Skip to main content

विजयोन्मुख राजाची लक्षणे : शुक्रनितीसार, शिवभारत आणि चिटणीस बखर

इतिहासाच्या बखरी, पोवाडे, काव्ये अशी साधने पुर्णपणे त्याज्यंच मानली पाहिजेत, इतिहासात त्यांचे स्थान शून्यंच, असा एक आढ्यतेखोर परंतु अर्धवट अभ्यासावर आधारभुत मतप्रवाह दिसतो.

सहज वाचताना, तीन वेगवेगळ्या कालखंडांत लिहिलेल्या साहित्यांत हे सारख्या स्वरुपाचे मिळालेले आधार पहा..

शुक्रनीती हा ग्रंथ महाभारतकाळात लिहिला असे मानले जाते. त्यातील चौथ्या अध्यायातील एक श्लोक असा,

यो वै सुपुष्टसंभारस्तथा षड्गुणमंत्रवित ।
बह्वसंयुतो राजा योद्धुमिच्छेत् स एव हि ।।
अन्यथा दुःखमाप्नोति स्वराज्याद्भ्रश्येति च ।। २१९ ।।

इथे, ज्या राजाजवळ विपुल सामग्री आहे, जो षड्गुण संपन्न आहे व ज्याचेपाशीं शस्त्रात्रांचा भरपूर पुरवठा आहे, त्यानें युद्ध करण्याची इच्छा बाळगावी, असे म्हटले आहे. संधी (बलिष्ठ शत्रुशी स्नेह), विग्रह(युद्ध), यान (शत्रुवर स्वारी करुन नाश) , आसन(स्वरक्षण करुन शत्रुचा नाश), आश्रय (स्वबल अल्प असता, ज्याचे योगाने शक्ती प्राप्त होते असा), आणि द्वैधीभाव (आपले सैन्य अनेक ठिकाणी विभागून ठेवणे) हे ते षड्गुण होत.



आता जो शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतंच लिहिला गेला अशा समकालीन 'शिवभारत' या ग्रंथातील उल्लेख पहा,

षाड्गुणस्य प्रयोगेण तत्तन्मंत्रबलैन च ।
वशीचकार सकलं शाहः कर्णाटकमंडलम् ।।३।। ( अ.११ )

अर्थ- षड्गुणांच्या प्रयोगाने, नानाप्रकारच्या मसलती लढवून शाहजीने सर्व कर्नाटकप्रांत ताब्यात आणला.

मल्हार रामराव चिटणीसाने लिहिलेली बखर जी चिटणीस बखर म्हणून ओळखली जाते. ही बखर अगदी अलीकडे म्हणजे एकोणिसाव्या शतकात (इ. स. १८११) लिहिली गेली. इतर बहुतांश बखरींप्रमाणे याही बखरीत अनेक चुका, पाल्हाळीक वर्णने, दंतकथा, कालाक्रमात घातलेला गोंधळ दिसून येतो. मात्र त्याच बखरीतला हा एक उल्लेख -

याप्रमाणें राज्य आक्रमण करुन, त्यांचे निबंध बांधून सरकारकून, पागा, लोक, फौज, सेना, कोश, खजीना (असे) सर्वगुणसंपन्न जाले. सर्व मंत्री, कार्यकर्ते यांसहवर्तमान राज्याचे धारे करुन राज्य करणें तें षड्गुण संधी, विग्रह, यान, संस्थान, आसन, द्वैधीभाव यांस यथाकाल अनुसरुन करिते जाले.. (पृ. १२१)


प्रचलित दंतकथा जशा प्रत्येक वेळेस सत्य नसतात, तशा त्या बरेचदा असत्यंही नसतात. याशिवाय बखरीतील एखादा उल्लेख, कथा अस्सल कागदपत्रांच्या प्रमाणावर खोटी ठरत असेलही किंवा कमी महत्वाची वाटत असेल; पण असे उल्लेख म्हणजे तत्कालीन समाजमनाचा आरसांच असतात. निदान समाज ऐतिहासिक व्यक्ती-पात्रांकडे कसा पाहत होता, त्यांची जीवनपद्धती कोणत्या स्वरुपाची होती, समाजमान्यता काय होती; हे समजण्यास बखरी व लोकसाहित्यंच एक आधार असतो.

विजयोन्मुख राजा कसा असतो, याबद्दल प्राचीन काळापासून विद्वानांची धारणा काय होती, हेच या प्रस्तुत उदाहरणातून कळते !

धन्यवाद !


- © डॉ. सागर पाध्ये
संदर्भ -
शिवाजीची राजनिती - भा. वा. भट
कवीन्द्र परमानन्दकृत श्रीशिवभारत - स. म. दिवेकर
शुक्रनितीसार - जीवनानंद भट्टाचार्य
श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र (मल्हार रामराव चिटणीस विरचित ) - र. वि. हेरवाडकर


Comments

  1. बखरींकडे सदोष नजरेतून पाहण्याची वृत्तीत बदल होण्यास हा लेख उपयोगी पडेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज