Skip to main content

शिवचरित्र आणि आपण


 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.

  शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?

  खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्याआधी फक्त महाराष्ट्राचा विचार करायला हवा. ज्या युगपुरूषाची नोंद तत्कालिन जागतिक राजकारणात घेण्यात आली, आज भारतभर त्याची धड ओळखही नाही. आपला इतिहास आपल्यालाच माहीत नाही यापेक्षा दुसरे आपल्या कर्मदरिद्रीपणाचे कुठले लक्षण सांगणार? एकोणिसाव्या शतकात तत्कालिन मुंबईचे गव्हर्नर  माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनने काढलेले उद्गार पहा," It took us 18 centuries to establish an empire where the sun never set; If a king as valiant as Shivaji would have born on our lands,we would have accomplished this by the 13th century itself. Not just this planet ,we would have expanded our reach across the galaxy and the universe.
(जिथे कधीही सूर्यास्त होत नाही असे साम्राज्य निर्माण करण्यास आम्हाला १८ शतके लागली.शिवाजीइतका शूर राजा जर आमच्या भूमीवर जन्माला आला असता, तर आम्ही १३व्या शतकातच हे कार्य सिद्धीस नेले असते. केवळ ही पृथ्वीच नाही तर आकाशगंगा आणि त्यापुढे हे विश्वही पादाक्रांत केले असते.) बघा,परकीयांना शिवरायांची जी महती समजली होती,ती आजही आपल्याला समजली नाही.याहीपुढे जाऊन मला असं वाटतं,तो एलफिन्स्टन आम्हाला सवालंच करतोय, आमची खिल्ली उडवतोय, "छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोकोत्तर पुरुष तुमच्या देशात जन्माला येऊनही, तुम्ही कुठे काय करु शकलात ? आम्ही तुमच्या जागी असतो, तर समस्त विश्वावर राज्य केलं असतं."

उत्तरप्रदेशातील त्रिविक्रमपूर शहरातील एक कवी भूषण त्रिपाठी शिवाजी महाराजांना भेटायला आला होता. महाराजांच्या चरित्राने प्रभावित होऊन त्याने महाराजांवर सहाशेहून अधिक काव्ये रचली. ती काव्ये पाठ करुन म्हणणे हा एक आगळावेगळा आनंद आहे. मला तर तो छंदंच जडला आहे. कविराज भूषणाची प्रतिभा अगाध आहे. त्याच्या कुठल्याही काव्यांतून हे चांगले,ते वाईट असे निवडता येत नाही; पण त्याचा एक छंद मोठा विचारांस चालना देणारा आहे. केवळ चार ओळींत या कविराजाने धर्मांध यवनांच्या अत्याचाराखाली भरडून निघणाऱ्या हिंदु समाजाची परिस्थिती, हिंदु धर्मातील त्रुटी, हिंदुंची पराभूत मानसिकता आणि शिवाजी महाराजांनी या परिस्थितीत घडवलेला अमूलाग्र बदल यावर भाष्य केले आहे. तो छंद असा,
"देवल गिरावते फिरवते निसान अली ऐसे डूबे रावराने सब गये लब की ।
गौरा गनपती आप औरनको देत ताप आपनही बार सब मारि गये दब की ।
पीरा-पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रब की ।
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जित होती सिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ।।"

याचा अर्थ असा की,
(धर्मांध यवनांकडून) देवळं पाडली जात आहेत, उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यावर अलीचे झेंडे लावले जात आहेत (अशावेळी) हे सर्व राव-राणे पराभूत झाले आहेत. (पराभूत ही माणसाची मानसिकता होत असते,माणूस नव्हे !) आमचा हिंदु समाज दैववादी आहे.जे करेल ते देव करेल,असं म्हणून आम्ही निमूट बसून राहतो. नेमक्या याच बाबतीत पुढे भूषण म्हणतो, गौरी गणपती (या देवता) एरवी भक्तांनी त्यांची उपासना केली नाही, म्हणून रागावतात.आता स्वतःवर मात्र वेळ येताच दडी मारुन बसले आहेत.याच बाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरही म्हणतात, "ज्ञानेश्वरांच्यापुढे ऋद्धिसिद्धी हात जोडून उभ्या असता रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकले, पण ‘रामदेवराजा,  अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येतो आहे बघ’ म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वतःच्या तोंडून रामदेवरावास देता आली नाही!! .... .... मारहाण, जाळपोळ, धर की बाटीव, नाकारले की कर ठार अशी त्या चांडाळांनी हिंदुंवर धार्मिक छळाची नुसती आग पाखडली ! शेकडो पिती लेकरे, तरुण  कन्या, दास करून युरोप-आफ्रिकेच्या बाजारी बाजारी  भाजीसारखी विकली. मुंजी, लग्न, पजा, सारे  हिंदु संस्कार दंडनीय  ठरले. जीव घेऊन, लोकच नाहीत  तर देवही आपल्या मूर्ती भंगू नयेत म्हणून, श्रीमंगेश, शांतादुर्गा प्रभृति देवही पळाले, आणि तेही आपल्या भक्तास सुरक्षितपणे आपल्या खांदयांवर घेऊन आपल्या पायांनी नव्हे, तर भक्तांच्याच  खांदयांवर  आपल्या पालख्या लादून!" पुढे तर भूषण हिंदु समाजाच्या पराभूत मानसिकतेवर नेमकं बोट ठेवतो. तो म्हणतो, "(हिंदु जनतेला) पीर-पैगंबर यामध्येच दिगंबर दिसू लागला, साधू आणि सिद्ध पुरुषांची सिद्धी लोप पावली आणि (जिथे-तिथे) 'रब'ची चर्चा सुरु झाली." याला कारण सर्व धर्म सारखीच शिकवण देतात, ही आमची बावळट समजूत! प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे, ज्याला जे अनुसरावे असे वाटते, ते त्याने अनुसरावे आणि इतर धर्मांचा आदर करावा; पण हा आदर दोन्ही बाजूंनी असला पाहिजे. आपलं तेच चांगलं आणि दुसरा तो चूकच असा अंधविश्वास नको. दुसऱ्यांना जबरदस्तीने बदलण्याचा अट्टहासही नको. दोन भिन्न धर्मीय जोपर्यंत एकमेकांच्या जीवनात हस्तक्षेप करत नाहीत, तोपर्यंत आणि तेवढीच धर्मनिरपेक्षता अपेक्षित आहे. 'धर्मनिष्ठा' आणि 'धर्मांधता' या दोन शब्दांत जो फरक आहे, तोच फरक 'छत्रपती शिवाजी महाराज' आणि 'मोगल बादशहा औरंगजेब' या दोन व्यक्तींमध्ये आहे. एकूणच या हिंदुंच्या पराभूत मानसिकतेत अमूलाग्र बदल घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी! शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं ? आपल्या छंदाच्या शेवटच्या ओळीत भूषण म्हणतो, "काशीची कळा गेली असती, मथुरेत मशिदी झाल्या असत्या शिवाजी नसते तर सर्वांची सुनताच झाली असती !"

यवनांच्या टापांखाली तुडवल्या जाणाऱ्या जनतेला महाराज हे देवाचे अवतार आणि हिंदु धर्माचे उद्धारक असल्याचे वाटले असेल,तर त्यात बिलकूल नवल नाही. महाराजांनीही कुणाचा हा समज मोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही, उलट कवी भूषण, कविन्द्र परमानन्द अशांचा महाराजांनी गौरवच केला आहे.

धर्मनिरपेक्षता म्हणजे दुसऱ्याने केलेले अत्याचार निमूटपणे सहन करणे नव्हे. यवनांनी देशातली देवळं पाडून मशिदी बांधल्या होत्या; पण शिवाजी महाराजांनी त्या मशिदी पाडून,नीट वाचा, 'शिवाजी महाराजांनी त्या मशिदी पाडून' पुन्हा मंदिरं बांधली. (संदर्भ - शिवचरित्र साहित्य खंड ८,पृ क्र ५५-५६), परकीयांच्या धर्मांध कृत्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्त्युत्तर देणारे असे अनेक विश्वसनीय पुरावे सापडतात.)

औरंगजेबांनी सक्तीने धर्मांतरे केली, पुढे ज्यांना 'स्वेच्छेने' हिंदुत धर्मात यायचे होते, त्यांना शिवाजी महाराजांनी पुनश्च हिंदु करुन धर्मात घेतले. परकीयांनी मंदिरं पाडून मशिदी बांधल्या, महाराजांनी त्या मशिदी पाडून पुन्हा मंदिरं घडवली. मराठी भाषा अशुद्ध झाली होती, महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवून घेऊन मराठी भाषेला परकीय भाषेच्या जंजाळातून मुक्त केलं. राज्याभिषेक शक सुरु केला. आम्ही मात्र महाराजांना ग्लोबल करायचंय असल्या भाकड समजुतीपायी परकीय आणि कालबाह्य कालगणनेनुसार (पाश्चात्त्य दिनदर्शिका दोन प्रकारच्या आहेत.सध्या आपण ग्रेगेरीयन कालगणना वापरतो.१९ फेब्रुवारी १६३० ही ज्युलियन कालगणनेनुसारची तारीख आहे,जी कालबाह्य आहे.) हा त्या स्वधर्माभिमानी राजाचा पराभव नव्हे का? परकीयांची अशी वैचारिक गुलामगिरी आम्ही कुठवर करणार ? याचाही एकवार विचार करावा.


शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आपल्यासमोर दोन प्रकारचे लोक आहेत. एक, ज्यांना कसलीच कल्पना नसते, "पता नही यार क्या हो रहा है; कोई शिवाजी नाम का राजा था, उसकी पूजा है बोले; देखते है, क्या चल रहा है ।" असे अज्ञानी-अभागी लोक ! दुस-या प्रकारचे लोक म्हणजे स्वतःस कट्टर शिवभक्त म्हणवणारे, शिवाजीराजांचे नाव काढताच भरभरून बोलणारे, सत्रांदा छातीवर हात आपटणारे, इतिहासाची जाण तर यांनाही नाही; पण यांच्या भावनांना हात घालून कोणी समाजविघातक व्यक्ती यांचे नेतृत्व करत नाही, तोपर्यंत यांना भिण्याचे कारण नाही, तोपर्यंत आनंद आहे ! थोडं अजून बाहेर गेलो, तर एक तिसरी जमात मिळेल, राजांच्या नावाने राजकारण करणारी ! लोकांना एकमेकांची डोकी फोडायला लावून स्वतःचे खिसे भरणारी ! जाती-धर्माचे हीन राजकारण करणारी !

मात्र आधीच्या दोन वर्गांना खरे शिवस्वरूप दाखवले,तर या तिस-या प्रवृत्तीचे भय उरणार नाही.

  मी काही इतिहासाचा कोणी अभ्यासक नाही, अभ्यासातून उरलेल्या वेळात शिवकाळात रमतो, शिवस्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो इतकेच. गेल्या काही वर्षांत इतिहास वाचताना,बघताना,ऐकताना एक गोष्ट ध्यानी आली, शिवरायांचा इतिहास म्हणजे केवळ युद्ध आणि लढाया नव्हेत. अन्यायाविरूद्ध पेटून उठलेल्या एका क्रांतिकारी समाजमनाची ती कहाणी आहे; या क्रांतीच्या मार्गावर बाजीप्रभू देशपांडेंपासून ते छत्रपती संभाजीराजांपर्यंत अनेकांनी आत्मसमर्पण केले, या सगळ्याचा कर्ता-करविता असणा-या एका थोर पुरूषाची ही कहाणी आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाइतके किंवा फ्रेंच राज्यक्रांतीइतकेच याही लढ्याचे महत्व आहे; पण आमच्या करंट्यांना ते अजून ध्यानी आले नाही.

शिवरायांना देव मानू नका ! तुमच्या आमच्यासारख्याच सामान्य म्हणून जन्माला आलेल्या एका माणसाने असामान्य कर्तृत्व गाजवले; एकदा का या पराक्रमाभोवती दैवी अवताराची आरास केली, की त्यासमोर तो पराक्रम फिका दिसू लागतो. देवच होता ना, मग त्याने स्वराज्य निर्माण केले यात काय विशेष?? विश्वनिर्मिती करणा-या देवाला स्वराज्य निर्माण करणे अवघड नसावे. एकदा का देव बनवले,की आम्ही मंदिरात मूर्ती ठेवतो, पूजा करतो आणि विसरून जातो.

शिवरायांना समजून घेताना त्यांचे शत्रू हे शिवाजीराजांपासून अधिक बलाढ्य, शक्तीशाली हे समजून घ्यावे लागेल. अशा मोठ-मोठ्या शत्रूंना नमवण्यातंच महाराजांचे असामान्यत्व दडलेले आहे. इतिहास वाचताना एक गोष्ट लक्षात येते, औरंगजेबाइतका हुशार, मुत्सद्दी राजकारणी, मेहनती बादशहा मोगलांच्या इतिहासात दुसरा कोणी झालेला दिसत नाही. औरंगजेब आणि शिवाजी महाराज दोघेही दोन वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे नेतृत्व करतात, यांच्यापैकी अंतिम युद्धात जो जिंकला असता, त्याला आम्ही पुजले असते; पण मग त्या निर्णायक लढाईत मोगली सत्तेचा नाश का झाला आणि मराठ्यांचे स्वराज्य का वरचढ ठरले या वस्तुस्थितीच्या कारणांतच या दोन व्यक्तीपैंकी कोण योग्य आणि कोण अयोग्य ते समजते.

मराठ्यांचे हे स्वराज्य ही केवळ शिवरायांची वैयक्तिक महत्वकांक्षा नव्हती; ते स्वराज्य होते, रयतेचे राज्य होते. धर्मवेड्या औरंगजेबाकडे ही समज नव्हती. शिवरायांनी माणसं जोडून स्वराज्याचे शिलेदार घडवले; कपटी औरंगजेब स्वतःपासून माणसं तोडत राहिला आणि मोगल सत्तेच्या नाशास कारणीभूत ठरला. शिवशाहीची हीच पोच महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांमध्ये राहिली नाही आणि आपण आपले स्वराज्य गमावून बसलो.

दुर्दैवाने आजही आपल्याला शिवचरित्र समजलेले नाही.अजूनही आपण शिवचरित्र म्हणजे अफजलखानाचा वध, शायिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका यापलीकडे जाऊन बघत नाही. 'महापराक्रमी ', 'रयतेचा राजा' अशा उपाध्या आपण लावतो आणि महाराजांचे धोरणी नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी, त्यांची जिद्द्द, पहाडाएवढ्या संकंटांसमोर निर्भीडपणे सामोरा जाणारा निर्भय स्वभाव, पराभवाने खचून न जाणारी विजिगीषु वृत्ती, प्रखर राष्ट्राभिमान, कर्तव्यतत्पर स्वभाव, कर्मनिष्ठता, वैयक्तिक महत्वकांक्षा, यांपलीकडे जाऊन शिवरायांनी स्वराज्याचे खंदे आधारस्तंभ निर्माण केले आणि जपले; या सर्व गोष्टींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. साम्राज्य म्हणजे केवळ राजा आणि कारभारी नव्हेत, तर त्या साम्राज्याची प्रजाही तितकेच महत्वाचे अंग असते हे राजांनी जाणले होते. सामान्य जनता लढायला सिद्ध झाली म्हणून स्वराज्य निर्माण झाले आणि मोगली वावटळीसमोर टिकले. आज तुम्हाला-आम्हाला ती जाणीव असेल,तर भविष्यात आपल्या देशाचे सुराज्य होण्याची अपेक्षा आपण बाळगू शकतो.

उभे रहा, शिवरायांचा जयजयकार करा; पण इतिहासाकडे पाठ करू नका. जे राष्ट्र आपल्या राष्ट्रपुरूषांच्या कर्तृत्वाला विसरते, ते राष्ट्र कधीही प्रगती करू शकत नाही आणि केवळ छाती पिटण्याने व तलवारी फिरवल्याने स्वराज्याचे सुराज्यही होत नाही.

© सागर पाध्ये

संदर्भ-
शिवबावनी- संकलन,शिवप्रतिष्ठान
शिवभारत- स. म. दिवेकर
शिवचरित्रप्रदीप- स. म. दिवेकर, द. वि. आपटे
शिवचरित्रसाहित्य खंड ८
विज्ञाननिष्ठ निबंध - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

(सदर लेखाचे हक्क लेखकाकडे राखीव असून लेखकाच्या नावाशिवाय लेख अन्यत्र कुठेही प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

Comments

  1. सत्य परिस्थिती.... शिवजयंती खरा सोहळा कसा साजरा करायचा हेच समाज विसरून गेलाय की कधी कळलेच नाही यांना हे समजत नाही.
    Dj लाऊन नाचणे आणि हार चढवणे ही यांची रीत झालिये. इतिहास सुद्धा साधा माहीत नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज