Skip to main content

शिवचरित्र कोणते वाचावे ?



"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे.



१. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा !

२. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल.

३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचारू नका ! एखाद-दुसरं पुस्तक वाचून शिवचरित्र कळणारंच नाही. किमान दोन वेगवेगळ्या इतिहासकारांनी लिहिलेली शिवचरित्रं तरी वाचायला हवीत. मी त्यासाठी श्री. बाबासाहेब पुरंदरे व श्री. गजानन मेहेंदळे या दोन इतिहासकारांचे नाव सुचवतो. किमान या दोन गुरुजनांनी लिहिलेली शिवचरित्रे प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजेत असे मला वाटते. यानंतर जर समकालीन साधने वाचणार असाल तर सोन्याहून पिवळे !

४. पाच-पन्नास पानांत आटोपलेली, चर्चांचं गुऱ्हाळ फिरवून मोठाले निष्कर्ष काढल्यागत ठाम विधानं करणारी काही गल्लाभरू पुस्तकं उपलब्ध आहेत. अशा पुस्तकांपासून व ती पुस्तकं वाचून शिवचरित्रावर लंबीचौडी व्याख्यानं देणाऱ्यांपासून सुज्ञ वाचकाने व शिवप्रेमींनी लांब राहिले पाहिजे.

५. कादंबरी, नाटके, चित्रपट, मालिका यातून साधननिष्ठ इतिहास समजत नसतो. अगदी कादंबरीकाराने पुस्तकाच्या शेवटी शंभर-सव्वाशे संदर्भग्रंथांची यादी जरी दिलेली असली, तरी त्यातून त्या कादंबरीतील हरएक वाक्य सत्यंच आहे असे होत नाही ! तेव्हा नाथमाधवांचे लिखाण, श्रीमान योगी, राजेश्री, छावा, संभाजी अशा कांदबऱ्या वाचून 'आपण शिवचरित्र वाचले' अशा धुंदीत राहू नका. केवळ आणि केवळ मनोरंजन एवढाच या साहित्यकृतींचा उद्देश आहे !

शिवचरित्रावरील आधुनिक संशोधनपर ग्रंथ
१. राजा शिवछत्रपती (पुर्वाध आणि उत्तरार्ध) - बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्रविषयक उपलब्ध पुराव्यांचा वापर करून बाबासाहेबांनी अतिशय रसाळ भाषेत हे चरित्र लिहिले आहे. शिवचरित्राचे मर्म जाणून बाबासाहेबांनी ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या चरित्रात लालित्य आहे; पण ते चवीपुरतेच ! रसाळ आणि प्रवाही भाषेमुळे बऱ्याच वाचकांचा ही एक कादंबरीच आहे, असा गैरसमज होऊ शकतो; पण गेल्या काही वर्षांपासून या शिवचरित्रांच्या आवृत्त्यांमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या विधानांस कोणकोणते पुरावे आहेत, ते त्या त्या प्रकरणाच्या शेवटी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चोखंदळ वाचकांना ते सहज अभ्यासण्यासारखे झाले आहेत व अभ्यासकांसाठी हे चरित्र एक महत्वाचे साधन ठरले आहे.
समकालीन साधने वा पुरावे अभ्यासण्याआधी शिवचरित्राशी पुरेशी ओळख असली पाहिजे, ती ओळख करून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. प्रत्येकाला इतका अभ्यास करण्यासाठी वेळ देता येईलंच असे नाही, त्यांनी किमान शिवचरित्राचे मर्म जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे.


२. श्री राजा शिवछत्रपती (भाग १ व २) - गजानन मेहेंदळे
हे एक साधार व वस्तुनिष्ठ चरित्र आहे. या चरित्रात कोणत्याही प्रकारचे लालित्य लेखकाने प्रकर्षाने टाळले आहे. समजा, शिवचरित्रातील एखाद्या प्रसंगाचे पुरावे तुम्हाला हवे असतील, तर खुशाल हे पुस्तक काढून बसावे. त्या त्या प्रसंगाशी निगडीत सर्व विश्वसनीय पुरावे एका ठिकाणी मिळतील. एखादा पुरावा विश्वसनीय नसेल, तर तो का विश्वसनीय नाही; याचेही विवेचन लेखकाने केले आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. दुर्दैवाने हे शिवचरित्र अपूर्ण आहे, पण पुढील भाग येत्या काही वर्षांत प्रकाशित होतील.


३. Shivaji his life and times - Gajanan Mehendale
मेहेंदळे यांनीच लिहिलेले हे इंग्रजी शिवचरित्र असून, ते संपूर्ण (१६३० ते १६८०) आहे.

४. शककर्ते शिवराय (खंड १ व २) - विजयराव देशमुख
हे शिवचरित्र साधार, तसेच सोप्या भाषेत लिहिलेले आहे. चरित्र वाचत असताना आपण एक प्रमाणित शिवचरित्र वाचत असल्याचा वाचकाला आनंद होतोच, शिवाय चरित्राची भाषा सोपी व रोचक असल्याने वाचक मुग्ध होतो. शिवचरित्रावरील उपलब्ध सर्वच साधनांचा विजयरावांनी लिखाणात समावेश केला आहे, तिथे साधनांची विश्वसनीयता फारशी गृहीत धरली नाही, ही या शिवचरित्राची एक मर्यादा मानावी लागेल.


५. Shivaji the Great vol. 1 to 4 - Dr Balkrishna
या शिवचरित्राची पहिली आवृत्ती १९३२साली आली होती. बाळकृष्ण यांनी परकीय साधनांचा वापर करून एक विस्तृत शिवचरित्र लिहिले आहे. हे चरित्र वाचायचे असल्यास सध्या डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे उपलब्ध आहे, किंवा National digital library of India या वेबसाईटवर जुन्या आवृत्तीचे सर्व खंड पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.


६. छत्रपती शिवाजी महाराज  (पुर्वार्ध आणि उत्तरार्ध)- वा. सी. बेंद्रे
वा. सी. बेंद्रे यांनी मराठ्यांच्या इतिहासलेखनात आपले अमूल्य असे योगदान दिले आहे. फ्रॅन्कॉइस व्हॅलेंटाईन या डच गृहस्थाच्या संग्रहातील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र वा. सी. बेंद्रे यांनीच शोधले होते. गुरुवर्य बेंद्रे यांनी शिवचरित्रातील घटनांशी निगडीत उपलब्ध साधनांमधील उतारे जसेच्या तसे आपल्या चरित्रात ठिकठिकाणी दिले आहेत. विषयाशी ओळख, साधनांचा गोषवारा आणि शेवटी थोडक्यात निष्कर्ष असे या शिवचरित्रातील प्रकरणांचे साधारण स्वरूप आहे. नवखे वाचक थेट याच शिवचरित्राकडे वळल्यास हा ग्रंथ वाचणे कठीण वाटू शकते. त्यामुळे साधारण उपरोक्त एक किंवा दोन शिवचरित्रे वाचल्यावर मग या ग्रंथाकडे वळावे, असा एक सल्ला द्यावासा वाटतो.
बेंद्रे यांनी शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास - साधनचिकित्सा (प्रस्तावना खंड) या नावाने लिहिलेला एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ मात्र प्रत्येक इतिहासाच्या अभ्यासकाने वाचलाच पाहिजे.


७. क्षत्रियकुलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र - कृ. अ. केळूसकर
आधुनिक काळात लिहिलेले शिवाजी महाराजांचे सगळ्यात जुने पण साधार चरित्र म्हणता येईल. पण त्याकाळी फारसे संशोधन झालेले नसल्याने केळूसकर यांचा भर बखरींवर आहे. शिवाय या चरित्रावर आता प्रताधिकार (कॉपीराईट्स) नसल्याने काही प्रकाशकांनी यात मनाजोगते बदल करूनही हे पुस्तक छापल्याचे समजते. तेव्हा वाचकांनी पुस्तक तपासून घ्यावे किंवा जुनीच प्रत अभ्यासावी.

८. शिव-चरित्र निबंधावली 
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र कार्यालयाने' प्रकाशित केलेला ग्रंथ ! अवघ्या चारशे पानांत शिवचरित्राची साधार व सुगम मांडणी दहा दिग्गज इतिहासकारांनी केली आहे. शिवचरित्राच्या कोणत्याही अभ्यासकांना या ग्रंथाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

९. Shivaji - Setumadhavrao Pagadi
 हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे, ज्यांंना थोडक्यात शिवचरित्राचा आढावा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे.

याशिवाय काही चरित्रांची नावे सांगतो -
१०. श्री. छत्रपती आणि त्यांची प्रभावळ - सेतुमाधवराव पगडी.
११. अशी होती शिवशाही - डॉ. अ. रा. कुलकर्णी.
१२. छत्रपती शिवाजी महाराज - प्र. न. देशपांडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ.
१३. समरधुरंधर (डॉ. केदार फाळके यांच्या Shivaji's visit to Agra या पुस्तकाचा मराठी अनुवाद) - विद्याचरण पुरंदरे.
१४. Shivaji and his times - Jadunath Sarkar.
१५. The Grand Rebel - Dennis kincaid.
१६. युगप्रवर्तक शिवाजी महाराज यांचे चरित्र - वा. कृ. भावे.
१७. श्री शिवछत्रपती, संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर


याशिवाय शिवाजी महाराजांचे प्रशासन कसे होते, राज्यकारभार तसेच शिवकालीन समाजजीवन यांचा अभ्यास करायचा असेल, तर पुढील काही ग्रंथ वाचलेच पाहिजेत -
१. शिवकालीन महाराष्ट्र - डॉ. अ. रा. कुलकर्णी.
२. Administrative system of Chhatrapati Shivaji (Relevence to Modern Management) - Dr Kedar Phalke.
३. शिवकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे.
४. Administrative system of the Marathas - S. N. Sen
५. Military system of the Marathas - S. N. Sen (या दोन्ही पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे, पण तो तितकासा चांगला साधलेला नाही).
६. शिवाजीची राजनिती - भास्कर वामन भट. (शिवाजी महाराजांचा राज्यकारभार, राजकारण यांचे शुक्रनितीसारख्या प्राचीन ग्रंथाच्या चष्म्यातून केलेले अभ्यासनीय विवेचन यात पाहता येईल.)

काही इतिहासकारांनी मराठ्यांचा समग्र इतिहास लिहिला, त्यातूनही शिवचरित्रविषयक भाग अभ्यासू शकता -
१. मराठी रियासत (आठ खंड) - गो. स. सरदेसाई.
२. मराठ्यांचा इतिहास भाग १ ते ३ - अ. रा. कुलकर्णी, ग. ह. खरे.
३. A History of the Maratha People (vol. 1 to 3) - C. A. Kincaid, D. B. Parasnis
४. A History of the Mahrattas - James Grant Duff (मराठी अनुवाद - मराठ्यांची बखर, डेव्हिड कॅपोन)

शिवचरित्राशी निगडीत काही ठराविक साधनांची आता ओळख करून देत आहे.
समकालीन कागदपत्रे -
इतिहास अभ्यासाच्या सर्वात विश्वसनीय साधनांपैकी एक साधन म्हणजे ही कागदपत्रे होत. दरबारातील कामकाज, निवाडे, करार, इनामपत्रे, सनदा अशी अनेक प्रकारची कागदपत्रे अभ्यासासाठी वापरता येतात. पूर्वी आपल्या इतिहासकारांनी वणवण भटकून, पोटाला टाच मारून अशी कागदपत्रे भारतभर हिंडून मिळवली आणि प्रकाशित केली. असे काही ठराविक संग्रह इथे सांगत आहे.

१. मराठ्यांच्या इतिहासाची साधने -
हे एकूण बावीस खंड वि. का. राजवाडे यांनी प्रकाशित केले आहेत. या बावीस खंडांचे विषय पुढीलप्रमाणे -
खंड १ - पानिपत प्रकरणाचे कागद
खंड २ - पेशवाई शकावली
खंड ३ - ब्रह्मेंद्रस्वामींची पत्रे इत्यादी
खंड ४ - निरनिराळ्या शकावल्या
खंड ५ - पेशवेकालिन पत्रे
खंड ६ - नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीतील पत्रव्यवहार
खंड ७ - काळे दफ्तर
खंड ८ - बावडेकर दफ्तर
खंड ९ - प्रभात मासिकातील लेख
खंड १० - सवाई माधवरावकालीन पत्रव्यवहार
खंड ११ ‌- चासकर दफ्तर
खंड १२ - रायरीकर दफ्तर
खंड १३ आणि १४ - रायरीकर आणि खासगीवाले दफ्तरातील निवडक कागद
खंड १५ - शिवकालीन जेधे इत्यादी घराणी
खंड १६ ते १९ - शिवकालिन घराणी (इतिहाससंग्रह)
खंड २० - शिवकालीन घराणी (भा.इ.सं.मं)
खंड २१ आणि २२ - शिवकालीन घराणी (इतिहास व ऐतिहासिक)
यापैकी खंड ८,१५,१६,१७,१८,२० व २१ हे खंड शिवचरित्राशी निगडीत आहेत. पुढे प्र. न. देशपांडे यांनी हे बावीस खंड पुनर्प्रकाशित करताना 'शिवकालीन' व 'पेशवेकालीन' खंड वेगळे केले. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे -


याशिवाय काही मराठी कागदपत्रे पुढील साहित्यांत पाहता येतील -
२. शिवचरित्र साहित्य खंड (एकूण १६ खंड)
३. सनदापत्रांतील माहिती
४. श्री संप्रदायाची कागदपत्रे
५. मराठी दफ्तर खंड ३
६. पुरंदरे दफ्तर खंड ३
७. Records of Shivaji Period
८. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे - प्र. न. देशपांडे
९. शिवछत्रपतींची पत्रे खंड १ व २ - डॉ. अनुराधा कुलकर्णी (या पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांची छायाचित्रेही पाहता येतील)
१०. शिवकालीन पत्रसारसंग्रह (३ खंड) - 
शं. ना. जोशी यांनी संपादित केलेले आणि 'शिवचरित्र कार्यालया'ने प्रकाशित केलेले हे तीन खंड म्हणजे संपूर्ण कागदपत्रं नसून शिवाजी महाराजांच्या चरित्राशी निगडीत जी काही मराठी, फारसी वा युरोपिय कागदपत्रे उपलब्ध होती, त्या सर्व पत्रांचे सारांश या खंडांत छापले आहेत. सोबत मूळ पत्रे कोठे प्रकाशित झाली आहेत, त्याचे संदर्भही दिल्याने ते पडताळून पाहणेही शक्य झाले आहे.

याव्यतिरिक्त शिवाजी महाराजांशी निगडीत इतर कागदपत्रे पुढील ग्रंथांत पाहता येतील.
११. इन्शा-इ-हफ्त-अंजुमन 
या ग्रंथात मिर्झाराजा जयसिंग याचा मुन्शी उदयनराज याने तयार केलेली पत्रे सात विभागात छापली आहेत. या सर्वच पत्रांचा आजवर संपूर्ण अनुवाद झालेला नाही. मात्र काही पत्रांचे मराठी भाषांतर 'समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३ (मोगल-मराठा संघर्ष)' मध्ये केले आहे, तर काही पत्रांचे इंग्रजी भाषांतर The military despatches of a seventeenth Century Indian General या ग्रंथात जगदिश नारायण सरकार यांनी केले आहे.

१२. खुतूत-इ-शिवाजी 
शिवाजी महाराजांशी निगडीत काही फार्सी पत्रे एका अज्ञात व्यक्तीने संकलित करून ठेवली आहेत. यातले 'जिझिया' विषयीचे पत्र तर संशयित मानले जाते. या पत्रांचा मराठी अनुवाद 'समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३ (मोगल मराठा संघर्ष)' यामध्ये केलेला आहे.

१३. ऐतिहासिक फारसी साहित्य (६ खंड) - संपादक, ग. ह. खरे
विविध घराण्यांतील फारसी कागदपत्रे व औरंगजेबाच्या दरबारचे अखबार या खंडांत  मुळ फारसी पाठासह छापले आहेत.

१४. Selected documents of Shahjahn's reign आणि Selected documents of Aurangzeb's reign, Selected Waquai of the Deccan
या ग्रंथांत हैदराबाद येथील 'सेंट्रल रेकॉर्ड्स ऑफीस' येथील फार्सी कागदपत्रे छापली आहेत.


समकालीन दरबारी इतिहास 
पूर्वी राजेरजवाड्यांच्या दरबारात लेखक,कवि यांस आश्रय असे. हे लेखक आपल्या धन्याचे चरित्र लिहित. यात अर्थातंच धन्याची स्तुती आणि शत्रूची नालस्ती केली जात असे, परंतू या नोंदी समकालीन असल्याने त्यास अतिशय महत्व आहे. असे काही ग्रंथ पुढीलप्रमाणे -
१. श्रीशिवभारत (संस्कृत) 
 शिवाजी महाराजांच्या दरबारातील 'कविन्द्र परमानन्द नेवासकर' याने हे पद्यमय चरित्र लिहिले आहे. दुर्दैवाने हे चरित्र संपूर्ण उपलब्ध झालेले नाही; परंतू उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर हे चरित्र वेळोवेळी विश्वासार्ह ठरले आहे.
स. म. दिवेकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून, सध्या ते सर्वत्र उपलब्ध आहे. अलीकडे 'शिवभारत' नावाने काही व्यक्ती मुळ शिवभारत न छापता भलतेच काही छापून विकतात; असेही निदर्शनास आले आहे, तेव्हा पुस्तक पडताळणी करून घ्यावे.
(टिप - याच परमानन्दाच्या 'गोविन्द' या नातवाने आणखी एक पद्यमय चरित्र लिहिले आहे, ते 'अनुपुराण' किंवा 'परमानन्दकाव्य' म्हणून ओळखले जाते. याचा श्रीशिवभारताशी काहीही संबंध नसून, हे भाटकाव्य म्हणूनंच लिहिले आहे.)


२. आलमगीरनामा (फार्सी) 
हा औरंगजेबाच्या दरबारातील मिर्झा मुहम्मद काजिम याने लिहिलेला ग्रंथ असून, या ग्रंथातील शिवचरित्राशी निगडीत भागाचे मराठी भाषांतर 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग ३'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेले आहे.

३. मआसिर-इ-आलमगिरी (फार्सी) 
औरंगजेबाच्या दरबारात काम करणाऱ्या साकी मुस्तैदखान याने औरंगजेबाचा मुलगा बहादुरशहा याच्या कारकिर्दीत हा इतिहास लिहिला आहे. याचा इंग्रजी अनुवाद जदुनाथ सरकार यांंनी केलेला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग ३'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.

४. मुहम्मदनामा (फार्सी) 
मुल्ला जहूर इब्न जहूरी याने मुहम्मद आदिलशाहीच्या कारकिर्दीचा इतिहास (इ. स. १६५१पर्यंत) आदिलशाहाच्याच आज्ञेवरून लिहिला आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद 'शिवाजी निबंधावली भाग २' मध्ये प्रा. भवद्दयाल वर्मा यांनी केला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग १'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.

५. तारीख-इ- अली आदिलशाही (फार्सी)
दुसऱ्या अली आदिशाहाच्या कारकिर्दीचा (इ. स. १६६६पर्यंत) इतिहास त्याच्याच आज्ञेवरून नुरूल्लाह याने लिहिला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग २'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.

६. नुस्रतीकृत अलीनामा (उर्दू) 
 या उर्दू काव्यात मुहम्मद नुस्रती याने अली आदिलशाहीच्या कारकिर्दीचा इतिहास (इ. स. १६६६ पर्यंत) लिहिला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग २'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.

याशिवाय शिवकालाच्या आसपासचे वृत्तांत वा रचना सांगता येतील -
१.राधामाधवविलास (संस्कृत) 
जयराम पिंड्ये या समकालीन कविने हे काव्य लिहिले असून, काव्यात विशेषतः शाहजीराजांची माहिती आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी हे काव्य संपादित केले आहे.

२. संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्य (संस्कृत) - भारत इतिहास संशोधक मंडळाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे; परंतू तो दुर्मिळ आहे.

३. पर्णालपर्वतग्रहणाख्यान 
जयराम पिंड्ये या समकालीन कवीने शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ साली पन्हाळा जिंकल्याची हकीकत या ग्रंथात लिहिली असून, मराठी अनुवाद स. म. दिवेकर यांनी केलेला आहे. नुकताच हा ग्रंथ 'श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशना'ने पुनर्प्रकाशित केला आहे.

४. श्रीशिवराज्याभिषेककल्पतरू (संस्कृत) 
निश्चलपुरी गोसावी या मांत्रिकाने हा लहानसा ग्रंथ लिहिला आहे. त्याचा मुळ उद्देश महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकातील त्रुटी काढणे व तंत्रमार्गाचे समर्थन करणे हा होता. संस्कृत संहिता भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात (वर्ष १०, अंक १) प्रकाशित झाली असून मराठीत संक्षिप्त माहिती शांं. वि. आवळसकर यांच्या 'रायगडाची जीवनगाथा' या पुस्तकात वाचता येईल.

५. श्री प्रतापदुर्गमहात्म्य (संस्कृत)
श्री. रामचंद्र दिक्षित यांनी शिवाजी महाराजांच्या नातसुनेला शिवाजी महाराजांचा पराक्रम कथन केला. 'प्रतापदुर्गमहात्म्य' म्हणून ती कथा प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ इ. स. १७४९, म्हणजे संभाजीपुत्र छत्रपती शाहू यांच्या हयातीतच लिहून पूर्ण झाला आहे.
(संपादक - डॉ. सदाशिव शिवदे, भाषांतर - स. मो. अयाचित)

६. सभासद बखर (मराठी) 
 कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांना समकालीन होता. त्याने राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहायला घेतलेले हे शिवचरित्र इ. स. १६९७ साली लिहून पूर्ण झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या  सतरा वर्षांनी शिवचरित्र लिहून पूर्ण झाले आहे. ते 'सभासद बखर' म्हणून ओळखले जाते. त्यात कालक्रमाची काही प्रमाणात मोडतोड झालेली असली, तरी शिवचरित्रविषयक उपलब्ध बखरींपैकी ही सर्वात विश्वसनीय बखर आहे. ही बखर शं.ना. जोशी यांनी शिवाय र. वि. हेरवाडकर यांनीही संपादित केलेली उपलब्ध आहे.

७. शिवभूषण (हिंदी) 
भूषण या समकालीन कवीने शिवाजी महाराजांवर काव्ये रचली आहेत. हा ग्रंथ समकालीन असला, तरी ऐतिहासिकदृष्ट्या यास तितकेसे महत्व नाही. साहित्य व इतिहास अशा दोन्हीही विषयांची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी हा ग्रंथ निश्चितंच पर्वणी आहे. कवि भूषणाचे छंद मराठी अर्थासहीत वाचायचे असल्यास, पुढील तीन ग्रंथ वाचू शकता.
अ)शिवराज भूषण - दु. आ. तिवारी
ब) शिवभूषण - निनाद बेडेकर
क) शिवराज भूषण - डॉ. केदार फाळके

८. फुतूहात-इ-आदिलशाही (फार्सी) - फुजूनी अस्तराबादी
मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग ३'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.

९. फुतूहात-इ-आलमगिरी (फार्सी) - ईश्वरदास नागर
इंग्रजी अनुवाद जदुनाथ सरकार यांनी केला आहे. मराठी अनुवाद 'समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य खंड ३ (मोगल-मराठा संघर्ष)' मध्ये वाचता येईल.

१०. तारीखे दिल्कुशा (फार्सी) - भीमसेन सक्सेना
मराठी अनुवाद 'समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य खंड २(महाराष्ट्र आणि मराठे)' मध्ये वाचता येईल.

११. मुन्तखबुललुबाब ए महंमदशाही(फार्सी) 
औरंगजेबाच्या कारकिर्दीत मोगलांचा नोकर असलेल्या मोहम्मद हाशिम याचा मुलगा 'खाफीखान' याने हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथातील निवडक उताऱ्यांचे भाषांतर पुढील ग्रंथांत वाचता येईल -
इंग्रजी - History of India as told by its own Historians, Vol. 7 by Elliot and Dawson
मराठी - समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३ (मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध).

शकावल्या 
या प्रकारात इतिहासातील काही घटनांची तारीखवार नोंद ठेवलेली असते. शिवचरित्राशी निगडीत अशा काही शकावल्या पुढीलप्रमाणे -
१. जेधे शकावली 
शिवाजी महाराजांचे महाराजांचे एकनिष्ठ, शूर सरदार कान्होजी जेधे यांच्या घराण्यातील कागदपत्रांपैकी शकावली 'जेधे शकावली' म्हणून ओळखली जाते. हे शिवचरित्राचे एक विश्वसनीय साधन आहे. ही शकावली स्वतंत्ररित्या अ. रा. कुलकर्णी यांनी संपादित केली आहे. इंग्रजीतून Shivaji Souvenir (by G. S. Sardesai) या ग्रंथात प्रकाशित झाली आहे.
२. शिवापूर शकावली
३. सहा कलमी शकावली
४. चित्रे शकावली (मुळ फारसी , मराठी अनुवाद शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग २)
५. शिवापूरकर दप्तरातली शकावली
६. पुणे देशपांडे (होनप) शकावली
या शकावल्यांचे पाठ शिवचरित्रप्रदिप (संपादक - द. वि. आपटे, स. म. दिवेकर) व ऐतिहासिक शकावल्या (संपादक - अविनाश सोवनी) ग्रंथांत वाचता येतील


काही युरोपीय वृत्तांत, वर्णने व कागदपत्रे पुढील ग्रंथांतून वाचता येतील.
१. English records on Shivaji 
 ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रांमधून शिवाजी महाराजांशी निगडीत काढलेले सुमारे एक हजार कागदपत्रं या द्विखंडी पुस्तकात छापली आहेत.
२. पोर्तुगीज कागदपत्रे किंवा पोर्तुगीज मराठा संबंधांचा अभ्यास पुढील ग्रंथांतून करता येईल -
मराठ्यांच्या इतिहासाची साधने - पोर्तुगीज दफ्तर खंड २ आणि ३
पोर्तुगीज मराठा संबंध - पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर
३. डच कागपत्रे डाग रजिस्टर व बाळकृष्ण कृत Shivaji the Great या ग्रंथांत पाहता येतील.
४. Foreign Biographies of Shivaji 
या पुस्तकात कॉस्मो दि गार्डा, अॅबे कॅरे, पीअर् दि ऑर्लीन्स अशा समकालीन किंवा त्या काळाच्या आसपासच्या व्यक्तींनी लिहिलेली शिवचरित्रे आहेत.
५ Travels in the Mogul Empire (1656 - 1668) 
फ्रॅन्कॉइस बर्निए या फ्रेंच प्रवाशाने हा वृत्तांत लिहिला आहे.
६.Travels in India 
 जीन बॅप्टिस्टे टॅव्हरनिए या फ्रेंच  प्रवाशाने हे प्रवासवर्णन लिहिलं आहे.
७. Storia do Mogor 
निकोलाओ मनुची या इटालियन प्रवाशाने लिहिलेलं हे प्रवासवर्णन आहे.याचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे. मराठी अनुवाद 'असे होते मोगल' या शीर्षकाने ज. स. चौबळ यांनी केलेला आहे, परंतू तो संक्षिप्त असून, काही भाग गाळलेला आहे.


काही उत्तरकालीन ग्रंथ वा बखरी 
१. मासिर-अल-उमरा
२. बसातीउस्सलातिन (मराठी अनुवाद - विजापूरची आदिलशाही, नरसिंह वि. पारसनीस; संपादक - वा. सी. बेंद्रे)
३. मल्हार रामराव चिटणीसकृत शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
४. शेडगावकर भोसले घराण्यातील बखर (मराठी दफ्तर, रुमाल पहिला)
५. चित्रगुप्त बखर
६.९१ कलमी बखर
७. १०९ कलमी बखर
८. शिवदिग्विजय बखर
९. मराठी साम्राज्याची छोटी बखर



आतापर्यंत हा लेख वाचत असताना (किंवा न वाचताच येथपर्यंत पोहोचणाऱ्यांना) काही शंका पडत असतील, त्याची उत्तरे पुढीलप्रमाणे -
१. शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वच ग्रंथ वाचले पाहिजेत का ?
या प्रश्नाचे उत्तर अर्थातंच 'हो' असे आहे. शिवाय ही एक किमान यादी आहे. यापुढेही संशोधनास वाव आहे. अलीकडे दोन-चार पुस्तके वाचून स्वत:स शिवव्याख्याते, शिवलेखक, शिवश्री म्हणवणाऱ्या ठेकेदारांचे तण उगवले आहे ! या ठेकेदारांनी शिवचरित्राचा खेळ करून ठेवला आहे. वास्तविक शिवचरित्राचा अभ्यास म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे.

२. एक महाराष्ट्रीय म्हणून मला शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे, शिवचरित्राविषयी आस्था आहे; पण इतका वेळ मी देऊ शकत नाही. मग मी कोणते शिवचरित्र वाचू ?
खाली फक्त पाच पुस्तकांची नावे देत आहे. शक्य झाल्यास यातील किमान पहिली दोन पुस्तके, किंवा एकतरी पुस्तक वाचावे.
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
Shivaji his life and times - Gajanan Mehendale
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी
अशी होती शिवशाही - अ. रा. कुलकर्णी

३. उपरोक्त विविध ग्रंथ मी यापूर्वी चाळले आहेत, बऱ्याच ग्रंथांत तपशीलात कमी-अधिक तफावत दिसते. असे का ? मग सत्य काय मानायचे ?
इतिहासाच्या अभ्यासासाठी जी साधने वापरली जातात, त्यांच्या विश्वसनीयतेची एक श्रेणी असते. ती अभ्यास करून ठरवावी लागते. त्यासाठी पुढील ग्रंथ अभ्यासा -
साधनचिकित्सा (शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास) - वा. सी. बेंद्रे
श्री राजा शिवछत्रपती भाग २ - ग. भा. मेहेंदळे
समग्र राजवाडे साहित्य, प्रस्तावना खंड (राजवाडेंच्या ऐतिहासिक प्रस्तावना).
याव्यतिरिक्त बहुतांश साधने प्रकाशित करताना इतिहासकारांनी आपापल्या ग्रंथांसाठी चर्चात्मक प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्या.

४. मला ट्रेकींगची, तसेच गडकिल्ल्यांवर फिरण्याची आवड आहे, मी कोणती पुस्तके वाचू ?
उपरोक्त संशोधनपर शिवचरित्रांच्या अभ्यासासाशिवाय विशेषतः गडकोटांवर लिहिलेल्या पुस्तकांपैंकी शां. वि. आवळसकर यांचे 'रायगडची जीवनगाथा', शिवाय प्र.के.घाणेकर, महेश तेंडुलकर, शिवाजीराव एक्के, डॉ. सचिन जोशी इ. अभ्यासकांची पुस्तके उपलब्ध आहेत, ती वाचू शकता.

बहुत काय लिहिणे. मीसुद्धा आपल्याप्रमाणेच या इतिहासपंढरीच्या वाटेवरचा एक सामान्य पांथिक आहे. आमचे अगत्य कायम असू देणे ही विनंती !

धन्यवाद !

डॉ. सागर पाध्ये.

[टिप - सदर लेखासोबत जोडलेल्या इमेजमधील किंवा लेखातीलही शिवचरित्रविषयक ग्रंथांची यादी अपूर्ण आहे.  या विषयावर आजवर जितके लिखाण झाले आहे, ते सर्व एकाच लेखात समाविष्ट करणे अशक्य आहे. जे ग्रंथ माझ्या वैयक्तीक संग्रहात आहेत किंवा माझ्या वाचनात आले आहेत किंवा ज्या समकालीन साधनग्रंथांची मला माहिती मिळू शकली, अशाच ग्रंथांचा मी येथे उल्लेख केला आहे. शिवाय लेख लिहिताना 'किमान इतके ग्रंथ तरी अभ्यासले पाहिजेत' (याहून अधिक अभ्यासणार असाल, तर केव्हाही उत्तमंच) असे सांगण्याचा उद्देश होता. काही पुस्तकांमध्ये उपलब्ध पुराव्यांची मोडतोड करणे, विशिष्ट हेतू बाळगून लिखाण करणे वा संशोधनाच्या कमतरतेने त्रुटी राहणे, अशाही बाबी आहेत; तेव्हा अशा ग्रंथांचा उल्लेखंच केलेला नाही. जसा माझा अभ्यास वाढेल तशी ही यादी व माझी मतेही प्रगल्भ होत जाणार आहेत. ]

Comments

  1. खुप छान माहिती आणि योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद.आत्ता खरोखरच गरज आहे खऱ्या अभ्यासाची .

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. यातील बरीच पुस्तके सध्या उपलब्ध नाहीत
    उदा . शिवचरित्र साहित्य वृत्त संग्रह 1 ,2 ,3 शीव कालीन पत्रसारसंग्रह 1 ,2 ,3
    विजापूरची आदिलशाही , शिवदिग्विजय , चित्रगुप्त बखर

    ही पुस्तके भारत इतिहास संशोधन मंडळ पुन्हा का प्रकाशित करत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. यांपैकी शिवचरित्र साहित्य खंड आणि शिवकालीन पत्रसार संग्रह pdf स्वरूपात उपलब्ध आहे

      Delete
    2. यांपैकी शिवचरित्र साहित्य खंड आणि शिवकालीन पत्रसार संग्रह pdf स्वरूपात उपलब्ध आहे

      Delete
  4. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. हा संपूर्ण लेख आमच्या वेबसाईटवर टाकू का? www.esahity.com कृपया कळवा esahity@gmail.com

    ReplyDelete
  8. खूपच महत्वाची माहिती याद्वारे प्राप्त झाली त्या संदर्भाने धन्यवाद

    ReplyDelete
  9. खुप छान माहिती दिलीत...धन्यवाद

    ReplyDelete
  10. Sir, खुतूत ए शिवाजी हा जो ग्रंथ तुम्ही सांगितला आहे तो कुठे भेटू शकेल ?

    ReplyDelete
  11. दादा मोठे प्रश्नाचे उत्तर सोडविले, धन्यवाद, नक्कीच सगळी पुस्तक वाचण्यास सुरवात करतो🙏🏻
    🔥👑🚩👑🔥

    ReplyDelete
  12. खुप छान माहिती दिली आहे .

    ReplyDelete
  13. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत. नाहीतर अस्सल साहित्य कोणते याची चर्चा जातीवाद, ब्रिगेड, बहुजन असल्या चक्रात अडकून गोंधळ होतो. आपले सल्ले अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ वाटले. धन्यवाद...

    ReplyDelete
  14. सर मला श्री शिवदिग्विजय बखर बद्दल थोडी माहिती हवी आहे , मिळेल का ?

    ReplyDelete
  15. Thank you for this.🚩🙏

    ReplyDelete
  16. धनयवाद सर मला राजांचा बराचं ईतिहास वाचायचा आहे तो सर्वांसमोर मांडायचा आहे

    ReplyDelete
  17. अलीकडे दोन-चार पुस्तके वाचून स्वत:स शिवव्याख्याते, शिवलेखक, शिवश्री म्हणवणाऱ्या ठेकेदारांचे तण उगवले आहे ! या ठेकेदारांनी शिवचरित्राचा खेळ करून ठेवला आहे. वास्तविक शिवचरित्राचा अभ्यास म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे.
    ये पंच जरूरी था

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या