( पुढील कथा हे व्यासकृत संहितेचे शब्दशः भाषांतर नाही, तर संक्षिप्त मराठी रुपांतर आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा कल्पनाविलास पुर्णतः टाळलेला आहे. सर्व उपमा, विशेषणंही शक्यतो संहितेनुसारंच वापरलेली आहेत. सदर प्रकरणातील भांडारकर, निलकंठी आणि दाक्षिणात्य प्रतींतील श्लोकसंख्येत फारसा फरक नाही. जिथे महत्वाचा फरक असेल, तिथे पुढील भागांत दर्शवित जाईन.)
नववा दिवस उजाडला, काल रात्रीचा दुर्योधनाचा विलाप भीष्मांना फार अस्वस्थ करत होता. दुर्योधनाच्या वाग्बाणांनी विद्ध झालेले पितामह, दुर्योधनाला आता मी नकोसा झालो आहे, हे जाणून होते. 'पांडवप्रेमापुढे हतबल झालेल्या भीष्मांनी शस्त्र खाली ठेवावे, मग मी एकटाच अर्जुनासकट समस्त पांडवसेनेचा संहार करतो', असं म्हणे तो कर्ण शपथेवर सांगत होता. जेव्हा दुर्योधन गंधर्वांच्या तावडीत सापडला होता, त्यावेळेस दुर्योधनास सोडून पळून जाणारा तो घमेंडी कर्ण ! त्याचंच ऐकून काल रात्री दुर्योधन अद्वातद्वा बोलला. भीष्मांना हा पक्षपाताच्या आरोपाचा कलंक धुवून काढायचा होता. मनोमन आपल्या पराधीनतेची निंदा करत, आज अर्जुनाशी युद्ध करण्याचा भीष्मांनी निश्चय केला.
भीष्मांचा हा दृढनिश्चय पाहून दुर्योधनास आनंदाच्या उकळ्या फुटत होता. आजच्या भीषण रणसंग्रामानंतर आपलाच विजय होणार अशी त्याला खात्री वाटू लागली. आपल्यात आणि आपल्या विजयश्रीत त्याला केवळ एकमेव अडसर दिसत होता - शिखंडी ! 'आधी स्त्री म्हणून जन्माला आलेला शिखंडी, नंतर वर मिळाल्यामुळे पुरुष झाला, तेव्हा मी काही त्याच्यावर शस्त्र चालवणार नाही', असे पितामह स्पष्ट म्हणाले होते. 'पितामहांचं शिखंडीपासून रक्षण करा', असा आदेश दुर्योधनाने आपला कनिष्ठ बंधू दुःशासन यास दिला होता. 'लक्षात ठेवा, भीष्मांसारखा सिंह शिखंडीसारख्या कोल्ह्याच्या हातून मारला जाऊ नये, यासाठी दक्ष राहा'; असे दुर्योधन वारंवार सांगत होता. शकुनी, शल्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि विविंशति यांनी आपापल्या रथांसह भीष्मांभोवती कडे केले.
आज शांतनुपुत्र भीष्मांनी 'सर्वतोभद्र'नामक व्युहाची रचना केली होती. भीष्मांना पुढे करून कौरवसेनेने पांडवावंर आक्रमण केले. भीमसेनास पुढे ठेवून पांडवांनीही चाल केली. तुंबळ युद्ध माजले. सुभद्रापुत्र अभिमन्यूने आज रणांगणात अलंबुष राक्षसाविरुद्ध मोठा पराक्रम गाजवला. तो भीमसेन ! वृकोदर ! वाटेत गजदल आडवे आल्याबरोबर मृगराजाने हत्तींवर चाल करावी तसाच खुशाल रथातून खाली उडी मारून हातातली गदा फिरवत हत्तींवर चालून गेला. सोसाट्याचा वारा येऊन आकाशातले काळेकभिन्न ढग क्षणार्धात छिन्न-भिन्न व्हावेत, तद्वत भीमसेनाच्या तडाख्यासमोर गजदल विखुरले. हातातली रक्तरंजित गदा आणि त्याच रक्तमांसात अंग माखलेला भीम ! तो भीम नव्हेच, तो प्रलयकारी रुद्र भासत होता !
सुर्यनारायण माथ्यावर आला. आज देवव्रत भीष्म धान्याच्या राशीला बैलाने तुडवावे त्याप्रमाणें पांडवसैन्याला तुडवत होते. अपमान, क्रोध, पराधीनतेचं दुःख असा वडवानल पितामहांच्या अंतःकरणात उसळला होता, त्यात होरपळत होतं ते मात्र पांडवसैन्य ! विराट, द्रुपद, युधिष्ठिर, भीम, धृष्टद्युम्न कोणीही कोणीही त्या वणव्यासमोर तग धरू शकत नव्हते. रक्ताचे पाट वाहू लागले. रक्त, अस्थी, आतडी, योद्ध्यांची मस्तके यांच खच पडला. भीष्मांना पांडवांनी वेढले. अर्जूनास पुढे करून, सारे भीष्मांवर चालून गेले. "लक्षात ठेव दुःशासना, पितामहांसारख्या व्रतस्थ योद्ध्याचे संरक्षण हेच आपले कर्तव्य !", दुर्योधनाने पुनश्च दुःशासनास आठवण करून दिली. दुःशासनानेही लगबगीने भीष्मांवर चालून येणाऱ्या पांडवयोद्ध्यांवर चढाई केली. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव असे तिघेही भीष्मांभोवतीचे हे वेढे तोडण्याचा प्रयत्न करू लागले. कौरवांकडील मद्रराज शल्याने त्या तिघांनाही झोडपले.
इकडे पश्चिमेस सुर्य अस्तास जात होता; पण भीष्मांचा शौर्यसुर्य क्षणाक्षणाला अधिकंच उग्र रूप धारण करत होता. त्या व्रतस्थ महात्म्याचा काय तो आवेश ! भीम, सात्यकी, नकुल, युधिष्ठिर, धृष्टद्युम्न यांपैकी एकंही त्या तडाख्यातून वाचला नाही. अंगावर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव होतो असतानाही, भीष्म तसूभरही पाठी हटत नव्हते. पांडवांचे सैन्य इतस्ततः विखुरताना पाहून, योगेश्वर श्रीकृष्णाने रथाच्या घोड्यांचे लगाम आवळले. "पार्था,दुर्योधनासकट त्याच्या सर्व योद्ध्यांचा मी संहार करेन, ही तुझी प्रतिज्ञा नव्हे का ? ते तुझे वचन आता खरे कर. क्षात्रधर्माचे पालन कर !" मोहाने आलेले मुढत्व अजूनही अर्जुनास दूर सारता आले नव्हते. "वासुदेवा, ज्यांचा वध करणे उचित नाहीं, अशांचा वध करून नरकाप्रत नेणारे हे राज्य मिळवावे की, वनवासातील कष्ट भोगावेत ? यांपैकी कशास सत्कृत्य म्हणावे ? असो, तू सांगशील तसे मी करतो. मला भीष्मांच्या जवळ घेऊन चल."
क्षणाचाही विलंब न लावता कृष्णाने घोड्यांंना भीष्मांच्या दिशेने पिटाळले. अर्जुनाने समीप पोहोचताच क्षणी पितामहांचे धनुष्य आपल्या बाणाने तोडून टाकले. त्यावर भीष्मांनी दुसरे धनुष्य हाती घेतले, अर्जुनाने तेही तोडून टाकले. क्षणभर पितामहांनाही आपल्या नातवाचे कौतुक वाटले; पण मोहाची ही बंधनं, भीष्मांच्या प्रतिज्ञापुर्तीच्या आड येण्यासारखी नव्हती. भीष्म एकापाठोपाठ एक बाण सोडत होते. कृष्णाचे सारथ्यातले कौशल्य पणाला लागत होते. अर्जुनाच्या रथाच्या मंडलाकार गतीसमोर भीष्मांचे बाण व्यर्थ जात. मध्येच भीष्मांच्या बाणांचे आघात कृष्णही सहन करत होता. एकीकडे क्षणाक्षणाला होणारा हा सेनासंहार, दुसरीकडे अर्जुनाचे विचलित होणारे मन हे पाहता पाहता, श्रीकृष्णाच्या सहनशीलतेचा कडेलोट होत होता. अखेर क्रोधावश श्रीकृष्णाने हातात प्रतोद घेऊन रथातून खाली उडी मारली आणि सिंहाने गर्जना करावी तद्वत ललकारत भीष्मांच्या अंगावर धावून गेला. आपल्या क्रोधाग्नीने समस्त कौरवसेनाच भस्मसात करू पाहणारी, हातात चाबूक घेऊन भीष्मांच्या अंगावर धावून जाणारी ती सावळी मुर्ती कडाडणाऱ्या विद्युन्मालेने सुशोभित सावळ्या मेघांप्रमाणे भासत होती; परंतु कृष्णाच्या या रौद्ररुपासही किंचितही न भिता भीष्मांनी आपले धनुष्य ताणून धरले, जराही विचलित न होता मनोमन कृष्णास नमस्कारही केला, "‘गोविन्दा, आज या युद्धात तिनंही लोकांत माझा सन्मान वृद्धिंगत झाला आहे ! आपण माझा वध केल्यास, माझे कल्याणंच होईल !"
श्रीकृष्णाचा हा पवित्रा पाहून गर्भगळीत झालेला अर्जून तसाच कृष्णाच्या पाठून धावत सुटला. कसेबसे आपल्या बाहुंचे वेढे त्याने कृष्णाभोवती घातले आणि कृष्णास आवरण्याचा विफल प्रयत्न करू लागला. अखेर अर्जुनाने श्रीकृष्णाचे पाय धरले, तशाही परिस्थितीत कृष्ण तसाच पुढे जात राहिला. त्यापाठोपाठ फरपटत जाणाऱ्या अर्जुनास कसेबसे दहाव्या पावलावर श्रीकृष्णास थांबवणे शक्य झाले. "हृषिकेशा, तू तुझी प्रतिज्ञा मोडू नकोस, ऐक रे !" चवताळलेल्या सर्पाप्रमाणे श्रीकृष्ण श्वास घेत होता. त्या आरक्त डोळ्यांकडे पाहणे अर्जुनास अशक्य होत होते. "केशवा, हा भार माझाचं ! मी माझ्या अस्त्र-शस्त्रांची शपथ घेऊन सांगतो, मी भीष्मांचा वध करेन. मी समस्त शत्रुसैन्याचे निर्दालन करेन !" श्रीकृष्णाचा राग अजूनही शांत झाला नव्हता. काकुळतीने विनवण्या करणाऱ्या अर्जुनाशी एक शब्दही न बोलता ताडताड पावले उचलत श्रीकृष्ण रथात जाऊन बसला. आज भीष्मांचा पराक्रम आवरणे कोणाच्याही हाती नव्हते !
रात्रीचा अंधार दाटला. पांडवसेनेतील प्रत्येकजण आज भीष्मांच्या बाणांनी घायाळ झाला होता. भीष्मांसमोर विवशता आल्याने अंतःकरण त्याहून अधिक विकल झाले होते. "श्रीकृष्णा, भीष्मांच्या शराग्नीत आपली सेना भस्मसात होत आहे. त्या अजोड वीराकडे मान वर करून पाहणेही शक्य नाही, तिथे संतप्त भीष्मांना हरवणे मला शक्य वाटत नाही. आपल्याच सेनेचा विनाश आपल्याच डोळ्यांनी पाहण्याऐवजी सरळ वनांत निघून जावे, असे आता वाटू लागले आहे ! आता तूच काय तो योग्य मार्ग दाखव."
"धर्मराजा, असे निराश होऊन कसे चालेल ? भीमार्जुनांसहित नकुल, सहदेव असे अग्नीसारखे तेजस्वी भाऊ तुला लाभलेत. तुझ्या शत्रूचा संहार करण्यासाठी ते सर्वथा समर्थ आहेत. तुझा सृहद म्हणून तू मलाच युद्ध करण्याची आज्ञा दे. अर्जून भीष्मांचा वध करणार नसेल, तर स्वतःचे प्राण पणाला लावून मी भीष्मांसकट सर्व धृतराष्ट्रपुत्रांचा नायनाट करेन. त्या नीच कौरवांसोबत उभे राहणारे भीष्म फार काळ तग धरू शकणार नाहीत." आपली हाती शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा मोडून स्वतः युद्ध करण्याचा कृष्णाचा हा प्रस्ताव युधिष्ठिरास पटला नाही. विषण्ण मनाने युधिष्ठिर म्हणाला, "पुर्वी पितामहांनी मला एक वचन दिले होते. 'मी युद्ध जरी दुर्योधनाच्या बाजूने केलं, तरी तुला तुझ्या हिताचा सल्ला नक्कीच देईन', असे भीष्म म्हणाले होते. आता आपल्यात खलबत करण्यापेक्षा आपण त्यांच्यापाशीच जाऊन सल्ला मागावा, हे उत्तम !" कृष्णाने यास सहमती दर्शवली !
कृष्णासहीत पाचंही पांडव कौरवांच्या शिबिराच्या दिशेने चालू लागले. आधी आदरणीय पितामहांच्या चरणांवर मस्तक ठेवून पाचंही पांडव विनम्रपणे उभे राहिले. भीष्म बोलते झाले, "बाळांनो, सांगा, काय हवे आहे? तुमच्यावरील प्रेमापोटी तुम्ही युद्धाव्यतिरिक्त माझ्याकडे जे काही मागाल, ते देण्यास मी तयार आहे." भीष्मांच्या या वचनावर काकुळतीला आलेल्या युधिष्ठिराने म्हटले, "पितामह, युद्धात आमचा विजय व्हावा, आम्हास राज्यप्राप्ती व्हावी, आमची प्रजा आणि सेना सकुशल राहावी, यासाठी आता आपणंच आम्हाला उपाय सांगा."
"कौंतेया, खरं सांगू ? मी रणांगणात असेपर्यंत तुमचा विजय अशक्य आहे ! मनात किंचितही संभ्रम न राखता खुशाल माझ्यावर प्रहार करा. माझा वध करा. मी आनंदाने डोळे मिटेन.", भीष्म शांतपणे उत्तरले.
"पितामह, एकवेळ इंद्र, वरूण आणि यमासंही जिंकणे शक्य आहे; परंतु कृद्धावस्थेतील आपल्याला जिंकणे शक्य नाही. आता आपणंच सांगा आम्ही काय करू ?"
"हेही खरेच आहे भरतश्रेष्ठा ! पण लक्ष देऊन ऐक, 'शस्त्रहीन पुरुष, अपंग वा जातिहीन व्यक्ती, आपल्या ध्वजावर अमंगल चिन्हं लावणारा योद्धा आणि स्त्री' अशांवर मी शस्त्र चालवत नाही. आधी स्त्री म्हणून जन्माला आलेला द्रुपदपुत्र शिखंडी आपल्या ध्वजावर अमंगल चिन्हे लावतो, तो तुझ्या सैन्यात आहे. उद्या त्याला पुढे करावे. मी त्याच्यावर प्रहार करणार नाही. या संधीचा फायदा घेऊन या अर्जुनाने माझ्यावर बाण चालवावेत. उद्या अर्जुनाने सर्व अस्त्र-शस्त्र स्वतःजवळ बाळगून पुर्ण सावधान राहून मला मारण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विजयी भव !"
भीष्मांकडून असा सल्ला मिळाल्यावर पुनश्च पितामहांना प्रणाम करून पांडव आपल्या शिबिराकडे मार्गस्थ झाले. अर्जुनाच्या मनात अजूनही विचारांचे द्वंद्व माजले होते. ज्या पितामहांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, त्या गुरुस्थानी असलेल्या पितामहांवर आपण जीवघेणे प्रहार करावेत ? छे ! छे ! आपला हा विषाद अर्जुनाने कृष्णाजवळ व्यक्त केला. श्रीकृष्ण नानाप्रकारे अर्जुनास क्षात्रधर्माची आठवण करून देऊ लागला. अखेरीस उद्या शिखंडीस भीष्मांसमोर उभे करावे, शिखंडीनेच भीष्मांवर चालून जावे; मी इतर महारथींना रोखून धरतो. भीष्मांनी शस्त्रत्याग करताच आपण सर्वांनी भीष्मांवर शस्त्रप्रहार करावेत, याप्रमाणे भीष्मांचा अंत निश्चित आहे, असे अर्जुनाने सुचवताच हर्षित होऊन सर्व पांडव आपापल्या शय्यांवर निद्रिस्त झाले.
कौरवके अन्ग पर पारथ जो पेखीये !
दहावा दिवस, पुर्वेकडून येणाऱ्या सुर्यकिरणांनी कुरुक्षेत्र उजळू लागले. रणभेरी, मृदंग, ढोल यांच्या तालात सुर्यनारायणाचे स्वागत झाले. शंखनाद झाला. शिखंडीस आपल्यापुढे ठेवून पांडवांनी रणक्षेत्राकडे कूच केली. शत्रू संहारक व्युहाची रचना करून, आज शिखंडी स्वतः सैन्याच्या अग्रस्थानी उभा होता. शिखंडीच्या दोहोंबाजूस स्वतः भीम आणि अर्जून उभे ठाकले होते. अभिमन्यू आणि पाच द्रौपदीपुत्र शिखंडीच्या रथाचे पाठीमागून संरक्षण करत होते. सात्यकी आणि चेकितान हे त्यांना साथ देत होते, तर पांचालांची सेना घेऊन धृष्टद्युम्न या सर्वांच्या पाठीमागे उभा होता. त्यांच्यापाठी नकुल-सहदेवासहीत युधिष्ठिर, मग राजा विराट, कैकयपुत्र आणि धृष्टकेतू असे सर्व वीर चालले होते.
शिखंडी हा जन्माला आला, तेव्हा स्त्री असून नंतर एका यक्षाच्या आशीर्वादाने पुरुष झाला, अशी वृत्ते पुर्वी भीष्मांकडे आली होती. तरी शिखंडी हा काही सामान्य योद्धा नव्हता. त्याने द्रोणाचार्यांकडूनंच धनुर्विद्यचे शिक्षण घेतले होते. पांडवाच्या सात प्रमुख सेनाप्रमखांपैकी एक शिखंडी होता. सात अक्षौहिणी सेनेपैकी एक अक्षौहिणी सेनैचे नेतृत्व स्वतः युधिष्ठिराने युद्धाच्या पहिल्या दिवसापासून शिखंडीकडे सोपवले होते. युद्धांत शत्रुला परशुरामांइतकाच दाहक ठरणारा शिखंडी हाच आपल्या सर्वांचा प्रमुख सेनापती असावा, असेही युद्धापुर्वी भीमाने सुचवले होते.
आज पांडवसेना जीवावर उदार होऊन लढत होती. कौरववीर अग्रस्थानी असलेल्या भीष्मांच रक्षण करीत होते. भीष्माचार्यांच्या पाठून द्रोणाचार्य व अश्वत्थामा हे पितापुत्र चालून येत होते. पांडवांनी थेट भीष्मांवरंच शरवर्षाव करण्यास सुरुवात केली. भीमसेन आज स्वतः हातात धनुष्यबाण घेऊन कौरवसेनेस कंठस्नान घालत होता. कौरवसेनेची होत असलेली दुर्दशा पाहून भीष्मांनी नाराच, वत्सदंत आणि अंजलिक या बाणांचा पांडवांवर पाऊस पाडला. संग्रामभुमिवर आजंही भीष्मांचे रूप कालच्याइतकेच भयंकर होते. भीष्मांच्या धनुष्याला किंचितही विश्रांती मिळत नव्हती, सदा ताणलेल्या अवस्थेतील तो धनुष्य कायम मंडलाकृतीच दिसत असे ! आजंही कालच्याच दिवसाची पुनरावृत्ती होणार, पितामहांच्या शौर्याग्नीत पांडवसेना भस्मसात होणार, अशी काळजी पांडवांना वाटू लागली, तोच शिखंडीने लागोपाठ तीन बाण भीष्मांच्या छातीवर मारले. शिखंडीच्या बाणांनी घायाळ झालेले भीष्म मोठ्याने हसत त्याला म्हणाले, "तू प्रहार कर अथवा नको करूस, मी काही तुझ्याशी युद्ध करणार नाही. विधात्याने तुला स्त्री म्हणूनंच जन्माला घातले, तेव्हा तू 'शिखंडीनी'च आहेस !"
भीष्मांनी अशी निर्भत्सना करताच, संतप्त शिखंडी दात-ओठ खात म्हणाला, "हे महाबाहो, तुमचे सामर्थ्य जाणत असूनही आज मी तुमच्याशी युद्ध करणार आहे ! तुम्ही प्रहार करा अथवा नका करू, मी आज निश्चितंच तुमचा वध करणार आहे !" स्वतःच्या वाग्बाणांनी भीष्मांना घायाळ करून, शिखंडीने तत्क्षणी भीष्मांवर आणखी पाच बाण सोडले. शिखंडीचा हा उत्साह पाहून, अर्जूनाने शिखंडीस आणखी प्रोत्साहन दिले, "भले शाबास रे वीरा, तू भीष्मांवरंच चालून जा, तुला अडवणाऱ्या शत्रुला पळवून लावायला मी सोबत आहेच ! आज भीष्मांचा वध केल्याशिवाय आपण दोघांनीही पाठी फिरायचं नाही ! लक्षात ठेव, आपल्या दोघांचंही आज हसं व्हायला नको ! "
सतत युद्धमान राहणाऱ्या भीष्मांना रोखणं पांडव किंवा पांचालवीरांपैकी कोणासही सोपं नव्हतं. भीष्म पांडवसेनेवर शरवर्षाव करतंच होते; पण तो अर्जुन, अपराजित ! सव्यसाची ! धनंजय ! आजचा त्याचा अवतारंच असा भयंकर होता, की शत्रुच्या हृदयात धडकी भरावी. सिंहाच्या गर्जनेसमोर हरणांनी भयकंपित होऊन धाव ठोकावी, तसे कौरव सैनिक सैरभैर झाले. हे पाहताच दुर्योधनाची पाचावर धारण बसली आणि नातवाने आजाकडे आशेने पाहिले, "पितामह, कुरणांत गुराख्याने गुरे हाकलावीत तसा हा अर्जुन आपल्या सैनिकांना आज हाकतो आहे ! आता आपल्याशिवाय आम्हाला आणखी काय आधार आहे ?" दुर्योधनाचं सांत्वन करत भीष्म उत्तरले, "प्रजापते, मी युद्धात दहा हजार क्षत्रियांचा संहार करूनंच मागे परतेन, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली नव्हती का ? प्रतिदिन मी माझे हे कर्म केले आहे, आजंही करेन. एकतर शत्रूचा संहार करेन किंवा मग मरण पत्करून तू दिलेल्या अन्नाच्या ऋणातून मुक्त होईन !" भीष्मांनी पांडवसेनेचा संहार करणे सुरुच ठेवले, दुसरीकडे भीष्मांचे प्रहार सहन करून पांडववीर अधिकाधिक त्वेषाने भीष्मांचा वध करण्यासाठी पराक्रमाची शर्थ करीत होते. दुःशासनादी कौरववीर भीष्मांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तुंबळ रण माजले !
धृष्टद्युम्न सतत आपल्या सैन्याला भीष्मांवर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करत होता. आपल्या सेनापतीच्या भाषणाने पांडवसैन्याला चेव चढत होता. अर्जुनाच्या पराक्रमाला आज कोणताही बांध उरला नव्हता. वाऱ्याच्या गतीने त्याचा रथ भीष्मांच्या धावत होता आणि तितक्यातच समुद्राच्या घोंघावत्या लाटेच्या मार्गात एखादी शिळा यावी, तसा दुःशासन अर्जुनाला आडवा गेला. स्वतःच्या जीवावर उदार झालेल्या दुःशासनाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता अर्जुनावर शरवर्षाव केला. दुःशासनाच्या बेभान माऱ्यातून कृष्णही सुटला नाही. अर्जुनाच्या कपाळावर दुःशासनाचे तीन बाण लागले आणि अर्जुनाच्या मस्तकावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. स्वतःच्याच रक्तात न्हाऊन निघालेला अर्जून फुललेल्या पळसवृक्षाप्रमाणे लालबुंद दिसू लागला. परस्परांच्या बाणांनी दोघेही जखमी झाले. अखेर दुःशासनास भीष्मांच्याच रथाचा आश्रय घ्यावा लागला, मात्र तोपर्यंत अर्जूनाच्या रथाची गती कमी करण्यात त्याला बऱ्यापैकी यश मिळाले.
द्रोणाचार्य आज रणभूमीवर आपल्या शिष्याचा पराक्रम पहात होते. त्यांची अनुभवी दृष्टी आजुबाजूच्या रणक्षेत्रावरून फिरत होती. अर्जुनाचा पराक्रम आणि कौरवसेनेची दुर्दशा पाहता पाहता त्यांना पुढील भविष्याची जाणीव होऊन मति कुंठीत झाली. सुरकुतलेल्या पापण्या किंचित वर उचलल्या. डोळे आसमंतावरून फिरु लागले. अमंगल गिधाडं आकाशात घिरट्या घालत होती. आज सुर्यही निस्तेज झाला आहे का ? आज ग्रहांची गतीही विपरीत का भासते ? ही पुढील अघटिताची चाहूल तर नाही ? द्रोणाचार्य अश्वत्थाम्याकडे वळले, "बाबा रे, एकीकडे तो तपस्वी, सदाचारी युधिष्ठिर, दुसरीकडे दुर्बुद्ध दुर्योधन; कोण विजयी होणार ? आज आपल्या सैन्याचा हाहाकार, पांचजन्याचा नाद आणि गांडीवाचा टणत्कार याशिवाय आणखी काहीही ऐकू येत नाही. पांडवांच्या या खवळलेल्या सेनासागरात आज प्रवेश करणं अतिशय कठीण आहे ! पण आपण लढत राहायला हवं. मी युधिष्ठिरास थोपवून धरण्याचा प्रयत्न करतो, तू धृष्टद्युम्न आणि भीमसेनावर चढाई करावी हे उत्तम !"
भगदत्त, कृपाचार्य, शल्य, कृतवर्मा, विंद, अनुविंद, जयद्रथ, चित्रसेन, विकर्ण आणि दुर्मर्षण असा दहाजण भीमावर तुटून पडले होते. एक-एक करून सगळे भीमावर बाण मारत होते. पर्वतशिखरांचे प्रपात कोसळावेत तद्वत भीमाचे प्रहार या योद्ध्यांवर होऊ लागले. अंकुशाच्या प्रहारांनी गजराज चवताळावा तसा भीम चवताळून गेला. हातात धनुष्यबाण घेऊन भीमाने तितकाच तिखट प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. भाल्याने जयद्रथाचा धनुष्य आणि रथ मोडून टाकले. राजा शल्याने तितक्याच त्वेषाने दोन लोखंडी बाणांनी भीमाला घायाळ केले. तोमर, पट्टिश, नाराच, शतघ्नी, क्षुरप्र (तीक्ष्ण बाण) अशी अस्त्रं परस्परांवर चालवली जाऊ लागली. भीमाचा आवेग कोणालाही सहन होण्यासारखा नव्हता. भीमाला असं एकट्यालाच लढताना पाहून अर्जुन मदतीसाठी धावून आला. भीमासाठी अर्जुन आला.. जणू हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री ! त्या दोघांना एकत्र लढताना पाहून कौरववीरांनी विजयाची उरलीसुरली आशा सोडून दिली.
आज तेरा वर्षांनंतर द्यूताचा आणखी एक डाव रणांगणावर मांडला गेला होता. रणद्यूत ! आणि आज विजयाच्या आशेने कौरवांनी भीष्मांनाच पणाला लावलं होतं. मांसाच्या तुकड्यासाठी पक्ष्यांनी आपसांत लढावं, तसे भीष्मांच्याभोवती कौरव-पांडव एकमेकांचे लचके तोडत होते.
अर्जुनाचा क्रोधाग्नी क्षणाक्षणाला प्रखर होत होता. आज कोण जिंकणार ? भीष्मांची कौरवसेना की, अर्जुनाची पांडवसेना ? यात आहुति मात्र पडत होती कित्येक सामान्य सैनिकांची ! क्षणभर भीष्मांची नजर शत्रुच्या घायाळ सैनिकांवरून फिरली. गेले दहा दिवस अव्याहत हा संहार सुरुच होता. कित्येक शूर सैनिक हकनाक या युद्धात मारले जात होते. किती आयुष्यं, किती संसार उद्ध्वस्त होत होते. रणभूमीचं ते बीभत्स दृश्य पाहता पाहता भीष्मांना उबग येऊ लागला. ती तुटलेली मस्तकं, तो मांसाचा चिखल, त्यात माखलेली शिरस्त्राणं, तुटक्या हातापायांसह तडफडणारे हे दुर्दैवी जीव... हे सारं सारं कोण करतंय ? मी ? कशासाठी ? कुरुंच्या गादीचा सेवक म्हणून ? राजा धृतराष्ट्राने हा देह पोसण्यासाठी दिलेल्या अन्नाचं ऋण म्हणून ? त्यापेक्षा हा देह त्यागून या ऋणातून मुक्त का होऊ नये ? "युधिष्ठिरा...", भीष्मांनी आर्त स्वरात धर्मराजास पुकारले, "पुरे झालं रे ! या नरसंहाराचा वीट आला आता. हे युद्धही नको आणि आता हा थकलेला देहंही नको. खरंच प्रेम करत असशील माझ्यावर, तर त्या अर्जुनाला पुढे पाठव आणि कर माझा वध !"
शिखंडी आणि अर्जुनास पुढे ठेवून पांडवसेना हळूहळू पुढे सरकत होती. दुर्योधनाच्या आज्ञेनुसार द्रोण आणि अश्वत्थामासोबत कौरवसेना भीष्मांभोवतीचे वेढे अधिक बळकट करत होती. सात्यकी अश्वत्थाम्यासोबत, धृष्टकेतु पौरवासोबत, अभिमन्यू दुर्योधनासह युद्ध करू लागले. युधिष्ठिराने मद्रराज शल्यावर चढाई केली. भीमसेन गजदलावर तुटून पडला. शंख, दुन्दुभि, भेरी यांचे नाद, हत्तींचे चीत्कार, धनुष्यांचे टणत्कार, रथांचा घडघडाट आणि सैनिकांच्या गर्जना यांमुळे रणभूमी दणाणून गेली. रणांगणावर धुळीचे मेघ दाटले, त्यातून विजा चमकाव्यात तशी अस्त्र-शस्त्र चमकत असत. प्राग्ज्योतिषाचा राजा भगदत्त याने एक माजलेला हत्ती अर्जुनावर सोडला, काही लोखंडी बाण वापरून अर्जुनाने त्या हत्तीस थोपवले. आता याहून अधिक वेळ दवडणे परवडण्यासारखे नव्हते. अर्जुनाने शिखंडीस पुढे जाण्यास सांगून, थेट भीष्मांवर हल्ला केला, ते पाहताच कौरवसेनेत कोलाहल माजला. शिखंडी सातत्याने भीष्मांवर शरवर्षाव करत होता. पाठीमागून अर्जून स्वतः शिखंडीचे रक्षण करीत होता. एक शिखंडी वगळता इतर सर्वांवर भीष्म अस्त्र चालवीत होते. आता बराच उशिर झाला होता. भीष्मांभोवतीची कौरवसेना विरळ होत चालली होती. मनुष्यहीन रिकामे रथ घोडे खेचतील त्या दिशेने इतस्ततः पळत होते. चेदि, काशि आणि करुष देशांचे मिळून चौदा हजार महारथी कौरवसेनेला आतून फाडून काढत होते. शिखंडीचा रथ पुढे सरकत होता, त्यापाठून एक विशाल युद्धरथ चार श्वेत अश्व खेचत होते; दोन सावळे, सडपातळ हात त्या अश्वांच्या पाठीवर चाबूक फटकारत होते. त्यापाठी इंद्रपुत्र अर्जून गांडीव ताणून मार्गात येणाऱ्यांवर शरसंधान करत होता. पुढे आलेल्या कौरववीरांचा संहार करून भीमार्जुन शिखंडीला भीष्मांवर वार करण्याची संधी देत होते.
संधी मिळताच शिखंडीने आठ दहा भल्ल बाण सपासप भीष्मांच्या छातीवर मारले. भीष्मांनी शिखंडीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि इतर सैन्याविरुद्ध लढणे सुरुच ठेवले. शिखंडीनेही भीष्मांच्या दिशेने बाण चालवणे थांबवले नाही. "शाबास रे वीरा, आज भीष्मांचा वध करू शकेल, असा तू एकंच वाघ आहेस. थांबू नकोस, चालव बाण !", शिखंडीला प्रोत्साहन देत अर्जुन शिखंडीच्या आसपास जाणाऱ्यांना आपल्या बाणांनी विद्ध करू लागला. शिखंडीच्या जवळ जाऊन त्यास रोखणे एकाही कौरववीरास शक्य होत नव्हते. एकटा दुःशासन कसाबसा अर्जुनाजवळ जाण्यात यशस्वी ठरला. मोठ्या धिटाईने त्याने अर्जुनावर हल्ला केला, पण अर्जुनाच्या शस्त्रसामर्थ्यापुढे तो हतबल ठरला. दुर्योधन ओरडून ओरडून इतर योद्ध्यांना अर्जुनाला थांबवण्यास सांगत होता. दुर्योधनाचा आक्रोश पाहून विदेह, कलिंग, दासेरकगण शिवाय निषाद, सौवीर, मालव, अभीषाह, शूरसेन, शिवि, वसाति, शाल्व, शक, त्रिगर्त, अंबष्ठ या देशांच्या योद्ध्यांनी पतंगांनी अग्नीच्या दिशेने झेप घ्यावी तशी अर्जुनाकडे धाव घेतली. आपले अपराजित हे विशेषण सार्थ ठरवत अर्जुनाने त्या सर्वांचा निःपात केला. एकीकडे सर्व राजरथांचे ध्वज विदीर्ण होत होते, दुसरीकडे अर्जुनाचा कपिध्वज आज रथाच्या वायुगतीवर डौलाने फडकत होता. रथहीन झालेले कृप, शल्य, दुःशासन, विकर्ण, विविंशति जीवाच्या भितीने सैरावरा पळत सुटले.
हलकल्लोळ माजला होता. रणांगणावर आता माणसं उरलीच नव्हती. होते ते मांसभक्षक पशू, रक्तपिपासू पिशाच्चं, क्रूर राक्षस ! बाप, मुलगा, भाऊ, मित्र ही नाती केव्हाच पाठी सारली गेली होती, जो तो समोर येईल त्याच्या नरडीचा घोट घ्यायचा प्रयत्न करत होता. जे काही अघटित भीष्मांच्या डोळ्यांदेखत घडत होतं, ते युद्ध म्हणण्यासारखं नव्हतंच. सरळ सरळ कत्तल होत होती. युद्धाचे नियम केव्हाच मातीमोल झाले होते, त्याच मातीत स्वकीयांच्या रक्ताचा चिखल होत होता. कोणीही कोणाशीही लढत होता. रथी, महारथी, पदाती असा भेदंही कोणही पाळत नव्हते.
अंतःकरणातील भावनिक कल्लोळ बाजूला सावरून, भीष्म अजूनंही आपल्या कर्तव्यपालनाबाबत ठाम होते. शिखंडीसारख्या योद्ध्यावर मी प्रहार करणार नाही, अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्याप्रमाणे ते शिखंडीला प्रत्युत्तर देत नव्हते मात्र त्यांनी शस्त्रत्यागही केला नव्हता वा लढणेही थांबवले नव्हते. त्यांनी पांडवसैन्याचा संहार सुरुच ठेवला होता. अनेक सैनिकांसह विराटाचा भाऊ शतानीक याचाही त्यांनी वध केला. इतकेच काय, आपल्या लाडक्या अर्जुनावरची मायाही भीष्मांच्या कर्तव्यपालनाच्या आड येत नव्हती. थडथड थडथड आवाज करत भीष्मांचा रथ धावत होता. मध्येच शत्रूरथांच्या समुहात घुसून हाहाकार उडवून देत, तर कधी बाहेर येऊन विविध शक्तींचा प्रयोग शत्रूंवर करीत. एव्हाना भीष्मांचे कवच विदीर्ण झाले होते. समोरून येणारे बाण भीष्मांच्या वृद्ध देहात येऊन रुतू लागले. असल्या क्षतांची जराही तमा न बाळगता भीष्म लढत होते. कृद्ध अर्जुनाने आपल्या बाणांनी भीष्मांचा धनुष्य तोडला, त्यापाठोपाठ शिखंडीने भीष्मांवर बाण चालवले. भीष्मांच्या सारथ्यालाही घायाळ केले आणि त्यांच्या रथावरील ध्वज मोडून टाकला. सुर्य अस्ताला जाऊ लागला.
भीष्मांनी हातात दुसरे धनुष्य घेतले खरे, पण अर्जुनाने केवळ तीनंच बाणांत तेही तोडून टाकले. भीष्मांनी हातात घेतलेले प्रत्येक धनुष्य तोडून टाकण्याचा अर्जुनाने सपाटा चालवला. संतप्त भीष्मांनी एका प्रदिप्त अशनीप्रमाणे असलेली शक्ती अर्जुनावर फेकली, अर्जुनाने मोठ्या शिताफीने त्याही शक्तीचे तुकडे केले. क्षणभर भीष्म थबकले, 'खूप लढलो, आता ती वेळ आली आहे, वेळ आली आहे..... चिरविश्रांतीची !' युद्धाचा कोलाहल, समोरचे बीभत्स दृश्य यांपैकी आता भीष्मांस काहीही दिसत नव्हते. डोळ्यांसमोर केवळ तेज दाटले होते. विशुद्ध, निर्मळ प्रकाश ! घामाने, रक्ताने चिकट झालेल्या देहाला स्पर्श करून एक थंड झुळूक पुढे विरत गेली आणि हा कसला अलौकीक सुगंध म्हणायचा ? आसमंत आता शांत झाला होता, दुरून कुठूनतरी मंगल वाद्यांचा आवाज येत होता. हा स्वर्ग तर नव्हे ? चहू दिशांतून नगारे वाजवावेत तसे तालबद्ध ध्वनी उमटले, "हे गंगापुत्र ! हे महाबाहो ! तो क्षण आला आहे. आता आपण युद्धाचा विचार सोडून द्यावा."
तो लखलखाट विरत गेला, युद्धाचा कोलाहल पुन्हा ऐकू येऊ लागला. सप् सप् सप्.... तीन बाण सटासट भीष्मांच्या शरीरात घुसले. भुकंपातही निश्चल राहणाऱ्या पर्वताप्रमाणे भीष्म स्थिर उभे राहिले. आपल्या नातवाकडे त्यांनी मंद स्मित करून पाहिले. सप् सप् सप्.. बाणांचा वर्षाव सुरुच ! भीष्मांच्या अंगावरील कवच केव्हाच चिथडे उडून, पडून गेले होते. "दुःशासना, माझ्या मर्माचा वेध घेणारे हे बाण शिखंडीचे नव्हेत बरं का ! अशा प्राणांतिक वेदना देणारे हे वज्रदंडासारखे हे बाण माझ्या अर्जुनाचेच आहेत. गांडीवधारी कपिध्वज अर्जुनाशिवाय बाकी कोणाच्या बाणांत इतकी ताकद आहे म्हणा !" पण क्षत्रिय असे थोडेच मरतात ? क्षत्रिय मृत्यूही स्विकारेल तो लढत लढतंच ! एकतर विजय किंवा मृत्यू या निर्धारानेच ! भीष्मांनी हातात ढाल आणि तलवार घेतली. अर्जुनाने त्या ढालीचेही तुकडे तुकडे केले. भीष्मांच्या शरीरावर जखम झालेली नाही, अशी बोटभरही जागा उरली नव्हती. अस्ताला चाललेला सुर्य अगदी क्षितिजापर्यंत पोहोचला होता. शरीर क्षीण होत चालले आणि अखेर भीष्म रथातून कोसळले. कुरुक्षेत्र स्तब्ध झाले. श्वास रोखले गेले. धरणीही कंपित झाली. शुभ्र पापण्या किंचित फडफडल्या, भीष्मांनी आकाशाकडे पाहिले, सुर्यनारायण दक्षिणेकडे झुकला होता. भीष्मांची छाती मंदगतीने वरखाली होत होती. थोड्यावेळापुर्वीचाच तो प्रकाश पुनश्च भीष्मांसमोर दाटला. दक्षिणायनात मृत्यू स्विकारणे योग्य नव्हे गंगापुत्रा.. पुर्वी पित्याने आशीर्वाद दिला होता, इच्छामरणी होशील.. रणांत अवध्य राहशील ! तो आशीर्वाद आता सफल होऊ दे ! उत्तरायण येईपर्यंत, या कुडीत प्राण राहिले पाहिजेत. तोपर्यंत हे डोळे उघडे राहायला हवेत.
पितामहांनी सभोवताली नजर फिरवली. कौरव काय किंवा पांडव काय... माझीच नातवंडं ! पर्वतासारखे राकट ! सिंहासारखे पराक्रमी योद्धे ! सारे आता हुंदके देत रडत होते. त्वेषाची, क्रोधाची भावना आता दुःखात बदलली. द्रोणांनी आपल्या सैनिकांना युद्ध थांबवण्याची आज्ञा केली. भोवताली अजूनही युद्ध चालूच होते, पांडवांनीही आपले दूत पाठवून युद्ध थांबवण्याची सूचना केली. सेना भीष्मांभोवती जमू लागली. "बाबांनो, आधाराविना माझे हे डोके असे लोंबकळत आहे, कोणी मला आधार देईल का ?" तत्क्षणी काहीजण रेशमी वस्त्रांच्या उश्या घेऊन पितामहांपाशी धावत आले. "छे छे ! शरशय्येवर पडलेल्या वीरांनी अशा राजगृहातल्या उश्या वापराव्यात ? बाळ अर्जुना, माझ्यासाठी अनुरूप अशी व्यवस्था करणं केवळ तुलाच शक्य आहे ! करशील ?" हुंदके देणाऱ्या अर्जुनाने, आपल्या डोळ्यांतले अश्रू कसेबसे आवरले; डाव्या हातात गांडीव पेलून तीन बाणांनी भीष्मांच्या शिराला आधार दिला. "वाह रे पांडुपुत्रा ! हे तुलाच शक्य आहे. शक्य झाले नसते, तर तुझ्या ह्या आजोबाने तुला शाप दिला असता बरं ! पहा रे सर्वांनी, माझ्या अर्जुनाने कशी उशी दिली मला ! आता उत्तरायण येईपर्यंत मी हा असाच इथे पडून राहणार !"
दुःखातिरेकाने कासावीस झालेले सारे वीर जड पावलांनी भीष्मांभोवती प्रदक्षिणा घालू लागले. कोणासही हुंदके आवरत नव्हते. सुर्य केव्हाचा अस्ताला गेला होता. कुरुक्षेत्रावर अंधार दाटत होता. शोकसागरात बुडालेले वीर एक-एक करत आपापल्या शिबिराकडे चालू लागले, भीष्मांनी शांतपणे डोळे मिटले आणि सुर्यनारायणाची उपासना आरंभली. कुरुक्षेत्रावर संथ स्वरात वैदिक मंत्रांचा घोष होऊ लागला...
(भीष्मवधपर्व समाप्त)
- डॉ. सागर पाध्ये
(चित्र - गुगल साभार)
जबरदस्त..!
ReplyDeleteHello,sir
ReplyDeleteTumchyashi thod bolaycha hot tumchya blogs vishayi. Tumchyashi kashya prakare contect Karu shakto me ? Tumcha gamil kivva Instagram kahi asel tr deu shakta ka ?