Skip to main content

औरंगजेबाचे 'अधर्मी' शासन


शीर्षकावरून या लेखाचा विषय काय आहे, हे एव्हाना लक्षात आलंच असेल. औरंगजेबाच्या धार्मिक वेडाची अनेक उदाहरणे आहेत. अखंड हिंदुस्तान इस्लामच्या झेंड्याखाली रगडावा ही औरंगजेबाची जबर महत्वकांक्षा होती. तरी औरंगजेबाचं प्रशासन मात्र 'सेक्युलर' होतं; शेती, व्यापार कसे उत्तम चालले होते असं काहींना वाटतं; पण आजवर वाचनात आलेली काहीही उदाहरणं इथे एकत्र देत आहे. ही उदाहरणं मुद्दाम शोधलेली नाहीत, सहज वाचनात आली आहेत; शोधायला गेलो तर पुष्कळ उदाहरणं सापडतील याची मला खात्री आहे !


औरंगजेबाने रसिकदास करोडी यास दिलेले एक फर्मान उपलब्ध आहे. त्यावरून आपल्या मुलुखातील शेतीचे उत्पन्न आणि परिणामी त्यापाठचा महसूल वाढावा, यासाठी औरंगजेब किती दक्ष होता, हे दिसून येते. मात्र त्यासोबत औरंगजेबाला रयतेबद्दल कणव होती का ? औरंगजेबाने शाहजहानची नाणी बदलून, 'आलमगीरी नाणी' पाडली. कर भरताना जनतेकडून नव्या नाण्यांच्या रुपातंच कर घ्यावा, जुनी नाणी असल्यास कर भरणाऱ्याकडूनच त्याचा भुर्दंड (सिक्का अबवाब/ सर्फ-ए-सिक्का) घेऊन नाणी बदलावीत असा हुकूमऔरंगजेबाने काढला होता. केवळ चौधरी, कानुगो, मुकादम, पतवारी यांच्या सांगण्यावरून आपत्तीकाळातील (पूर/दुष्काळ) कर माफ करू नयेत, स्वतः अमिन वा अमिल यांनी छाननी करावी, सध्याच्या आणि पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना करून मगंच त्याप्रमाणे कर आकारावा अशी औरंगजेबाची आज्ञा होती. (People, Taxation and Trade in Mughal India by Shireen Moosvi, Pages 175-185.)

याशिवाय औरंगजेबाने मोहम्मद हाशिम यास दिलेले एक फर्मान उपलब्ध आहे. त्यामध्ये अनुकूल परिस्थितीतही शेती न करणाऱ्या शेतकऱ्यांना धाक द्यावा, प्रसंगी बळाचा वापर करावा, अशी सूचना केलेली दिसते. एकदा कापणी झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत करावर सूट देऊ नये, अशी सुचनाही औरंगजेबाने केलेली दिसते. याशिवाय प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे प्रशासकीय व्यवस्था ही शरीयतमध्ये सांगितलेल्या इस्लामिक कायद्यांवर आधारलेली असावी, असा औरंगजेबाचा प्रयत्न असे; यावरून औरंगजेबाने महसूल आकारतानाही हिंदू आणि मुसलमान असा भेद केलेला दिसतो. उदाहरणार्थ -
१. सरकारी मालकीची जमीन शेतकऱ्यास शेतीसाठी देताना, शेतकरी मुसलमान असल्यास त्याच्याकडून 'अशर' तर मुस्लिमेतरांकडून 'खराज' हा कर घेतला जात असे. यापैकी अशर हा केवळ उत्पन्नाच्या दहा टक्के तर खराज अशरपेक्षा अधिक असे. [Mughal administration by J. Sarkar, 1935, (Farman to Muhammad Hashim), Page. 198-214.]
२. फळबागांवर कर आकारताना हिंदूंवर २०% (१/५), तर मुस्लिमांवर १६-१७% (१/६) असा कर आकारलेला दिसतो. (Agrarian system of Mughal India, Irfan Habib Page 285).
३. अशाचप्रकारे बाजारात विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंच्या किंमतीवर हिंदूंना ५% तर मुस्लिमांना २.५% कर द्यावा लागत असे. पुढे तर १६६७ साली औरंगजेबाने मुसलमान व्यापाऱ्यांवरील जकातकर पुर्णत: माफ केला होता ! (शिवकालीन महाराष्ट्र, अ. रा. कुलकर्णी, पृ. १२०)

एका इंग्रजी व्यापाऱ्याने औरंगजेबाबद्दल व्यक्त केलेले मत पाहिले म्हणजे मोगल राज्यातील व्यापाराची अवस्थाही चट्कन लक्षात येईल-
"राज्यकर्त्या मुसलमानांकडून त्यांच्या धर्मवेडामुळे बनिया व्यापारीवर्गावर असह्य जुलूम होत असतो. आपली मंदिरें भ्रष्ट होऊं नयेत, म्हणून बनिये लोक अपार लाच भरतात. त्याची चटक लागल्याने काझी व इतर अंमलदार इतके सतत व क्रूरपणाने हिंदूंचा छळ करतात की, त्या दुःखभाराने वाकून, या प्रांतातून (सुरत) पळून जाण्याचा हिंदूंनीं निश्चय केला. एका इसमाला, पाच वर्षांपूर्वीं, काझीने खाल्लेल्या टरबुजाचा एक भाग खाल्ला, या सबबीवर जबरीने मुसलमान करण्यात आलें व त्यामुळे त्या इसमाने जीव दिला !" (शिवपसासं खंड १, ले. १२७५ )
"औरंगशहाने धर्मसुधारणेच्या अंध उत्साहाने अनेक हिंदू देवालयांचा विध्वंस केला आणि पुष्कळांना मुसलमान होणे भाग पाडले असून शिवाजीने त्याच्याशी पुन्हा युद्धा सुरू केले आहे." (शिवपसासं खंड १, ले. १२८१)

मोगल आमदानीत सामान्य रयतेची स्थिती काय होती ? फ्रॅन्कोईस बर्निए नावाचा प्रवासी म्हणतो, "मोगलांच्या राज्यात सुपीक जमिन असूनही लागवड होत नाही. महसूल भरला नाही, म्हणून घरदार जप्त करून मुलांची बाजारात विक्री होते. लोक पळून जाऊन राजाच्या आश्रयाला जातात. !" (Travels in Mogul Empire by Francois Bernier, Page 205)

आणि हेच आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत पाहिलं तर ? खाफीखान हा औरंगजेबाच्याच दरबारातला माणूस ! पण आपल्या मुन्तूखुबू-ल-लुबाब-ए-महंमदशाही' या ग्रंथात तो सहज म्हणून जातो ,"शिवाजीने कायमंच आपल्या राज्यातील लोकांचा सन्मान राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली... !"

पुढे नानासाहेब पेशव्याच्या काळातलं, साधारण इ. स. १७४२-४३च्या आसपासचं एक पत्र आहे. या पत्रात म्हटले आहे, ‘मोगलाईचे कारकिर्दीस हकीमाचे वगैरे सक्तीमुळे सरकार मजकुरचे रयतेचे हाल बहुत शिकस्त झाले. रयत नादारीने कित्येक फरार जाली होती. ते प्रांत मजकुर साहेबांकडे (पेशव्यांकडे) जालीयावरी रयतेने उमेदवारी धरून कित्येक गाव आबाद झाले (रयतेस धीर मिळाल्याने नवी गावे वसली) व पुढेही आबादीची उमेद धरून आपली बेबुदी करून घ्यावयास साहेबाचे पाय पहावयास आलो.... (बाळाजी बाजीराव रोजनिशी भाग १, ले. ३२९)

धर्मांध औरंगजेबाच्या अशा 'अधर्मी' प्रशासनासमोर, मराठ्यांच्या 'स्वराज्या'चे वेगळेपण निश्चितंच जाणवते !

डॉ. सागर पाध्ये.

Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज