Skip to main content

इतिहास - अर्थ,व्याप्ती आणि भुमिका (ले. रियासतकार गो. स. सरदेसाई)

‘लोकशिक्षण’ मासिकात डिसेंबर १९३२ मध्ये रियासतकार ‘गो. स. सरदेसाई’ यांनी लिहिलेला हा लेख,’मराठी रियासत’ च्या नवीन आवृत्त्तीत पुनश्च दिला आहे.सुमारे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षांपुर्वी रियासतकारांनी मांडलेले हे विचार पाहिले,तर हे सरस्वतीपुत्र खरंच आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करत होते,हे पटल्याशिवाय रहात नाही.
 त्या लेखाचा हा काही भाग-
  राष्ट्रीय इतिहास : अर्थ व्यात्प्ती आणि भुमिका

History is always growing and for this reason it always needs to be rewritten. History is a progressive science, not merely because new facts are constantly being discovered , not merely because the changes in the world give to old facts a new significance, but also because every truly penetrating and original mind sees in the old facts something which had not been seen before. (James Bryce, British historian)

…. इतिहास स्थिर नाही व निश्चितही नाही,ही गोष्ट दुसऱ्या एका दृष्टीनेही पटणारी आहे.एकाच व्यक्तीसंबंधाने इतिहासाचा अभिप्राय कसा वारंवार बदलत जातो याची उदाहरणे व्यवहारात आपल्या दृष्टीने कितीतरी येतात.कित्येकदा यशापयाशावरून मनुष्याची योग्यता ठरविली जाते.एकाच व्यक्तीच्या शत्रुमित्रास ती योयता भिन्न वाटते.औरंगजेब व शिवाजी महाराज यांची योग्यता निरनिराळ्या समाजांत निरनिराळी वाटणे शक्य व काही प्रसंगी अपरिहार्य आहे.इ.स.१९१४ मध्ये युरोपात महायुद्ध सुरू झाले.त्यापुर्वीच्या जर्मनीचा इतिहास व त्यानंतरचा त्याच राष्ट्राचा इतिहास यांत महदंतर पडले आहे.अशा प्रचंड घडामोडीने पूर्वी निश्चित वाटलेले सिद्धान्त साफ बदलून जातात.खुद्द कैसरबादशहाची कर्तबगारी पुर्वी किती जगभर गाजली होती आणि आज त्याबद्दल लोकमत काय आहे ते मनात आणावे.नाना फडणिसाची,महादजी शिंद्याची,किंवा अहल्याबाईंची योग्यता अशाच दृष्टीने त्या त्या भावनेनुसार बदलत जाणारी असते हे कित्येकांच्या लक्षात राहत नाही आणि परस्परविरोध किंवा असंबंद्धता पुढे करून ते लेखकास दोष देतात.इतिहास सतत बदलत आहे हे त्यांच्या ध्यानात येत नाही.तो असा बदलतो यातच त्याचा उपयोग आहे.इतिहासास वेदस्मृतीचा अचल साचा प्राप्त झाला की,त्याचा उपयोग संपला असेच समजावे.

हे बदलत जाणारे इतिहासाचे स्वरुप पुष्कळांच्या नजरेस न आल्यामुळे भलतेच वाद उपस्थित होतात.प्रत्येक इसम खरे काय ते सांगा,असा सवाल इतिहासकारास खरे काय ते सांगा,असा सवाल इतिहासकारास करीत असतो तुम्ही असा गोंधळ का उडवून देता,एक ठाम मत का सांगत नाही,असे लोक विचारीत अहतात.त्यातून पानिपतासारखा गुंतागुंतीचा प्रसंग चर्चेस निघाला म्हणजे सदाशिवराव भाऊ किंवा मल्हारराव होळकर अशा ऐतिहासिक व्यक्तींची कशी राळ उडते ते आपण पाहतो.खरे पाहता मोठमोठ्या सर्वमान्य ऐतिहासिक ग्रंथातसुद्धा एखाद्या गतकालीन प्रसंगसंबंधाने निर्णीत सत्य फार थोडे असते.ग्रंथास महत्व प्राप्त होते ते त्यातील विवेचनपद्धतीमुळे,सत्यनिर्णयामुळे नव्हे.

….उभयतांनी आपापल्या भावना व्यक्त केल्यावर एकमेकांचा द्वेष करण्याचे किंवा नावे ठेवण्याचे काही कारण नाही.शिवाय ,अशा मतभेदामुळे इतिहासाचा झाला तर फायदाच आहे,नुकसान काहीही नाही.

….कोणताही इतिहास घेतला तरी त्यात दोन अंगे असतात,एक संशोधन व दुसरे अनुमान किंवि निष्कर्ष .दोनही अंगांची उजळणी व चर्चा एकसारखी चालूच राहते.मात्र सामान्य वाचकास संशोधनात्मक भागाचे महत्व विशेष वाटत नाही.किंबहुना तो भाग समजून घेण्याची त्याच्या अंगी पात्रताही नसते.

…साधनांची योग्यता ठरविताना किंवा त्याजपासून अनुमाने काढताना जी तर्कपद्धती प्रत्येकजण उपयोगात आणतो ती सर्वांची एकच असू शकत नाही.ती ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे किंवा अनुभवाप्रमाणे बदलत असते यामुळे मतभेद उत्पन्न होतात.असा सुक्ष्म विचार आपण करू लागलो आणि मतभेदाची कारणमीमांसा लक्षात आणिली,म्हणजे बुद्धीत सहिष्णुत्व उत्पन्न होऊन आपणहून भिन्न मत धारण करणाऱ्यांना दोष देण्याची प्रवृत्ती कायम राहत नाही.अर्थात शास्त्राच्या वाढीस मतभेद व सहिष्णुत्व या दोहोंचीही आवश्यकता आहे.

-रियासतकार गो. स. सरदेसाई

https://www.facebook.com/Maharashtradharma1may/

http://sagarpadhye.blogspot.in/?m=1

Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा...

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय...

Chhatrapati Shivaji and his Maharashtra-dharma (The religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj)

It is a rule of Historiography, that to draw any inference about a historical figure, one must consider at least three different types of contemporary facts – first, words and deeds of that person himself or his close associates; second, views of his enemies and third, convictions of any third person or neutral authority! Now a days the religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj is often debated, sometimes for political or other interests by different people, parties and institutions. However, by studying ample of available evidences in aforementioned fashion, a conclusion can easily be made. The very first thing that we should bear in our mind is that we are discussing an era of strong religious beliefs. Customs and living of people were greatly influenced by sayings of religious scriptures. For almost three hundred years before Chhatrapati Shivaji, India was ruled by Muslim invaders, majority of them proved to be fanatics. For every new territory conquered, Hindus we...