एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीबाबत निष्कर्ष काढायचे म्हटले म्हणजे साधारणतः तीन प्रकारच्या व्यक्तींचे मत विचारात घ्यावे लागते. एक, ती व्यक्ती स्वतः किंवा त्या व्यक्तीच्या पक्षातील इतर व्यक्तींनी व्यक्त केलेले मत; दुसरे, व्यक्तीच्या शत्रूंनी व्यक्त केलेले मत आणि तिसरे, समकालीन त्रयस्थ व्यक्तीने व्यक्त केलेले मत ! आज आपण शिवछत्रपतींच्या धार्मिक धोरणाबाबत अशा तीन प्रकारच्या व्यक्तींचे मत पाहू -
सगळ्यात आधी महाराजांचा शत्रू महाराजांबाबत काय म्हणतो पाहू. खाफीखान हा औरंगजेबाच्या दरबारातील लेखक त्याच्या 'मुन्तूखुबू-ल-लुबाब-ए-महंमदशाही' या ग्रंथात म्हणतो,
"“Shivaji had always striven to maintain the honour of the people in his territories. He persevered in a cause of rebellion, in plundering carvans and troubling mankind; but he entirely abstained from other disgraceful acts, and was careful to maintain the honour of the women and children of Muslims when they fell into his hands. His injunctions upon this point were very strict, and anyone who disobeyed them received punishment." ( Mutakhab-ul Lubab English translation from The History of India as Told by Its Own Historians, Vol. VII, p.305. ) [शिवाजीने कायमंच आपल्या राज्यातील लोकांचा सन्मान राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तो कायमंच बंड उभारणे, काफीले लुटणे, लोकांना त्रास देणे यात अग्रेसर राहिला; पण इतर घृणास्पद कृती त्याने पुर्णतः टाळल्या आणि हातात सापडलेल्या मुस्लिम स्त्रिया व मुले यांचाही सन्मान राखला जावा म्हणून तो दक्ष असे. याबाबतीत त्याने अगदी कडक आदेश दिले होते, ज्याने कोणी (याबाबत) अवज्ञा केली त्यांना कठोर शिक्षा दिल्या.]
खाफीखान हा महाराजांच्या शत्रूपक्षातला माणूस, महाराजांनी आपल्या सैन्याला, सरदारांना लुटले म्हणून तो राग व्यक्त करतो, पण महाराजांच्या या सद्गुणाकडे शत्रूलाही दुर्लक्ष करणे कठीण झाले !
त्रयस्थ व्यक्ती म्हणून एका ख्रिश्चन व्यापाऱ्याने शिवाजी महाराजांविषयी व्यक्त केला केलेले मत पाहू.
"‘शिवाजी मोठा प्रबळ राजा असून सामर्थ्यवान अशा अनेक शत्रूंना न जुमानता त्याने सर्व कारभार धोरणाने चालविला आहे... ... त्याची प्रजा त्याच्यासारखीच मूर्तीपूजक असली, तरी तो सर्व धर्मांना नांदूं देतो. या भागांतील अत्यंत धोरणी पुरुष म्हणून त्याची ख्याती आहे." (शिवपसासं खंड १, ले. १२७९ )
याचवेळी एका इंग्रजी व्यापाऱ्याने औरंगजेबाबद्दल व्यक्त केलेले मत पाहिले म्हणजे शिवछत्रपती आणि औरंगजेब या दोघांमधला फरक चट्कन कळतो-
"राज्यकर्त्या मुसलमानांकडून त्यांच्या धर्मवेडामुळे बनिया व्यापारीवर्गावर असह्य जुलूम होत असतो. आपली मंदिरें भ्रष्ट होऊं नयेत, म्हणून बनिये लोक अपार लाच भरतात. त्याची चटक लागल्याने काझी व इतर अमलदार इतके सतत व क्रूरपणाने हिंदूंचा छळ करतात की, त्या दुःखभाराने वाकून, या प्रांतातून (सुरत) पळून जाण्याचा हिंदूंनीं निश्चय केला. एका इसमाला, पाच वर्षांपूर्वीं, काझीने खाल्लेल्या टरबुजाचा एक भाग खाल्ला, या सबबीवर जबरीने मुसलमान करण्यात आलें व त्यामुळे त्या इसमाने जीव दिला !" (शिवपसासं खंड १, ले. १२७५ )
"औरंगशहाने धर्मसुधारणेच्या अंध उत्साहाने अनेक हिंदू देवालयांचा विध्वंस केला आणि पुष्कळांना मुसलमान होणे भाग पाडले असून शिवाजीने त्याच्याशी पुन्हा युद्धा सुरू केले आहे." (शिवपसासं खंड १, ले. १२८१)
शिवाजी महाराजांची भुमिका अशी सामंजस्याची असली, तरी नेभळटपणाची नव्हती. धर्मांधांनी केलेल्या अन्यायाचा विरोध करणे म्हणजे परधर्मद्वेष नव्हे ! स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म याचा महाराजांना जाज्वल्य अभिमान होता. आणखी दोन त्रयस्थ व्यक्तींची मते सांगतो.
शिवचरित्र साहित्य खंड ८, लेखांक ४९ नुसार एका तामिळ हस्तलिखितातील उल्लेख पहा-
"'तिरुवन्नमलाई'येथील शिवाचे व समोत्तिपेरूमल याचे देवालय पाडून मुसलमानांनी मशिदी बनविल्या होत्या. शिवाजीने दोन्ही मशिदी नष्ट केल्या आणि तिथे शिवाच्या देवालयांची पुन: प्रतिष्ठापना केली."
शिवाजी महाराजांच्याच आज्ञेनेच महाराजांच्या दरबारातील रघुनाथपंत हणमंते यांनी लिहिलेल्या 'राज्यव्यवहारकोशात'ही या घटनेचा उल्लेख सापडतो. त्यावरून महाराजांच्या या कृतीची खात्री देता येते.
महाराजांचा समकालीन कृष्णाजी अनंत सभासद यांनी महाराजांचे कनिष्ठ सुपूत्र 'राजाराम महाराज' यांच्या आज्ञेवरून शिवचरित्र लिहिले. ते सभासद बखर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात महाराजांनी लष्कराची रित कशी ठरवली होती याबद्दल सभासद म्हणतो -
"लष्करांत बायको व बटकी व कलावंतीण नसावी जो बाळगील त्याची गर्दन मारावी पर मुलखात पोर बायका न धरावीं. मर्दाना सापडला तर धरावा. गाई न धरावीं. बईल ओझ्यास मात्र धरावा. ब्राह्मणांस उपद्रव न द्यावा. खंडणी केल्या जागां ओळखियांसी ब्राह्मण न घ्यावा. कोणी बदअमल न करावा."
सत्पुरुषांना, स्त्रियांना शक्यतो तोशीस देऊ नये याबाबत महाराज दक्ष असत. पण स्वत:स देवाची माणसं म्हणवणारे लोकांवर अन्याय करू लागले तर ? एक इंग्रजी पत्रातील उल्लेख पहा -
'गोव्याच्या व्हॉईसरॉयने रोमन कॅथॉलिक धर्म वगळता इतर धर्माच्या माणसांना हद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे अत्यंत कृद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या सरहद्दीवर स्वारी केली व तेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मियांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता (हे लक्षात ठेवून) त्यांनी स्वतः शिवाजीचा मराठा (हिंदू) धर्म नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला. यावरून घाबरून जाऊन व्हॉईसरॉयने आपला क्रूर आणि कडक हुकूम मागे घेतला. (शिवपसासं खंड १, ले. ११८६)
शिवछत्रपतींचे थोरले सुपुत्र, छत्रपती संभाजी महाराज यांनी २४ अॉगस्ट १६८० रोजी बाकरेशास्त्री नावाच्या ब्राह्मणाला एक दानपत्रं दिले. सदर पत्र सदाशिव शिवदे यांच्या 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' या पुस्तकात मराठी अनुवादासकट छापलेले आहे. त्यात संभाजीराजे आपल्या पित्याबद्दल म्हणतात,
"सर्व देवालयांचे रक्षण करण्यासाठी ज्याने जीव तृणासमान क्षुद्र मानला, क्षात्रधुरंधर, ज्याने शर्थीने पराक्रम केला, शत्रुच्या अडवणुकीला शर्थीने तोंड देवून सर्व म्लेंच्छांना धराशायी केले. अगणित देवालयांची स्थापना करून ज्याने शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याचा प्रसाद संपादन केला, निजामशाही अंमल सुरू झाल्यापाठोपाठ आलेल्या दुष्काळामुळे प्रजा व्याकुळ झाली असता तत्काळ उपाययोजना केली, चमकत्या विजेप्रमाणे (तरवार चालवून) ज्यांनी ताम्र आणि तुर्क यांना जर्जर करून सोडले. कलंकी(कल्की) अवताराप्रमाणे पराक्रम करून ज्याने आत्मीयतेने स्ववंशीयांना उच्चस्थानी बसवले, छत्र धारण केले, माहुलीगडाला वेढा पडलेला असताना प्रचंड उत्साहाने शत्रू घालवून स्वामिधर्माचे पालन केले. बाका प्रसंग ओळखून ज्याने योग्य पावले टाकून पराक्रम केला, गोंधळलेल्या आदिलशहाने दिलेल्या ऐश्वर्याने जो शोभू लागला. हिंदूधर्माचा ज्याने जीर्णोध्दार केला, ज्याच्या धाडसाने केलेला पराक्रम जो म्लेंच्छांच्या विनाशाला कारणीभूत झाला...."
इथे 'म्लेंच्छ, ताम्र आणि तुर्क' या तिनंही शब्दांचा अर्थ मुसलमान असा होता. शिवछत्रपतींनी 'हिंदूधर्माचा जीर्णोद्धार केला' असं संभाजी महाराज म्हणतात, त्यावरून या पितापुत्रांच्या धोरण व ध्येयाची कल्पना येते.
समकालीन कविराज भुषण म्हणतो,
"कासिहुकी कला जाती मथुरा मस्जिद होती, सिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी !"
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
"या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हाकारणें ।।"
निष्पापांबद्दल करुणा, कणव, परधर्मियांचाही सन्मान हा महाराष्ट्रधर्माचा गाभा आहे; पण निमुटपणे अन्याय सहन करणे ही 'सद्गुणविकृती' आहे ! इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या शब्दातंच सांगायचे, तर हिंदूधर्म हा 'सहिष्णू' होता; महाराष्ट्रधर्म 'जयिष्णू' आहे !
गुरुवर्य गजानन मेहेंदळे एका व्याख्यानात म्हणाले होते,
"तीन गोष्टी आहेत बघा.!! तुम्ही भाषा दुषित केली ती मी शुद्ध करणार, तुम्ही माणूस दुषित केलात, मी शुद्ध करणार, तुम्ही धर्मस्थान दुषित केलंत, मी ते शुद्ध करणार.. हा एक प्रकारचा चांगल्या अर्थानं हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता म्हणून ते महाराज झाले, आपण सामान्य माणूस.. !!"
बहुत काय लिहिणे, सुज्ञ असा !
डॉ. सागर पाध्ये
लेखात वापरलले संक्षेप -
१. शिवपसासं - शिवकालीन पत्रसारसंग्रह
व्वा! खुपच सुंदर लिहिलय. ससंदर्भ असल्यामुळे कुठेही एकांगी वाटले नाही. तुमच्या चॅनल मी नेहमी Follow करतो.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
Deleteखूपच छान
ReplyDelete