काय आहे, कोणाकोणाची फॅशन असते, प्रत्येक गोष्टीचं खापर भुतकाळावर फोडायचं. अमुक झालं नसतं, तर तमुक केलं असतं असे सुस्कारे सोडायला आवडतं काहींना ! कोणाकोणाच्या पोटापाण्याचा धंदा असतो हा. एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीला भडकवायचं आणि मग भावनेचं राजकारण करुन दुसऱ्या जातीची सहानुभूती मिळवायची.
जन्मजात स्वत:ला उच्च मानून इतरांना 'नीच' म्हणत त्यांच्यावर अन्याय करण्याचं समर्थन कधीही मी करणार नाही; पण प्रश्न असा, मागासवर्गीयांचा विकास करायचा तर तथाकथित उच्चवर्णीयांना, देशाच्या प्राचीन धर्म-परंपरा आणि संस्कृतीला शिव्या दिल्याच पाहिजेत का ? जरा काही झालं का मनुवाद-मनुवादी म्हणत गळे काढण्याची गरज असते का ? जातीवाद मनुने किंवा ब्राह्मणांनी खरंच निर्माण केला का ? संपुर्ण जातीव्यवस्थेला केवळ एक ग्रंथ आणि एकाच जातीची साडेतीन टक्के लोकसंख्या जबाबदार असू शकते का ?
जातीयवादास 'मनुवाद' संबोधत असाल, तर फक्त एकाच धर्माला, एकाच संस्कृतीला, एकाच जातीला शिव्या देणं आणि दुसरीकडे सोयीस्कर डोळेझाक करणं, हा नवा 'पुरोगामी मनुवाद' नव्हे काय ?
कोणी काहीही म्हणायचं आणि आम्ही 'होय हो..' म्हणत रडायचं, हे करण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्रंथांचं वाचन का करु नये ?
असो, आता आपण प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात पाहू,
"प्रत्येक देशात एक विधीदाता (घटनाकर्ता) असतो, जो आपात्कालीन स्थितीत पापी समाजाला न्याय आणि सदाचरण यांचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार म्हणून उदयास येतो. मनु, भारताचा विधीदाता ( law-giver हा शब्द आ. बाबासाहेबांनी वापरलाय बरं, नाहीतर दुसरं कोणी वापरला की काही लोकांना पोटशूळ उठतो.); तर मनु, भारताचा विधीदाता, जर खरंच अस्तित्त्वात होता, तर तो नक्कीच एक धाडसी मनुष्य होता. जर त्याने जातीव्यवस्था निर्माण केली, ही गोष्ट सत्य मानली, तर मनु हा एक साहसी मनुष्य मानला पाहिजे आणि मग ज्या समाजाने त्याचा स्विकार केला तो समाज आज आपण ज्या समाजात राहतो त्यापेक्षा वेगळा असलाच पाहिजे. जातीव्यवस्थेचा कायदा निर्माण केला गेला (जातीचा कायदा दिला) ही गोष्टच अकल्पनीय आहे. असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही, की नुसत्या चार शब्दांच्या बळावर स्वत: मनुही अशा कायद्याचं पालन करु शकणार नाही, जिथे एक वर्ण रसातळाला जाईल आणि दुसरा वर्ण प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल. सध्या या मनुपुरस्कृत व्यवस्थेचा अगदी सहजपणे ज्या प्रमाणात प्रचार झालेला दिसतोय; या कायद्यांतर्गत येणारी संपुर्ण लोकसंख्या स्वत:च्या अधिपत्याखाली आणून (असे) अन्यायी कायदे लोकांवर थोपवणारा तो एक कठोर शासक होता, असे मानल्याखेरीज हे शक्य झाले नसते. मी मनुबाबत कठोर भासत असेन. पण मनुचे भुत उतरवण्याइतके माझे बळ नाही. आजंही शरीरापासून मुक्त झालेल्या एखाद्या आत्म्याप्रमाणे मनु अस्तित्वात आहे आणि मला भिती आहे तो अजून बराच काळ जगणार आहे. एक गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे, की *मनुने जातींबद्दलचे कायदे निर्माण केले नाहीत (जातींचे कायदे दिलेले नाहीत), त्याला (एकट्याला) असं करणं शक्यही नव्हतं. जातीव्यवस्था मनुच्या फार आधीपासून होती. मनु त्याचा पुरस्कर्ता होता आणि त्याने त्याबद्दल विचारमंथन केले आहे. पण हिंदु समाजाची वर्तमानकालीन व्यवस्था निर्माण करणं त्याला शक्यही नव्हतं आणि त्याने तसं केलेलंही नाही.* प्रचलित जातीव्यवस्थेला त्याने संहितास्वरुप देण्यात आणि जाती-धर्माचा (वर्णाश्रमधर्म?) उपदेश करण्याइतपतंच त्याच्या कार्याची मर्यादा होती. जातीव्यवस्थेचा प्रसार आणि वृद्धी करणं हे इतकं विशाल आव्हान आहे, की ते कोणत्याही एकाच जातीच्या लोकांच्या शक्ती आणि युक्तीने साध्य केलं जाऊ शकत नाही. ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली अशा सिद्धांतांच्या दाव्यासही हेच लागू होतं. असा विचार करणं (की ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या) हे चुकीचं आहे आणि (यामागचा) हेतू द्वेषपुर्ण आहे हे मला लक्षात आणून द्यायचंय, याव्यतिरिक्त जे मी मनुबद्दल बोललो तेच इथे लागू होतं (त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही)."
Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches vol. 1 (castes in India) page no. 16
(सर्वांनाच वाचता यावं म्हणून मराठी भाषांतर दिलं आहे. तरी मुळ गाभ्यास धक्का लावलेला नाही. ज्यांना शंका आहे ते इथेच दिलेलं मुळ इंग्रजी लिखाण वाचू शकतात.)
डॉ. सागर पाध्ये
Comments
Post a Comment