Skip to main content

स्वराज्याचा श्रीगणेशा


स्वराज्य…महाराष्ट्रधर्मोदयासमयी जिजाऊसाहेब व शाहजीराजांस पडलेले गोमटे स्वप्न ! स्वराज्य…ज्याला मुर्त स्वरुप दिले क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपतींनी ! माता-पित्यांच्या प्रेरणेने स्वराज्याची एक-एक विट रचण्यास सुरुवात करणारा एक किशोरवयीन मुलगा ते दिडशे-पावणेदोशे वर्षे स्थिर झालेल्या आदिलशाही सत्तेविरोधात प्रचंड आत्मविश्वासाने शड्डू ठोकून त्यांना समर्थपणे चीत करणारा तरुण, हा शिवछत्रपतींचा प्रवास चित्तथारक आणि प्रेरणादायी आहे.

इ. स. १६४२ मध्ये दादाजी कोंडदेवांसोबत शिवाजीमहाराज आणि जिजाऊसाहेब यांना शाहजीराजांनी बंगळूराहून पुण्याकडे पाठवून दिले. तिथून शिवाजीराजे, जिजाऊसाहेब आणि दादाजी कोंडदेव ही त्रयी पुण्याकडील जाहगीरीचा कारभार पाहत होती. याकाळात आपल्या अखत्यारीतला प्रदेश किल्ल्यांच्या साथीने महाराज अधिकाअधिक बळकट करत गेले. बारा मावळांतील देशमुख देशपांड्यांस ते राजी झाल्यास सोबत घेऊन, वाटेत आडवे आल्यास त्यांस दस्त करुन संचणी करत चालले. दरम्यान आपले राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, हे बारा मावळातील लोकांत राजांनी पक्के ठसवले. ही वाटचाल सुरु असतानांच इ. स. १६४८ च्या उत्तरार्धात अठरा वर्षे वयाच्या या शाहजीपुत्राने आदिलशाही सरदार फतेहखानास धूळ चारली. या युद्धामुळे शिवछत्रपती आणि आदिलशाहा यांच्यातील शत्रुत्व उघड झाले. ‘शिवाजी’ या नावाचे एक उघड आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे याची जळजळीत आणि प्रखर जाणीव आदिलशाही सत्तेला झाली. इ. स. १६४२ पासून हा विजय मिळवण्याइतके एका जाहगीरदाराच्या मुलाने स्वतःस कसे घडवले, परकीय आक्रमणास स्वतंत्रपणे तोंड देता येईल, इतके स्वतःला कसे बुलंद केले, तितकाच आत्मविश्वास मावळातल्या दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या पोरासोरांत कसा निर्माण केला हे पाहणे निश्चितंच प्रेरणादायी आणि अभ्यासनीय आहे. इ. स. १६४२ ते इ. स. १६४८ अशा सुमारे सहा वर्षांतील काही घडामोडी आता विस्ताराने पाहू.

शिवछत्रपतींच्या कार्याचा प्रारंभ पहावयाचा म्हटले, म्हणजे महाराजांना समकालीन असलेल्या,त्यांच्याच दरबारातील कविन्द्र परमानन्द लिखित ‘शिवभारत’ आणि कृष्णाजी अनंत सभासद लिखित ‘सभासद बखर’ या दोन ग्रंथांशिवाय अन्य पर्याय नाही. पैकी सभासद बखरीत (पृ. क्र ४) बारा वर्षे वयाचे असताना शिवाजीराजे, जिजाऊसाहेब व दादाजी कोंडदेव बंगळूरास शाहजीराजांच्या भेटीस गेले; त्यासमयी शामराव निळकंठ म्हणून पेशवे, बाळकृष्णपंत मुजूमदार, सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस असे कारभारी देऊन त्यांना पुण्याला रवाना केले; असा वृत्तांत आहे. यापुढे सभासद म्हणतो, ‘येतांच बारामावळे काबीज केलीं. मावळे देशमुख बांधून दस्त करुन, पुंड होते त्यांस मारिले. त्याजवर, कालवशात, दादाजी कोंडदेव मृत्यू पावले. पुढें शिवाजी राजे आपणच कारभार करीत चालले.’ हा वृत्तांत्त इ. स. १६४२ पासून इ.स. १६४७ पर्यंतचा आहे. इथून पुढे सभासद थेट शिवरायांनी आपल्या सावत्र मामाला कैद करुन सुपे परगणा आपल्या ताब्यात घेतल्याची हकीकत सांगतो. अर्थात सभासद बखरीतील हा कालक्रम चुकलेला आहे. सुपे घेतल्याची ही हकीकत शके १५७८ (इ. स. १६५६)ची आहे(१अ,आ). शिवभारतात शिवाजी महाराज बारा वर्षांचे असताना शाहजीराजांस शंकराचा दृष्टांत झाला, त्यानुसार बंगळूराहून शिवाजी महाराजांना पुण्यास धाडून त्यांची शाहजी राजांनी पुणे प्रांतावर नेमणुक केली. इथून पुढे शिवाजीराजे विद्याभ्यासात कसे निपुण झाले, वगैरे वर्णन शिवभारतात आहे. सुरुवातीच्या कारवायांचे याहून अधिक उल्लेख मिळत नाहीत. शाहजीराजांनी शिवाजीराजांसोबत बंगळूराहून पाठवलेले मंत्रिमंडळ, बारा मावळे काबीज केल्याचा उल्लेख, किल्ल्यांची बांधणी व मजबुती केल्याचे उल्लेख; विश्वसनीय साधनांतून मिळालेल्या इतक्याच तुटपुंज्या माहितीवर विसंबून आपल्याला घटनांची संगती लावावी लागते.

अगदी सुरुवातीचा हृदयंगम व रोमांचकारी प्रसंग म्हणजे शिवरायांनी रोहिडेश्वराच्या साक्षीने घेतलेली स्वराज्याची शपथ. रोहिडखेऱ्याच्या गुप्ते घराण्यात मिळालेल्या कागदपत्रांपैकी अनेक कागदपत्रे मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड पंधरावा (नवीन आवृत्ती खंड दुसरा) मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. यापैकी दोन पत्रांमध्ये रोहिडेश्वरावर झालेल्या शपथेच्या प्रसंगाचा उल्लेख येतो (लेखांक २६८,२६९). कादंबरी-नाटक वा चित्रपटकारांना हा प्रसंग दृश्य करण्याचा मोह आवरत नाही. काही ऐतिहासिक चरित्रांतही हा प्रसंग वर्णिला आहे. इ.स. १६४४ मध्ये आदिलशाहा आणि शाहजीराजे यांच्यामध्ये बेबनाव झाला(२). या बेबनावात आदिलशाहाने शाहजीराजांच्या दरबारातील वकीलाचा हात कापला(३). कोंढाण्याच्या बाजूस दादाजी कोंडदेवास दस्त करण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस आदिलशाहाने पाठविले(४). पुणे परगण्याचा ताबा आदिलशहाच्या तर्फेने ‘त्रिंबकजीराजे’ याने घेतला(५). पुढे हा बेबनाव संपुष्टात येऊन शाहजीराजांस त्यांची जाहगीर पुन्हा मिळाली; परंतु या घटनेविषयी अधिक माहिती मिळत नाही. ही एकंदर घटना आणि रोहिडेखोऱ्यासंबंधीची उपर्युक्त पत्रे यांचा कालखंड एकंच आहे. या पत्रांचा उपयोग करुन विजयराव देशमुख यांनी या काळात नक्की काय घडले असेल, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे; सोबत रोहिडेश्वरावरील शपथेचा प्रसंगही आपल्या शिवचरित्रात दिला आहे(६). वास्तविक रोहिडखोऱ्याची याबद्दलची सहा पत्रे (लेखांक २६६-२६९, २७३ आणि ३०७) विश्वसनीय नाहीत असे द. वि. आपटे व ग. ह. खरे यांनी मत दिले होते. मेहेंदळेंच्या श्री राजा शिवछत्रपती भाग २,परिशिष्ट क्र २९ मध्ये ती पत्रे बनावट का आहेत, याविषयीचे स्पष्टीकरण आले आहे. रोहिडखोरे शाहजीराजांच्या जाहगीरीत येत नव्हते, तसेच वर उल्लेखलेली पत्रे खोटी आहेत असे मानले, तर रोहिडेश्वरावरील शपथेच्या प्रसंगासही काहीच आधार उरत नाही.

शाहजीराजांची जाहगीर हे शिवछत्रपतींचं प्राथमिक कार्यक्षेत्र आहे आणि स्वराज्याचे अविभाज्य अंग म्हणजे स्वराज्याचे किल्ले ! इतकं अविभाज्य की ‘शिवाजीचं राज्य म्हणजे त्याचे किल्ले’, हा स्वराज्याच्या शत्रुंचाही ठाम समज होता. समकालीन उल्लेख पाहिले, म्हणजे सर्वप्रथम याच प्रदेशातील किल्ल्यांची बळकटी करुन हा प्रदेश अधिकाअधिक बुलंद आणि शत्रुस दुर्लभ्य करण्याकडे शिवाजी महाराजांनी लक्ष पुरवले आहे असे दिसते. आदिलशाही मुलखातल्या विभागांना परगणे म्हणत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान उपशाखा फुटल्या आहेत. अशा दर दोन उपशाखांच्या मधून सामान्यतः एखादी छोटीशी नदी उगम पावते. या नद्यांच्या खोऱ्यांना मावळे किंवा खोरी असे म्हणतात. या काळात शाहजीराजांच्या पुण्याकडील जाहगीरीत पुणे, सुपे, इंदापूर, चाकण, शिरवळ हे परगणे; हिरडस मावळ, गुंजण मावळ, कानद खोरे, मोसे खोरे, मुठे खोरे, पौड खोरे, वेळवंड खोरे, खेडेबारे, कर्यात मावळ ही मावळे इ. प्रदेश येत होता(७).

आपल्या उद्दिष्टपुर्तीच्या दिशेने वाटचाल करताना शिवाजीमहाराजांनी आपल्या हाताखालील प्रदेशाची प्रथम उत्तम व्यवस्था लावली. ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावें ? याकरितां पुर्वी जे जे राजे झाले त्यांणी आधीं देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केलें. हे राज्य तर तीर्थरुप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरुनंच निर्माण केलें.’ प्रत्यक्ष महाराजांच्या सान्निध्यात राहिलेल्या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातील हा उल्लेख पाहता, जिजाऊसाहेब, दादाजी कोंडदेव आणि शिवछत्रपती या त्रयींस दुर्गांचे महत्व उत्तम ज्ञात होते आणि स्वराज्यनिर्मितीच्या उद्योगात मावळप्रांताची घडी बसवतानाच किल्ल्यांच्या रुपाने दुर्गम स्थळांचीही व्यवस्था बसवत होते हे अगदी सहज उघड आहे. आपल्या सवंगड्यांसह शिवछत्रपतींनी सोळाव्या वर्षी जिंकलेला किल्ला म्हणजे ‘तोरणा’ ! सर्वप्रथम हा तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले,  ही आपल्याला ठाऊक असलेली गोष्ट. या गोष्टीचे मुळ दोन बखरींत आहे. पहिली एक्क्याण्णव कलमी बखर जी शिवछत्रपतींनी किल्ले घेतल्याची हकीकत सांगताना सर्वप्रथम पुरंदर किल्ल्याची गोष्ट सांगते ( कलम २७,२८). त्यानंतर एकोणतिसाव्या कलमात ‘त्याउपर किला चाकण तेथे ठाणें दादाजीपंताचें तेथे फिरंगोजी नरसाले हवालदार ठेवून लोक आपले स्वाधीन केला त्याउपर राजगड व पद्मावती संजीवनी व सुवेला येकुण राजगडचे इमारतीवर मोरो त्रिमल चाकरीस ठेविले सिंहगड व तोरणा प्रचंडगड घेतला’, असा उल्लेख आहे(८). एकूणच बखरकाराकडून कालानुक्रमाची मोडतोड झाली आहे, बाकीही बारकाव्यांत तो चुकला आहे; पण तो राजगड व तोरणा घेतला असे म्हणतो. ही बखर इ. स. १७५० च्या सुमारास अर्थात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास ऐंशी वर्षांनी लिहिली गेली. याशिवाय तोरणा घेतल्याच्या रोमांचकारी घटनेचे रसभरीत वर्णन येते, ते मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरीत. ही बखर तर एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस लिहिली गेली आहे. सवंगड्यांसह एके दिवशी जाऊन शिवरायांनी तोरणा जिंकला, त्याला प्रचंडगड नाव दिले सोबत राजगडही बांधला, महाराजांना प्रचंडगडावर द्रव्यही सापडले असे वर्णन चिटणीस बखरीत आहे. हाच आपल्याला माहित असलेल्या गोष्टीचा मुळ स्त्रोत ! चिटणीस बखर तितकिशी विश्वसनीय म्हणता येणार नाही; ‘तोरणा घेतला’ असा उल्लेख वर उल्लेखलेले दोन्हीही समकालीन चरित्रकार करत नाही, हे आपण पाहिले. तोरणा व राजगडापैकी राजगडाचा तेवढा उल्लेख सभासद बखरीत ‘मुरबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले. त्याचें नाव राजगड म्हणोन ठेविलें. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या’ (पृ.क्र. ७); असा आला आहे. जेधे करिन्यात ‘स्वामीनी (शिवाजी महाराजांनी) किले राजगड तोरणा किलीयास इमारतीचे काम लाविले किले तयार केले’ अशी नोंद आहे(९).

या संपुर्ण काळाचे इतिहासाचार्य राजवाडेंनी जे विवेचन केले आहे, ते विचारात घेण्यासारखे आहे; बखरींतील उल्लेख पाहता राजगड शिवाजी महाराजांनी बांधून काढला आणि नंतर तोरणा आदिलशाही किल्लेदाराकडून जिंकून घेतला, असा राजवाडेंच्या लिखाणाचा आशय आहे. ‘कोणीही विचारी पुरुष मुख्य प्रधान, अमात्य, युक्ताभिज्ञ व सेनालेखक, असे राजपुरुष आपल्या पदरी बाळगूं लागला म्हणजे तो काही तरी राजकारणात गुंतला असावा असा निश्चयाने तर्क करावा लागतो. सैन्य असल्याशिवाय सबनीस येत नाही. बाहेर काही राजकाण उत्पन्न झाल्याशिवाय युक्ताभिज्ञ म्हणजे डबिराची गरज नाही; जमाखर्च आल्यावाचून अमात्याची जरूर नाही व स्वारीशिकारीशिवाय मुख्य प्रधानेचही काम नाही. तेव्हा शके १५६८ (इ.स. १६४६) पुर्वी शिवाजीने किंवा शिवाजीच्या मसलतगारांनी काही तरी राजकारण उपस्थित केले असले पहिजे… … शके १५६०त (इ.स.१६३८-३९) मावळांतील देशमुखांस दस्त करण्याची कल्पना जेव्हा प्रथम निघाली तेव्हा व पुढे एखादा तरी किल्ला हातांत असावा असें त्या वेळेच्या मुत्सद्द्यांना साहजिक वाटले असावें. देशमुखांना दस्त करीत असताना मुरवाडच्या डोंगरातील दुरजादेवीच्या पर्वतावर किल्ला बांधण्याचा उपक्रम चार-पांच वर्षें चालला असावा असे दिसतें. कां कीं कोणताही किल्ला वर्ष सहा महिन्यात नवीन असा बांधून निघणें दुरापास्त आहे. नवीन किल्ला तयार करण्यास चार पांच वर्षें निदान लागलीं असा अदमास दिसतो. तेव्हा तोरणा किल्ला घेण्याच्या सुमारास राजगडचा किल्ला संपूर्ण होत आला असावा व राजगड संपूर्ण होताना तोरणा स्वाधीन करुन घेण्याची आवश्यकता भासली असावी असे वाटते. मावळातील दस्त केलेल्या व दस्त करुं घातलेल्या देशमुखांना दहशत पडण्याकरितां एखादा किल्ला हातांत असणे जरुर होतें. जर प्रथम तोरणा किल्ला शिवाजीच्या हस्तगत झाला असता, तर राजगड नवीन बांधित बसण्याच्या खटपटींत पडून शिवाजीनें मेहनतीचा व पैशाचा व्यर्थ व्यय केला नसता. प्रांताचे संरक्षण करण्याकरितां एखादा किल्ला असावा अशी जेव्हा कल्पना निघाली तेव्हा आसपासच्या किल्लेदारांना वश करण्याचा प्रयत्न झाला असावा. तो प्रयत्न सफल होत नाही असें पाहून नवीन किल्ला बांधण्याची खटपट करावी लागली. राजगड बांधलेला पाहून तोरण्याची दुरधिगम्यता नष्ट झाली व तो किल्ला शिवाजीच्या हातांत पडला. येणेंप्रमाणे राजगड बांधण्याचे व तोरणा घेण्याचें काम परस्परावलंबी होतें व बखरनविसांच्या साध्याभोळ्या लिहिण्याप्रमाणें सोपें नव्हते हे उघड आहे(१०).

थोडक्यात जाहगीरी शाहजीराजांची असताना जाहगीरीतील किल्ल्यांवर किल्लेदार मात्र आदिलशाहाचा असे, शिवाजी महाराजांनी या किल्लेदारांना ताब्यात घेऊन वा वश करुन किल्ले ताब्यात घेतले, असे उत्तरकालीन बखरींतून सांगितले जाते. पण त्यास इतर आधार सापडत नाही. एका आदिलशाही फर्मानात दादाजी कोंडदेव शाहजीराजाचे मुतालिक असल्याचा उल्लेख केला आहे(११अ). दादाजी कोंडदेव, आदिलशहाचे सुभेदार नसून शाहजीराजांचा सुभेदार असावेत आणि ते शाहजीराजांच्या तर्फेने कोंढाणा किल्ल्याचा कारभार पहात असावेत(११आ). याच पद्धतीने पुरंदरचा किल्लेदार माहादाजी निळकंठराव याच्यावरंही शाहजीराजांचा आणि पर्यायाने शिवाजीराजांचा अधिकार चालत असावा, असे दिसते(११इ). राज्य आदिलशाहाचे, जाहगीरी शाहजीराजांची आणि शाहजीराजांचे तर्फेने कोणीतरी किल्ल्यांची व्यवस्था चालवे, असे मानून चालले म्हणजे यारितीने शिवाजी महाराजांनी आपले उद्दिष्ट मनात ठेवून, नूतन राज्यनिर्मितीसमयी आपल्याच अखत्यारित येणाऱ्या प्रदेशातील किल्ल्यांची मजबुती करुन बुलंद व बळकट करण्याचे काम चालविले आणि सुरुवातीपासून मुलूख शिवाजीच्या अधिकारांतला हे विजापूरदरबार व जाहगीरींतले लोक यांना मान्य होते, असे दिसते. हा उद्योग दिर्घकाळ चालला. नवीन बांधकाम करुन, शिवाजीमहाराजांनी किल्ले दुर्गम व बुलंद केलेच, शिवाय किल्ल्यांवरील कारभाराची दुर्व्यवस्था होत आहे, असे वाटताच त्या किल्ल्याचे सर्वाधिकार आपल्या ताब्यात घेऊन, तिथली व्यवस्थाही सुरळीत केली. सभासद बखरीत उल्लेखलेले पुरंदर किल्ल्याच्या बाबतीले याबद्दलचे उदाहरण बोलके आहे, ‘सवेंच पुरंदरगड इदलशाही येथे निळकंठराव म्हणोन ब्राह्मण गडास खावंद होते, ते मेले. त्यांचे पुत्र दोघे, ते एकांत एक भांडू लागले. यांची समजावीस करावयास म्हणोन राजे पुरंदरास गेलें आणि ते दोघे भाऊ कैद करुन तोही गड आपणच घेतला. आपले ठाणें बसविलें’ ( पृ. ५,६ ). कदाचित तोरणा किल्ल्याच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला असावा, परंतु पुराव्यांअभावी काहीच सांगता येत नाही.

एकंदर प्रकार पाहता, जाहगीर म्हणून मिळालेल्या प्रदेशातील किल्ल्यांवरंही जाहगीरदाराचाच अधिकार चालत असावा, जाहगीरदाराने आपापल्या पद्धतीने परंतु आदिलशहाच्या नावाने कारभार चालवावा, असा प्रकार चालत असावा असे वाटते. किमानपक्षी या डोंगरी किल्ल्यांवर राहण्याची दगदग असह्य वाटल्याने निदान तिथला कारभार, तिथेच राहणाऱ्या जाहगीरदार वा तेथील देशमुखांच्या हातात असावा(११ई). यादृष्टीने सुरुवातीच्या काळात विजापूर दरबाराकडून शिवाजी महाराजांवर विशेष ठपकाही आलेला दिसत नाही(११उ). समकालीन चरित्रकारांनाही त्या गोष्टीचे विशेष महत्व वाटत नाही, सभासद ‘बारा मावळे काबीज केली’ असा मोघम उच्चार करुन पुढे जातो. जेधे करिन्यातील ‘किले राजगड तोरणा किलीयास इमारतीचे काम लाविले..’ हा याबाबतीतला एकमेव उल्लेख आहे; या सर्व गोष्टींची आता उत्तम संगती लागते.

शंकासमाधानासाठी आता अजून एक मुद्दा लक्षात घेऊ. खाफीखान हा शिवाजी महाराजांना समकालीन होता, मात्र त्याने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना आपल्या ‘मुन्तखबुल्लूबाब’ या ग्रंथात अठराव्या शतकाच्या सुरुवातीस काही ठिकाणी संदर्भग्रंथांचा आधार, तर कधी स्मरणशक्तीचा आधार घेऊन लिहिल्या आहेत. प्रस्तुत लेखासाठी मी इलियट आणि डाऊसन यांनी ‘The history of India as told by it's own historians (vol. 7)’ या ग्रंथात दिलेल्या इंग्रजी भाषांतराचा उपयोग केला आहे. त्यामधील पृ. क्र. २५७ वरील उल्लेख असा, ‘He assembled a large force of Mahratta robbers and plunderers and set about reducing fortresses. The first fort he reduced was that of Chandan.’ थोडक्यात शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला म्हणजे चंदनगड, असे खाफीखान म्हणतो. चिटणीसाच्या बखरीत चंदनगड अफजलखानवधाच्या आधीच कधीतरी घेतल्याचा उल्लेख येतो. याबाबत अधिक खोलात जाऊ पाहता, ‘शिवभारत’ या विश्वसनीय संदर्भग्रंथात अफजलखानवधानंतर शिवाजी महाराजांनी ताबडतोब जी मोहिम हाती घेतली, त्याविषयी सांगताना कविन्द्र परमानन्द पुढील उल्लेख करतात,
ततस्तु तस्य सैन्यानि परसैन्येन पालितौ ।
पर्यमंडलयंश्र्छैलावुभौ चंदनवंदनौ ।। (अ.२३,श्लोक ५२)
[अर्थ- पुढे शत्रुसैन्याने रक्षिलेल्या चंदनवंदन या दोन्ही किल्ल्यांस त्याच्या सैन्यानी वेढा दिला ]
अफजलखानवधाची तारीख येते १० नोव्हेंबर १६५९ ,थोडक्यात वरील उल्लेख पाहिला, तर १६५९ पुर्वी चंदनवंदन गड स्वराज्यात नव्हते हे लक्षात येते. तसेच ते या मोहिमेतंही स्वराज्यात आले नसावेत. उपलब्ध पत्रांतील उल्लेखांनुसार इ. स. १६४५, १६६२ व १६६७-६८ या वर्षांत तरी चंदन-वंदनगड आदिलशाहाकडेच होते, याची खात्री पटते(१२). सातारा गॅझेटियरमध्ये हे किल्ले शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये घेतल्याचा ओझरता उल्लेख आहे(१३). त्यासाठी त्यांनी कोणता संदर्भ वापरला हे समजण्यास मार्ग नाही. सभासद बखरीत मात्र याच सुमारास अण्णाजीपंत दत्तो यांनी हा किल्ला घेतल्याचा उल्लेख आहे (पृ. क्र. ९४). त्यामुळे खाफीखानाच्या उल्लेखास अन्य काहीही आधार नाही; असेच म्हणावे लागेल.

थोडक्यात शिवछत्रपतींसोबत वावरणारे त्यांचे दोन्हीही समकालीन चरित्रकार शिवाजीमहाराजांनी घेतलेली स्वराज्याची शपथ अथवा त्यांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला अशा कुठल्याही घटनेचे वर्णन करत नाही. उपलब्ध कोणत्याही समकालीन पत्रात वा एखाद्या विश्वसनीय साधनात याबाबतचा उल्लेख नाही. तशी पहिली लढाई म्हणावीच, तर फतेहखानस्वारीचे परमानन्दाने शिवभारतात विस्तारपुर्वक व सुरस वर्णन केले आहे. बंगळूराहून पुण्यास परत आल्यावर स्वराज्यनिर्मितीच्या नियोजनबद्ध कार्यास गती मिळाली. या कार्यामागे जिजाऊसाहेब, दादाजी कोंडदेव व शिवछत्रपती या तिनंही कर्तृत्ववान व्यक्तींचा हात दिसतो. अमुक एका घटनेकडे बोट दाखवून हीच ती घटना, हाच तो क्षण असं वर्णन सुरस चरित्र कथन करताना शोभून दिसतं. वास्तवात इतक्या भव्य आणि अवघड लक्ष्यपुर्तीसाठीची पायाबांधणीही दिर्घकाळ चालू असणार हे उघड आहे; सामान्य वाचकांसाठी याचे महत्व गौण असले, तरी या कालखंडाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना त्याची चिकीत्सा करणे अटळ आहे. उत्तरकालीन बखरींच्या आधाराने अमुक एक किल्ला घेण्याच्या सुरस गोष्टी प्रचलित आहेत, त्याने आधी हा किल्ला की तो असा संभ्रम निर्माण होतो. त्यादृष्टीने प्रस्तुत लेखात हा भाग विस्ताराने मांडला आहे.

शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे, एक विजेता सेनापती नव्हे. फक्त किल्ले घेऊन राष्ट्र निर्माण होणार नव्हते. राज्य हवे म्हणजे त्यात प्रजा हवी, राष्ट्रासाठी प्राणपणाने लढणारे सैनिक हवेत, सक्षम राज्यव्यवस्था हवी, कोश हवेत. छत्रपतींच्या कर्तृत्वाचा प्रारंभ पाहताना या गोष्टींशी निगडीत मुद्द्यांकडेही पाहिले पाहिजे. इ. स. १६३० च्या दरम्यानची मुरार जगदेवाची स्वारी, दोन वेळा पडलेला दुष्काळ यामुळे पुण्याची पुरती मसणवट झाली होती. हा उजाड मुलूख दादाजी कोंडदेवांनी लागवडीखाली आणला. देशमुख, देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, ‘हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.’ सक्षम न्यायव्यवस्था निर्माण केली आणि लोकांचा स्वराज्यावरील विश्वास दृढ केला(१४).

वरती सभासद बखरीतील उल्लेख आणि राजवाडेंनी केलेले विवेचन पाहून, शाहजीराजांच्या प्रेरणेने हाताशी कारभारी घेऊन महाराजांनी राज्यकारभार कसा हाकायला सुरुवात केली ते ध्वनित होतेच. विस्तारभयास्तव अधिक खोलात न जाता शिवाजी महाराजांच्या मनाचे इंगित काय होते, काय भावनेने आणि कशा पद्धतीने स्वराज्याचा कारभार चालत होता, हे दर्शविणारे एक पत्रंच लक्षात घेऊ(१५). खरंतर हे पत्रंच एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. उपलब्ध पत्रांपैकी शिवरायांची सुप्रसिद्ध ‘प्रतिपच्चंद्र..’ मुद्रा असलेले हे सर्वात जुने पत्र आहे. ज्युलियन कालगणनेनुसार पत्राची तारीख आहे २८ जानेवारी १६४६. त्यावरची मुद्रा अशी आहे,
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
[शाहजीचा मुलगा शिवाजी याची ही प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंदनीय अशी मुद्रा (लोकांच्या) कल्याणार्थ आहे.]
 
[शिवछत्रपतींचे २८ जानेवारी १६४६चे पत्र ; संदर्भ -शिवछत्रपतींची पत्रे खंड २ - डॉ. अनुराधा कुलकर्णी ]

शाहजीराजे, जिजाऊसाहेबांपर्यंत सर्वांच्या मुद्रा फारसीत असताना महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये आहे. मुद्रेतील उल्लेख पाहता स्वाभिमानाच्या भावनेने प्रेरीत नूतनराज्यनिर्मितीची महाराजांची महत्वकांक्षा, हे राज्य लोककल्याणार्थ आहे हे जनतेच्या मनात ठसवण्याचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पत्रातील मजकुराचा थोडक्यात सारांश असा, रांजे गावचा मोकदम (पाटिल) बावाजी गुजर याने बदअमल (व्याभिचार) केल्याचे सिद्ध झाल्याने त्याचे हातपाय तोडण्यात आले. त्यानंतर बावाजीकडून तीनशे होन दंड घेऊन, त्याला सोनाजी गुजर या त्याच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आले. पुन्हा दोनशे होन शेरणी सोनाजीकडून घेऊन बावाजीची पाटिलकी सोनाजीस दिली. स्वराज्यात एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्यास, त्याची सर्वप्रथम चौकशी होते, गुन्हा सिद्ध झाल्यास कोणतीही हयगय न करता कठोर शिक्षा होते; पुन्हा राज्याच्या व्यवस्थेत कसूर न होता, तीसुद्धा सुस्थित राखली जाते आणि गुन्हेगाराकडून दंड, लाभार्थ्याकडून ‘शेरणी’च्या रुपात ठराविक रक्कम घेऊन राज्याचे कोशही भरले जातात, असे स्वराज्याचे कितीतरी गुण या एका पत्रात दिसतात(१६). जुलमी मुसलमानी सत्तांच्या पार्श्वभुमीवर अशा न्यायाच्या, कल्याणकारी राज्यावर जनतेचा विश्वास दृढ होत नसेल, या स्वराज्यप्रेरक नेत्यासाठी तरुण प्राणपणाने लढण्यास तयार होत नसतील, तरंच नवल आहे.

दादाजी कोंडदेवांचा मृत्यूनंतर शिवरायांची खऱ्या अर्थाने स्वतंत्र कारकीर्द सुरु झाली, असे म्हणावे लागेल. १३ जुलै १६४६ नंतर, परंतु १९ जुलै १६४७ पुर्वी दादाजी कोंडदेवाचा मृत्यू झाला. या घटनेच्या एक्क्याण्णव कलमी बखर करते, तशा पाल्हाळीक वर्णनास काही आधार नाही. इकडे दादाजींचा मृत्यू होताच, आदिलशाहीकडून मिया रहिम मुहम्मद शिरवळ परगण्याचा कारभार पाहण्यासाठी नामजाद झाला. काही काळ शिरवळ परगण्याचा कारभार निश्चितपणे पहात होता(१७). त्यानंतर मार्च १६४८ पुर्वी बापुजी मुद्गल यांनी किल्लेदारास दगा देऊन शिवाजी महाराजांना कोंढाणा घेऊन दिला१८. शिरवळची गढी महाराजांच्या ताब्यात कधी आली याची मात्र निश्चित नोंद सापडत नाही. ऑगस्ट १६४८ च्या फतेहखानस्वारीपूर्वी ती महाराजांनी ताब्यात घेतली असावी(१९).

२५ जुलै १६४९ रोजी आदिलशाहच्या आज्ञेने मुस्तफाखान व इतर आदिलशाही सरदारांनी शाहजीराजांना कैद केले. आदिलशाही साधने अर्थातंच याबद्दल शाहजीराजांनाच दोष देतात. शिवभारतकार, शाहजीराजांनी पराक्रमाने कर्नाटक प्रांत आपल्या ताब्यात आणला आणि आदिलशाहाला शाहजीराजांना कैद करण्याची दुर्बुद्धी सुचली, असे सांगतो (अ. ११,१२). विस्तारभयास्तव या प्रसंगाच्या अधिक तपशीलात जात नाही. परंतु शाहजीराजांना कैद केल्यावर आता त्याच्या दोन्हीही मुलांवरंही जरब बसवणे गरजेचेच होते. त्यानुसार आदिलशाहच्या आज्ञेने बंगळूरात शाहजीपुत्र संभाजीराजांवर व पुण्याच्या जाहगिरीवर आदिलशाही सरदार चालून आले.

शाहजीराजांस झालेली कैद आणि फतेहखान चालून येत असल्याची बातमी शिवरायांना कळाली. स्वराज्याच्या ध्यासापोटी गेली सहा वर्षें जे कष्ट केले होते, त्यांची परीक्षा पाहणारा प्रसंग होता. बेसावध राहिल्याने शाहजीराजे कैदेत पडले, याबद्दल शिवरायांनी खेद व्यक्त केला; पण दुःख करत राहण्यास आता अवसर नव्हता. बंगळूरात फरादखानाने शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावरही स्वारी केली. पिता आणि दोघेही पुत्रं असे वावटळीत सापडले होते. कर्तृत्वान व्यक्तीवरंच संकट येतात म्हणे. आपले थोरले बंधू निश्चितंच फरादखानाशी लढा देऊन यश प्राप्त करणार असा शिवरायांना अढळ विश्वास होता; वन्ही केव्हाचा चेतला होता, अग्निकुंड धगधगले होते, स्वातंत्र्यदेवतेच्या यज्ञात ही पहिली आहुती पडणार होती. पुरंदरावर श्रीकृष्ण सज्ज झाला. सोबतीला गोदाजी जगताप, भीमाजी वाघ,संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर या पांडववीरांनी शस्त्रे परजली. कावजी त्यांचा सेनापती झाला (२०-अ) आणि श्रीकृष्णाने त्यांस गीतेचा पहिला पाठ सांगितला,
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।
‘वीरांनो, युद्धाचा निश्चय करा !’
फतेहखानाच्या सैन्यात मिनादशेख, रतनशेख, अशरफशहा, दुसरा एक फतेहखान, बजाजी निंबाळकर आणि बाळाजी हैबतराव हे सरदार होते. फतेहखानाने स्वतः बेलसर येथे छावणी टाकून बाळाजी हैबतरावास पुढे पाठवले. बेलसरावरील फतेहखानाच्या तुकडीवरील मराठ्यांनी हल्ला चढवला. मराठ्यांची तुकडी फुटली खरी;परंतु आमच्या एका सरदाराने विशेष पराक्रम गाजवला. अहो, आमचे निशाण, तो प्राणप्रिय भगवा पडून कसे चालेल ? निशाण पडतेय, असे पाहताच पाठीमागे फिरुन बाजी नाईक जेधे शत्रुच्या सैन्यात बेधडक घुसले. मराठ्यांचे निशाण पडू नये म्हणून निशाणाचा भाला स्वतःच्या हाती घेऊन पराक्रमांची पराकाष्ठा केली. महाराजांना कोण आनंद झाला. महाराजांनी बाजींना मानाची वस्त्रे दिली. वरतून त्यांस किताब देऊन गौरविले, ‘सर्जाराव’ !! (२०-आ)

बाळाजी सैन्यासह शिरवळची गढी बळकावून, त्यात जाऊन बसला. महाराजांनी मराठ्यांची एक तुकडी शिरवळच्या गढीस रवाना केली. बाळाजी गढीत जाऊन बसला खरा, पण दुर्मतीस हुशारी कुठून सुचावी ? शिरवळची गढी बिलकूल दुर्गम नव्हती. त्यास बुरुजही नव्हते. मराठ्यांनी गढीचा समोरील मार्ग रोखून धरला आणि गढीचा खंदक बुजवून टाकला. कुदळ, फावडी घेऊन गढीचा तट पाडून टाकला आणि शत्रुसैन्य उघड्यावर पडले. घनघोर लढाईस तोंड जुंपले. प्रत्येकाने पराक्रमाची शर्थ केली. कित्येकांची शिरे तुटली. बाणांच्या वर्षावांनी देह छिन्न झाले. खासा बाळाजी हैबतराव ठार झाला आणि विजयीवीरांसह कावजी पुरंदरावर महाराजांपाशी मुजऱ्यास रुजू झाले (२०-इ).

चवताळलेला फतेहखान पुरंदरावर चालून आला. पुरंदरास रणदुंदूभी वाजल्या. मुसेखानास आघाडीवर ठेऊन पिछाडीस फतेहखान राहिला. दोन्ही अंगांस निंबाळकर व घाटगे उभे ठाकले. सह्याद्रीचे गड चढणे म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. गड चढतानाच खानाच्या फौजेची दमछाक झाली. गडावरुन बंदुकीच्या गोळ्या, भल्यामोठ्या शिळा यांचा वर्षाव होऊ लागला. तोफा आग ओकू लागल्या. खानाच्या फौजेतील लोकांच्या देहाच्या ठिकऱ्या उडू लागल्या. कसाबसा मुसेखान आपल्या सैन्याचे मनोबल वाढवत पुढे जाण्याचा प्रयत्न करु लागला; पण आज पुरंदरावर साक्षात आपला काळंच उभा ठाकला आहे, याची त्यास खात्री पडली. तलवार, धनुष्यबाण, भाले अशी शस्त्रे घेऊन मराठे शत्रुवर तुटून पडले. हातातल्या गदेने भीमपराक्रमी कावजीने शत्रुंना आसमान दाखवले. सर्व वीरांनी पराक्रमाची शर्थ केली. रक्ताचे पाट वाहू लागले. गोदाजीने तलवारीच्या एकाच प्रहारात मुसेखानाच्या देहाच्या चिरफाकळ्या केल्या आणि फतेहखानाची सेना वाट फुटेल तिथे पळत सुटली. मराठ्यांचा जय झाला (२०-ई). शाहजीराजांचे कर्तृत्व, दादाजींची पुर्वपुण्याई, आईसाहेबांचे संस्कार, शिवरायांचे नेतृत्व सर्वांचा जय झाला. स्वतंत्रतेची पहाट उगवली.

लेखाचा शेवट करताना, शिवाजी महाराजांना समकालीन असलेल्या दोन विद्वानांच्या वर्णनांतील एक विलक्षण साम्य दाखवतो. शिवभारतकार म्हणतो, शत्रुची अशी वाताहात झाल्यावर, शिवगणांसह शंकर तेथे अवतरले, बुभुक्षित राक्षस त्याक्षणी आनंद होऊन पुष्कळ मांस मिळाल्याने तृप्त झाले. पिशाच्च रक्ताने भरलेली मुंडकी निर्भयपणे मांडीवर ठेऊन खाऊ लागली. डाकिनी, शाकीनींनी (शत्रुच्या) सैनिकांच्या मांसाने आपलीं शरीरें पुष्ट केली(२१). महाराजांना समकालीन असणारा उत्तरप्रदेशातील कवी, कविराज भुषण एका छंदात असेच काहीसे वर्णन करतो. तो म्हणतो(२२),
प्रेतिनी पिसाचरू निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरो भूत प्रेत भूरि भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जांगिनी जमाति जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिम डिम डमरू दिगंबर बजाई है ।।
सिवा पूँछै सों समाजु आजु कहां चलीं, काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ।।
[प्रेते पिशाच्चे, राक्षस,जमून आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीर धारण करणारे भैरव तसेच भूते, प्रेते यांच्या झूंडीच्या झूंडी जमू लागल्या आहेत. कालीका देवी किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करत आहे आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. ह्या सर्व शिवगणांचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले "महाराज, आज आपली मंडळी आनंदित होऊन कोठे चालली आहेत ?" त्यावर महादेव म्हणाले, "आज शिवाजी राजे कोण्या शत्रूवर क्रूध्द झाले आहेत, शिवगणांना खाद्य मिळणार त्यामूळे ते आनंदित झाले आहेत."]
हे साम्य म्हणजे तत्कालीन समाजमन कसे होते,  आपला उद्धारकर्ता म्लेंछक्षयदिक्षित ‘शिवाजीराजा’ हा अवतारी पुरुष असल्याची समकालीनांची भावना या सर्वांचे एक उत्तम उदाहरण आहे.
लेखनालंकार !

© डॉ. सागर पाध्ये

संदर्भ व तळटिपा -
१. अ. जेधे शकावली (शिवचरित्र प्रदिप - द. वि. आपटे, स. म. दिवेकर, भा. इ. सं. मं. ग्रंथमाला क्र. ४; पृ. १८)
  आ. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २०, ले. ४७ (राजवाडे खंड).
२. ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १ - संपादक, ग. ह. खरे,भा. इ. सं. मं. ग्रंथमाला.क्र. ४; ले.४८
३.श्री राजा शिवछत्रपती भाग १ - गजानन भास्कर मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन, पुणे २००८; पृ.६२९
४.ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १ - संपादक, ग. ह. खरे; ले.४८.
५.श्री राजा शिवछत्रपती भाग १ - गजानन भास्कर मेहेंदळे; पृ.६२९.
६. शक निर्माता शिवराय खंड १ - विजयराव देशमुख, (हिंदी अनुवाद - डॉ. मोहन बांडे), छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर, २०१६; पृ. क्र. २१४-२२०
७. श्री राजा शिवछत्रपती भाग २ - गजानन भास्कर मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन, पुणे २००८; पृ. ७३५-७८७ व ९३७-९४६.
८.दत्ताजी त्रिमल वाकेनिविस विरचित ९१ कलमी बखर - संपादक - वि. स. वाकसकर, १९३०; पृ. क्र. ५१-६०.
९. शिवचरित्र प्रदिप - द. वि. आपटे, स. म. दिवेकर; पृ. ४१.
१०. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे समग्र साहित्य खंड दहावा, संपादक - मु. ब. शहा, इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ; पृ.क्र. २४६,२५०
११. अ. ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १,संपादक, ग. ह. खरे; ले.४८.
  आ. श्री राजा शिवछत्रपती भाग १ - ग. भा. मेहेंदळे;
पृ. ६०९
  इ. कित्ता; पृ. ७३७
  ई. श्रीशिवभारत - संपादक, स. म. दिवेकर, भा. इ. सं. मं. पुरस्कृत ग्रंथमाला क्र. ३, प्रस्तावना पृ. १२६
  उ. शिवचरित्रनिबंधावली पृ. १३७
१२. शिवकालीनपत्रसारसंग्रह खंड ३, संपादक - शं. ना. जोशी, शिवचरित्रकार्यालय, पुणे, १९३०; ले. २५०७,२६६४,२७०२
१३. सातारा गॅझेटिअर (pdf) पृ. ३६; साभार gazetteers.maharashtra.gov.in
१४. श्री राजा शिवछत्रपती भाग १ - ग. भा. मेहेंदळे; पृ.६०६-६०८, ६१६-६१७.
१५. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १, संपादक - शं. ना. जोशी; ले. ५१०.
१६. श्री राजा शिवछत्रपती भाग १ - ग. भा. मेहेंदळे; पृ.  ६४०-६४२
[ इच्छुक व्यक्तींनी यू ट्यूबवरुन दिवंगत इतिहासकार निनाद बेडेकर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार’ हे व्याख्यानंही जरुर ऐकावे. https://youtu.be/tUm2rJFqpbY ]
१७. श्री राजा शिवछत्रपती भाग १ - ग. भा. मेहेंदळे; पृ. ६६६,तळटीप २६१.
१८. जेधे करिना (शिवचरित्रप्रदीप - संपादक, द. वि. आपटे, स. म. दिवेकर पृ. ४१).
१९. श्री राजा शिवछत्रपती भाग १ - ग. भा. मेहेंदळे; पृ. ६७८.
२०. अ. श्रीशिवभारत - संपादक, स. म. दिवेकर अ. १३, श्लो. १-५७
      आ. जेधे करिना (शिवचरित्रप्रदीप - संपादक, द. वि. आपटे, स. म. दिवेकर पृ. ४१-४२)
       इ. श्रीशिवभारत अ. १३, श्लो. ६०-१३०
       ई. श्रीशिवभारत अ. १४.
२१. श्रीशिवभारत - संपादक, स. म. दिवेकर; अ. १४,श्लो. ७७-८०
२२. शिवभूषण - संपादक, निनाद बेडेकर; स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१८; छंद क्र. ४१३.



Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा...

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय...

Chhatrapati Shivaji and his Maharashtra-dharma (The religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj)

It is a rule of Historiography, that to draw any inference about a historical figure, one must consider at least three different types of contemporary facts – first, words and deeds of that person himself or his close associates; second, views of his enemies and third, convictions of any third person or neutral authority! Now a days the religious policy of Chhatrapati Shivaji Maharaj is often debated, sometimes for political or other interests by different people, parties and institutions. However, by studying ample of available evidences in aforementioned fashion, a conclusion can easily be made. The very first thing that we should bear in our mind is that we are discussing an era of strong religious beliefs. Customs and living of people were greatly influenced by sayings of religious scriptures. For almost three hundred years before Chhatrapati Shivaji, India was ruled by Muslim invaders, majority of them proved to be fanatics. For every new territory conquered, Hindus we...