उत्तरेत वारंवार अहमदशाह अब्दालीच्या आडून मराठ्यांस शह देणाऱ्या, अब्दालीच्या धार्मिक भावनेस हात घालून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या नजीबास मराठ्यांनीच एका कागदात 'खेळ्या' असे म्हटले आहे. पानिपतावरील रणसंग्रामास जबाबदार शकूनी खरा नजीबंच ! रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या इ. स. १७५७ च्या उत्तरस्वारीतंच ही विषवल्ली खरंतर ठेचली जाणार होती; पण नजीबाने कसे डावपेच रचले पहा.
१. १७५७ मध्ये नजीबाने मल्हारराव होळकरांस मोठी रक्कम दिली असा उल्लेख आहे (झर-ए-खातिर-बतारिक-ए-रिश्वत). मल्हाररावांनी त्याबदल्यात रघुनाथराव व इमाद-उल-मुल्क याजकडे नजीबासाठी रदबदली करावी असा नजीबाचा उद्देश होता.
संदर्भ - Marathas and Panipat - Hari Ram Gupta, page no. 110
(लेखकाने तारीख-ए-मुज्जफिरी, ले. १२६ हा मुळ संदर्भ जोडला आहे)
२. नजीबाने मल्हारराव होळकरांमार्फत राघोबाशी तह करण्याविषयीची कलमे कळवली.
संदर्भ - मराठी रियासत खंड ४, गो. स. सरदेसाई; पृ. क्र. ५२४.
प्राथमिक संदर्भ - पेशवे दप्तर, खंड २, ले. ७७
३. तारीख -ए-नजीबुद्दौल्लाह या नावाने इ. स. १७७३ मध्ये सय्यद नुरुद्दीन हुसेन याने लिहिलेल्या नजीबाच्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद आहे.. एका प्रसंगी राघोबा फौज घेऊन नजीबावर हल्ला करणारंच होता, तेव्हा मल्हाररावांनी आपली फौज मध्ये आडवी घालून, "मला मारल्यावरंच आपण पुढे जाऊ शकता, मी तुम्हाला जाऊ देणार नाही" असे त्यात म्हटले आहे.
संदर्भ - An account of Najibuddaulah, english translation by Abdur Rashid, page no. 17
पुढे पानिपताच्या रणसंग्रामापुर्वी हाफीज रहमत खान या सरदारामार्फत अशी तोड ठरवली, की नजीबाचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेवून, अब्दालीस मार्गस्थ करावे. अशा आशयाचा करार पुर्वी १३ मार्च १७६० रोजी बेलभंडार गंगाजलपुर्वक झाला होता; पण भाऊसाहेब निघाल्याच्या वर्तमानाने धास्तावलेल्या नजीबाने छावणी उठवून निघालेल्या अब्दालीस गळ घालून थांबवले आणि करार तेव्हाच फसला होता. यावेळेस हा करार मल्हारराव होळकर यांनाच पसंत न पडल्याचे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे.
संदर्भ - मराठी रियासत, खंड ४, गो. स. सरदेसाई; पृ. क्र. ५७६.
प्राथमिक संदर्भ - पेशवे दप्तर, खंड २, ले. २४
© डॉ. सागर पाध्ये
संदर्भग्रंथ -
१. मराठी रियासत- गो. स. सरदेसाई
2. Marathas and Panipat - Hari Ram Gupta
3. Solstice at Panipat - Uday S Kulkarni
4. An Account of Najibuddaulah - English translation by Abdur Rashid
Comments
Post a Comment