स्वराज्य…महाराष्ट्रधर्मोदयासमयी जिजाऊसाहेब व शाहजीराजांस पडलेले गोमटे स्वप्न ! स्वराज्य…ज्याला मुर्त स्वरुप दिले क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपतींनी ! माता-पित्यांच्या प्रेरणेने स्वराज्याची एक-एक विट रचण्यास सुरुवात करणारा एक किशोरवयीन मुलगा ते दिडशे-पावणेदोशे वर्षे स्थिर झालेल्या आदिलशाही सत्तेविरोधात प्रचंड आत्मविश्वासाने शड्डू ठोकून त्यांना समर्थपणे चीत करणारा तरुण, हा शिवछत्रपतींचा प्रवास चित्तथारक आणि प्रेरणादायी आहे. इ. स. १६४२ मध्ये दादाजी कोंडदेवांसोबत शिवाजीमहाराज आणि जिजाऊसाहेब यांना शाहजीराजांनी बंगळूराहून पुण्याकडे पाठवून दिले. तिथून शिवाजीराजे, जिजाऊसाहेब आणि दादाजी कोंडदेव ही त्रयी पुण्याकडील जाहगीरीचा कारभार पाहत होती. याकाळात आपल्या अखत्यारीतला प्रदेश किल्ल्यांच्या साथीने महाराज अधिकाअधिक बळकट करत गेले. बारा मावळांतील देशमुख देशपांड्यांस ते राजी झाल्यास सोबत घेऊन, वाटेत आडवे आल्यास त्यांस दस्त करुन संचणी करत चालले. दरम्यान आपले राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, हे बारा मावळातील लोकांत राजांनी पक्के ठसवले. ही वाटचाल सुरु असतानांच इ. स. १६४८ च्या उत्तरार्धात अठरा वर्षे वयाच...
।। महाराष्ट्रधर्मसेवातत्परः पाध्ये कुलोत्पन्नः अपर्णासुतः सागरः निरन्तरः ।।