेंटपणाचं लक्षण आहे.

  संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला रायगडावर!पण तेथे ते फार काळ टिकलेच नाहीत.त्यांनी आपले सिंहासन जणू घोड्यावरंच लादले आणि ते सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये वादळासारखे घोंघावत सुटले.आदिलशाही,कुतूबशाही व मराठेशाही अशा तिन्ही पातशाह्या एकत्र करून मोगलांवर घाला घालण्याचे उच्च दर्जाचे राजकारण त्यांनी आखले होते. अंबरचा राजा रामसिंह याला पत्र लिहून दिल्लीच्या तख्तावर झडप घालण्याचा हेतू त्यांनी स्पष्ट केला;पण दुर्दैवाने त्यांना ही साथ लाभली नाही.पित्याचा अकाली मृत्यू,त्यापाठोपाठ जुन्या शत्रुंनी खाल्लेली उचल,विश्वासघातकी स्वकियांची फंदफितुरी आणि औरंगजेबाच्या रूपाने समोर ठाकलेले अजस्त्र जिवघेणे संकट;नुसत्या विचाराने छाती दडपून जाते,तिथे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी या शिवपुत्राने ही जबाबदारी स्विकारली.जंजिरेकर सिद्दिला जरब बसवली आणि धुर्त सत्तापिपासू इंग्रजांना आपल्या आक्रमक वृत्तीची चुणूक दाखवली.पोर्तुगीजांना जेरीस आणले.कर्नाटकाचा काही भाग जिंकून स्वराज्याला जोडला.जंजिऱ्याला भर समुद्रात सेतु उभा करण्याच्या धाडसी प्रयत्नातून शंभूराजांची आक्रमक वृत्ती,दुर्दम्य इच्छाशक्ती,अजोड युद्धनिती या सर्वच बाबींचा प्रत्यय येतो.वयाची तिशी गाठण्याअगोदरंच केवढी तरी उत्तुंग भरारी शंभूराजांनी घेतली. औरंगजेब इतका जेरीस आला,की त्याने स्वतःच्या डोक्यावरचा किमाॅश उतरवून,संभाजीला मारेपर्यंत पुन्हा डोक्यावर किमाॅश चढवणार नाही,अशी शप्पथ घेतली ३१मार्च १६८६ च्या पत्रात इंग्लंडच्या राजाने मुंबई आणि सुरत येथील वखारीच्या अधिका-यांना लिहिलेल्या पत्रांत संभाजीराजा हा युद्धसंमुख राजा(Warlike Prince)आहे,त्याच्याशी काळजीपूर्वक वागा,असा उल्लेख आहे.औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान म्हणतो,'धामधुमीच्या बाबतीत त्याच्या (शंभूराजांच्या) बापापेक्षाही त्याचा (शंभूराजांचा) दुर्लौकीक झाला होता.' यातून संभाजीराजे मोगलांसाठी किती तापदायक झाले होते,याचा प्रत्यय येतो.

  संभाजीराजांना पकडून देण्यात खुद्द त्यांच्या साळयानेच मदत केली. गणोजी शिर्केने इथल्या जनमनाची एक काळीकुट्ट बाजू दाखवून दिली.औरंगजेबाच्या छावणीत चाळीस दिवस संभाजीराजे आणि त्यांचा प्रमुख सल्लागार,'कुलेखत्यार',कवी कलश या दोघांचेही अतोनात हाल करण्यात आले.

  संभाजीराजांना कैद करून,त्यांची धिंड काढत,चिखलफेक करत औरंगजेबासमोर आणण्यात आले.संभाजीराजांनी आपली जळजळीत दृष्टी औरंगजेबावर रोखली.त्या शिवतेजाकडे पाहता पाहता औरंगजेबाला भोवळ आली.स्वार्थी सत्ताधाऱ्याला स्वाभिमानी क्षात्रतेजाशी नजर भिडवणे कठीण गेले.संभाजी हाती आला,तरी दख्खन जिंकण्याचे आपले स्वप्न केव्हाच बेचिराख झाल्याची औरंगजेबाची खात्री पटली.हताश होत,संतापाने औरंगजेब बोलता झाला,"काफरबच्चा संभा की दोनो आंखे जला के इसे एक नयी नजर दि जाय!."आदेशाची तातडीने अंमलबजावणी झाली.लोखंडी सळया लाल होईपर्यंत तापवल्या गेल्या आणि.....आणि स्फुल्लिंगाला स्फुल्लिंग भिडले.शिवपुत्राची दृष्टि अवघे ब्रह्मांड व्यापती झाली.पाठोपाठ जिभ उपटून काढण्यात आली.नखे उपटली जाऊ लागली.शरीरावरची चामडी सोलून,त्यावर मिठाचे पाणी ओतले जाई.कणाकणाने शंभूदेहाचा जिव शिवाशी एकरूप होत होता.कशासाठी सहन करत होतास हे शंभूराजा?एका महान राज्यकर्त्याची पोटी जन्माला आलेला राजपुत्र तू,संस्कृत भाषेचा पंडीत म्हणून काव्यशास्त्र-विनोद करत चैनीत आयुष्य घालवु शकला असतास..नाही!'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' असे म्हणणा-या 'बहुत जनांसी आधारू'अशा श्रीमंत योग्याचा पुत्र तु!स्वातंत्र्यदेवतेच्या साधनेचे हे वाण फक्त तुच स्विकारू शकला असतास..

  फाल्गुन वद्य अमावस्येच्या दिवशी शंभूराजांचा जिव शिवाशी एकरूप झाला(११ मार्च १६८९) आणि ही अमावस्या मृत्युंजय अमावस्या ठरली.आपल्या कर्तृत्वाने शंभूराजे  मृत्यूवर जय मिळवते झाले.'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि..' हे गीतेतलं तत्वज्ञान धर्मांधळ्या औरंगजेबाला कधी उमगलेच नाही.मृत्यूपश्चात औरंगजेबाच्या आदेशानुसार शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून इतस्ततः फेकण्यात आले.जवळंच भीमा आणि इंद्रायणी नद्यांचा संगम होता.शंभूराजांच राजेशाही रक्त त्या नद्यांच्या पाण्यात मिसळून एकजीव झालं.महाराष्ट्राच्या कणाकणाला ही जाज्वल्ल्य शंभूगाथा सांगत त्या महाराष्ट्रगंगा संथ आजही वाहत आहेत....

- ©डॉ. सागर पाध्ये




Comments

  1. अदभूत असे शंभू चरित्र ... !!
    धन्य जहालो .... आपली वाणी.... उत्कुरष्ठ लेखन ..

    ReplyDelete
  2. मनःपुर्वक धन्यवाद _/\_

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा...

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय...

Chhatrapati Shivaji and his Maharashtra-dharma (The religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj)

It is a rule of Historiography, that to draw any inference about a historical figure, one must consider at least three different types of contemporary facts – first, words and deeds of that person himself or his close associates; second, views of his enemies and third, convictions of any third person or neutral authority! Now a days the religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj is often debated, sometimes for political or other interests by different people, parties and institutions. However, by studying ample of available evidences in aforementioned fashion, a conclusion can easily be made. The very first thing that we should bear in our mind is that we are discussing an era of strong religious beliefs. Customs and living of people were greatly influenced by sayings of religious scriptures. For almost three hundred years before Chhatrapati Shivaji, India was ruled by Muslim invaders, majority of them proved to be fanatics. For every new territory conquered, Hindus we...