ही गोष्ट आहे शिवकाळातील कोंढवे गावच्या एका तरुणाची, त्याचं नाव 'येसाजी पाटील कामथे'. त्याचे पुर्वज एका मुसलमानाच्या वतीने गावच्या मोकदमीचा कारभार पहात असत. पुर्वी हिशेबात काही गडबड झाल्याच्या कारणाने येसाजीच्या मोठ्या भावाला सिंहगडावर नेऊन त्याचे डोके मारले होते. मात्र एक दिवस अवचित येसाजीला शिवछत्रपतींसाठी एक काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीचे येसाजीने सोने केले...
शिवचरित्र साहित्य खंड दोन, लेखांक १०५ मधील एका पत्रात ही गोष्ट आली आहे. पुर्वी दौलतशाह नावाच्या कोणा मुसलमान व्यक्तीकडे असलेले इनाम, त्याला मुलगा नसल्याने त्याची मुलगी रतनमा हिच्याकडे आले होते. त्याचा कारभार मात्र बाळोजी, हरजी व जाव पाटील पाहत असत. पुढे दादाजी कोंडदेवाच्या काळात सिंहगडावर नेऊन कुलकर्णीपण पाहणारा बावाजी पाटील व इतर कारभाऱ्यांची डोकी मारली गेली. त्या बावाजी पाटलाचा धाकटा भाऊ येसाजी पाटील !
एक दिवस शिवछत्रपती शिवापुरास आले आणि महाराजांनी शिवापुरात बाग आमराइसाठी धरण बांधण्याचा हुकुम सोडला. राजाचं काम म्हणून लोक लगबगीने कामास लागले; पण या कामात एक निराळाच अडथळा निर्माण झाला. वाटेतंच एक भला मोठा धोंडा होता, त्याने धरणाचे पाणी अडवून धरले, प्रवाह पुढे जाईना. महाराजांची आज्ञा झाली, "आम्हीं स्वारीहून येतो, तो पावेतो हर इलाज करून एवढा धोंडा फोडून पाण्यास वाट करणे." आणि महाराज खरंच जेव्हा स्वारीहून परत आले, तो काय आश्चर्य ? खरंच कोणीतरी तो धोंडा फोडून पाण्यास सुरळीत वाट करून दिली होती. "ही कर्तबगारी कोणाची ?" असे विचारताच लोकांनी येसाजी पाटलाचे नाव राजांना सांगितले.
खुश होऊन महाराजांनी येसाजीला बक्षिस द्यायचे ठरवले. त्यावर येसाजीने दिलेले उत्तर अगदीच लक्षात राहण्यासारखे आहे. 'काही रोख रक्कम दिली तर आज-उद्या संपेल. त्यापेक्षा पुर्वी माझ्या वडीलबंधूस (बावाजी पाटील) काही कामकाजानिमित्त सिंहगडास नेऊन, तिथे देडदंड झाला, तेव्हा आता महाराजांनी कृपावंत होऊन कोंढवे गावची पाटीलकीच आमचे नावे करून द्यावी,' अशी अर्जदास्त येसाजीने महाराजांसमोर पेश केली.
महाराजांनीही मागितलेली बक्षिसी येसाजीस सन्मानपुर्वक बहाल केली. येसाजीच्या दिवंगत भावाच्या मुलाच्या नावे इनाम करण्यात आले.
[ शिवचरित्र साहित्य खंडात प्रसिद्ध झालेले पत्र - १/२]
( २/२)
राज्यकर्ता सक्षम असला म्हणजे, म्हणजे प्रजेत सुरक्षिततेची भावना आपोआप निर्माण होते आणि सामाजिक जीवनात स्थैर्य आले, म्हणजे देशातील नागरिकांच्या कर्तृत्वास आपोआप चालना मिळते. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून शिवकाळातील ही एक कथा सागंता येते.
महाभारतात शरशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहांनी युधिष्ठीराला केलेला उपदेश आठवतो का ?
कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् ।
इति ते संशयो मा भूद् राजा कालस्य कारणम् ।।
[(हे युधिष्ठीरा), काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयी तूं संशयांत पडू नको. कारण की, राजा हाच काळाचे कारण आहे.]
धन्यवाद !
©डॉ. सागर पाध्ये
(सदर पत्र हे १७८९-९० सालचे, म्हणजे शिवछत्रपतींच्या पश्चात सुमारे एकशे दहा वर्षांनी लिहिलेले आहे. जमिनीच्या वादात एका पक्षाने आपल्या पुर्वजांची ही कहाणी सांगितली आहे.)
मस्त 👍 शिवकल्याणराजा
ReplyDelete