गणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे निधीनां त्वा निधिपति हवामहे वसो मम । आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम ।।
यजुर्वेदाच्या तेविसाव्या अध्यायात राष्ट्र आणि प्रजा या संकल्पनांचे विवरण आले आहे. त्यापैकी एकोणिसाव्या श्लोकात 'हे गणांच्या नायका गणपती, सर्व प्रिय पदार्थांचा प्रियपति, अर्थादी ऐश्वर्याचा निधिपती मी तुझा स्विकार करतो. मी (प्रकृती) तुला प्राप्त होते आणि समस्त प्रजेला धारण करणाऱ्या मला (प्रकृती) तू प्राप्त होवो', अशी परमेश्वराची प्रार्थना केली आहे !
वास्तविक उपरोक्त मंत्रात 'गणपती' या देवतेचा स्त्रीगणांचा अधिपती, पालक अशा अर्थाने उल्लेख आहे; किंवा प्रियपती, निधीपती हे उल्लेख 'वसू'चेही मानले जातात. या मंत्रासहीत इतर एकोणीस मंत्र ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात आहेत. वास्तविक याही मंत्रांची देवता ही 'बृहस्पती'असून, वर्तमानकाळात ज्या स्वरूपात गणपतीची पूजा केली जाते, तो गणपती वेदात अभिप्रेत होता का, यावर अभ्यासक शंका घेतात. वेदांचा काळ अभ्यासकांच्या मते इसवी सन पुर्व १५००वर्षे इतका पाठी नेला जाऊ शकतो. आजच्या काळाशी मिळत्याजुळत्या गणपती देवाच्या मुर्त्या इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात सापडतात. तर मुद्रांवर कोरलेले 'हत्ती' हे पाच हजार वर्षांपुर्वीच्या सिंधू संस्कृतीतही धार्मिक भावनेशी निगडीत असावेत असे दिसते.
एकदा हा उपरोक्त समाजप्रवाह लक्षात घेतला, तर यातून सारांशरुपाने असे सांगता येईल की, आपल्या देशात लोकांचा नायक, राष्ट्राचा संघटक या भावनेने 'गणपती' या देवतेची पुजा करण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. शारदेच्या सुपुत्रांचा हा आवडता देव आहे. मंगलकार्य असो वा एखादी कलाकृती, श्रीगणेशास पहिला मान देण्याची परंपराही नवीन नाही. छत्रपती संभाजी महाराज आपल्या बुधभूषणम् या संस्कृत ग्रंथाच्या सुरुवातीस म्हणतात -
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् ।
भक्तविघ्नहनने धृतर(य)त्नं तं नमामि भवबालकरत्नम् ।। (१.१)
गणेशोत्सव म्हटले म्हणजे ओघानेच नाव येते ते म्हणजे लोकमान्य टिळकांचे ! गणपती या देवतेला राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक ठरवून, गणेशोत्सवास राष्ट्रीय महोत्सवाचे स्वरूप टिळकांनी कशाप्रकारे दिले होते, हे त्यांच्याच उद्गारांवरून लक्षात येईल. १ सप्टेंबर १८९६रोजी राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता हा टिळकांनी लिहिलेला लेख केसरी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यात टिळक म्हणतात –
वर्तमानपत्रांचा उपयोग व फायदे मर्यादित आहेत, पण लोकशिक्षणाच्या कामी राष्ट्रीय महोत्सवांपासून अमर्याद फायदे करून घेता येतात. रामनवमीचे महोत्सव करणारे मठ, कमींत कमी शेसवाशे रामदास स्वामींनी महाराष्ट्रांत स्थापिले होते. ह्याच राष्ट्रीय महोत्सवांमुळे महाराष्ट्रातील धर्मबुद्धी त्यावेळी पूर्ण जागृत झाली. शिवरायासि आठवावे.., मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावा असली उदात्त वाक्ये राष्ट्रीय महोत्सवामुळेच महाराष्ट्रांतील आबालवृद्धांच्या तोंडी त्यावेळी बसून गेली ती गेली व त्यांचा परिणाम असा झाला की, औरंगझेब दक्षिणेंत प्रचंड सैन्यासह उतरला असता स्वधर्मरक्षणार्थ रांगणारी पोरेंही युद्ध करण्यास तयार झाली आहेत की काय असें त्यास वाटण्याइतका महाराष्ट्रदेश तयार झाला.
आजची काही गणेशोत्सव मंडळे, त्यातले श्रीगणेशपुजेचे पथभ्रष्ट स्वरुप, उत्सवांचे हिडीस प्रकार पाहता, त्यावर लिहले पाहिजे असेही कोणास वाटेल; पण काय चांगले काय वाईट हे ठरवण्याचा नीरक्षीरविवेक माणसाकडे नसतो काय ? अलीकडील काही वर्षांत महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्याही दारू पिऊन, डिजेवर नाचून, भररस्त्यात तलवारी परजून केल्याचे दुर्दैवी प्रकार आपल्याला दिसतात. याचा दोष जसा त्या महापुरुषांस किंवा त्यांच्या प्रामाणिक अनुयायांस देता येत नाही, त्याचप्रमाणे सण व उत्सवांच्याही भ्रष्ट स्वरुपाचा दोष ईश्वर वा धर्मावर कोणी लादण्याचा प्रयत्न करू नये. मला विचाराल तर या पथभ्रष्टतेचे मुळ कारण हे आपला धर्म आणि संस्कृतीचा पुरेसा अभ्यास नसणे, हेच आहे असे मला वाटते !
८ सप्टेंबर १८९६रोजी टिळकांनी राष्ट्रीय महोत्सवाचे वेळी सुशिक्षितांनी काय केले पाहिजे ? असा लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात –
राष्ट्रीयसभेला, आमच्या धर्मव्याख्यानांंना जमावे तितके लोक जमत नाहीत म्हणून आम्ही हांका मारतो; पण लोक जमतात त्या ठिकाणी आम्हांला जावयाला कुठे पाहिजे ? देव देतो पण कर्म नेते अशांतली आमची स्थिति झाली आहे. लोक एका ठिकाणी जमण्याचे प्रसंग पूर्वजांनी आयते तयार करून ठेविले, पण सुशिक्षित मंडळीला हे प्रसंग असून नसल्यासारखेच आहेत... ...लोकांत मिसळणारे उत्सवांचे सामान्य धोरण ध्यानांत ठेवून काम करण्यास झटणारे व उत्सवाद्वारे लोकांना धार्मिक, नैतिक व राजकीय शिक्षण देणारे लोक जुन्या व नव्या लोकांस अत्यंत प्रिय वाटतात. सुशिक्षित लोकांची अशा रितीने काम करण्यास तयारी केली असली पाहिजे. महोत्सवांचे वेळी लोकशिक्षणाचा उत्सवाचा भाग त्यांच्या हाती पडण्यास काहीही अडचणी यावयाच्या नाहीत. मंगलमूर्तीच्या उत्सवांत सुशिक्षित मंडळी आपल्या वाटणीच्या कामाचा बोजा उचलण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, अशी आमची आशा आहे. उत्सवांचे कामांत सुशिक्षित मंडळी पडल्याने सामान्य जनांचे हातून गैरप्रकार होण्याची भिती बाळगण्यास जागाच राहणार नाही व उत्सवास एक प्रकारचें व्यवस्थेशीर स्वरूप येईल.
टिळकांच्या या उपक्रमास कसे यश मिळाले होते, हे वॅलेंटाईन चिरोल या समकालीन इंग्रजी इतिहासकाराच्या उद्गारांवरून लक्षात येईल. आपल्या Indian Unrest या पुस्तकात चिरोल म्हणतो -
Tilak could not have devised a more popular move than when he set himself to organize annual festivals in honour of Ganesh, known as Ganpati celebrations and to found in all the chief centres of the Deccan Ganpati societies, each with its ‘mela’ or choir recruited among his youthful bands of gymnasts. These festivals gave occasion for theatrical performances and religious songs in which the legends of Hindu mythology were skillfully exploited to stir up hatred of the foreigner. (Page no. 44).
‘ईश्वर ही मानवाची निव्वळ कल्पना आहे’, किंवा ‘आम्ही देव-धर्म मानत नाहीत’, वगैरे एक नास्तिक किंवा बुद्धिवादी समजला जाणारा एक विचारप्रवाह आहे. माझ्या त्या नास्तिक मित्रांस मी सांंगू इच्छितो की, मी स्वतः गेली काही वर्षे देवपूजा, जपतप यापासून पुर्णतः दूर गेलो आहे. ईश्वराचा नेमका ठाव माणसास अद्यापि लागलेला नाही, हेच माझेही मत आहे ! सामान्य ईश्वरश्रद्ध समाजधारणेच्या तुलनेत मीसुद्धा ‘नास्तिकं’च आहे ! पण माझे हे मत मी इतरांवर का बरे लादावे ? किंवा स्वतःस बुद्धीवादी म्हणत इतरांस का हिणवावे ? मग धार्मिक कट्टरवाद्यांत आणि माझ्यात काय फरक उरला ? या एकांगी वागण्यात कोणाचेच हित नाही ! ईश्वर आहे वा नाही याचा नेमका निर्णय झाला आहे का ? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच शब्दांत, पारलौकिक वस्तुस्थितीचे असे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणास मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोगावस्थेत आहे असे समजून याविषयी अस्तिरुप वा नास्तिरुप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. (संदर्भ – विज्ञाननिष्ठ निबंध - खरा सनातन धर्म कोणता ? ) कदाचित आस्तिकमतवादी वा नास्तिकमतवादी दोन्हीही बाजू याबद्दल फारकत घेऊन, ‘आमचेच खरे’ म्हणण्यास धजावतील; पण हा वाद टाळून दोन्ही गटांस समाजहितासाठी एकमेकांच्या धारणांचा पूर्ण आदर राखून मार्गक्रमण करणे कठीण आहे का ?
याउलट हिंदू धर्मातील रुढींवर टिका करता करता धर्मातील श्रद्धास्थानांवरंच एका सुधारकाने कशी टिका केली आहे पहा –
पशूशिरी सोंड पोर मानवाचे । सोंग गणोबाचे । नोंद ग्रंथी ।
बैसोनिया उंदरावर ठेवूनिया बूड । फुंकीतो शेंबूड । सोंडेतून ।।
या हिणकस टिकेतून काय साधता येईल? समजा, पुर्वास्पृश्य लोक या रुढींस त्यागून पुढे गेले, तरी दुखावलेला बहुसंख्य सश्रद्ध हिंदू समाज सोबतीला कसा यावा ? उलट जातीजातींत तेढ वाढण्याचीच भिती !
धारणा, विचारप्रवाह कोणताही असो, सक्षम नेतृत्व मिळाले, तर या दोन्ही गटांस योग्य ती दिशा देणे सहज शक्य आहे. समाजसुधारणा करताना आधी सामान्य समाजमन दुखावले जाऊ नये असे मला वाटते. एखादी भाबडी श्रद्धाही समाजहितोपयोगी कशी असू शकते हे गणेशोत्सवाबाबतचे सावरकरांचे उद्गार पाहिल्यास लक्षात येईल –
हिंदूराष्ट्राच्या संघटनचे प्रतीक, राष्ट्रशक्तीची, गणशक्तीची मुर्ती या दृष्टीने तिचा उत्सव, पुजा, सत्कार करण्यास बुद्धिवाद्यासही काही एक हरकत नाही... ...जो बुद्धिवादी तो उपयुक्ततावादीही असलाच पाहिजे. त्याला समाजशास्त्राचा हा सिद्धांत ठाऊक असला पाहिजे की, लोकसंग्रह म्हटला म्हणजे प्रत्येक व्यक्तीव्यक्तीच्या एकांडपणाने कधीच साधत नसतो; सर्व व्यक्तींना साधणारे जे सांधिक सामान्य सुत्र असेल यावरच तो आधारलेला असणार, यास्तव एखादी समजूत वा रुढी धर्मभोळी असली, तरीही जर तिच्यायोगे समाजमानसाच्या या परिणीतीत एकंदरीत राष्ट्रीय हितच अधिक साधत असेल, तर या धर्मभोळपणासच लोकसंग्रहाचं एक तात्पुरतं हत्यार म्हणून तो कर्ता बुद्धिवादी उपयोजिण्यास सोडणार नाही.
याहीपुढे जाऊन सावरकर म्हणतात –
अखिल हिंदू गणशोत्सव स्वतंत्र स्थापून नि स्पृश्य-अस्पृश्यास सरमिसळ बसवून स्पर्शबंदी तोडली पाहिजे. भंग्याकडून गीत-गायत्री म्हणून नि गणपतीची प्रकट पूजा वेदमंत्रानी करवून, वेदोक्तबंदी तोडली पाहिजे. शुद्धीसंमारंभ करून किंवा निदान शुद्धीकर्त्यास देवाची स्वहस्ते पुजा करु देऊन शुद्धीबंदी मोडली पाहिजे. आणि सगळ्यात अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे पुर्वास्पृश्य बंधूंस पंगतीस प्रकटपणे घेऊन, वृत्तपत्री नावे छापून, सहभोजनाची झोड उठवली पाहिजे. रोटीबंदीची बेडी तोडून टाकली पाहिजे (स्फुट लेख). बहुसंख्य सश्रद्ध हिंदूच्या श्रद्धेसंच साद घालून हिंदू धर्मातीलंच अनिष्ट रुढींच्या मुळावर घाव घालण्याची, सावरकरांची कृती अनुसरणीय नाही का ?
चातुर्वण्यसंस्था आता संपुष्टात आली आहे; परंतू धर्मजागृतीचे, ज्ञानार्जनाचे ब्राह्मण वर्णाचे कार्य आता कोणीतरी स्वच्छेने हाती घ्यायला नको का ? गणेशोत्सव जवळ आला की अलीकडे गणेशोत्सवातील आरत्या म्हणताना होणाऱ्या चुकांना अनुसरून ‘फळीवर वंदना’, ‘दर्शन म्हात्रे’ असे विनोद फिरताना दिसतात. विनोदी परिस्थिती असली, तरी या गोष्टीची लाज, खंत आम्हाला वाटायला नको का ? किती पालक आपल्या पाल्यांना जवळ बसवून आरत्या समजावत असतील ? नव्हे, किती पालकांना स्वतःला आरत्या अर्थासहीत समजत असतील ? आज संस्कृत जाणू शकणारी मोजकी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, मराठी भाषाही त्याच वाटेवर आहे. आपली संस्कृती भ्रष्ट होण्याचे मुळ कारण आमचेच अज्ञान आहे. वास्तविक आमच्याच पुर्वजांनी यावर पुष्कळ चिंतन केले आहे. मी अधिक वेगळे काय सांगणार ? समर्थ रामदास स्वामींचेच शब्द उसने घेऊन सांगतो –
आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे ।
महाराष्ट्रराज्यची करावे । जिकडे तिकडे ।।
©डॉ. सागर पाध्ये
संदर्भग्रंथ यादी –
१. यजुर्वेद संहिता (भाषा-भाष्य) – पंडित जयदेवजी शर्मा.
२. ऋग्वेद का सुबोध भाष्य – डॉ. श्रीपाद दामोदर सातवळेकर.
३. श्रीगणेशकोश – संपादक, अमरेंद्र गाडगीळ.
४. लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख भाग १ - संपादक, न. चि. केळकर.
५. विज्ञाननिष्ठ निबंध – विनायक दामोदर सावरकर.
६. स्फुट लेख – विनायक दामोदर सावरकर.
(दोन्ही ग्रंथ www.savarkarsmarak.com वरून साभार).
७. महात्मा फुले समग्र वाड़्मय – संपादक, धनंजय किर, सं. ग. मालशे, य. दी. फडके.
८. श्रीगणेश – आशियाचे आराध्य दैवत – मधुकर केशव ढवळीकर.
९. छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण राजनिती - संपादक, रामकृष्ण कदम).
10. Indian Unrest - Valentine Chirole, 1910.
सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
Delete