Skip to main content

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४)


१२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त फौजांशी झालेल्या लढाईत तुळाजी आंग्रेंचे आरमार जळून खाक झाले. सहसा नानासाहेबांच्या कोणत्याही चरित्रकारासही यासाठी नानासाहेबांचे समर्थन करता येत नाही. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनीही यासाठी पेशव्यास पुष्कळ दोष लावला आहे; पण ही टोकाची भुमिका नानासाहेबाने घेईपर्यंत, त्यापूर्वी घडलेल्या घटनांचाही परामर्श घेणे, आवश्यक आहे असे वाटते.

हिंदुस्तानच्या किनारपट्टीवरील सागरी सत्ता व त्यांचे आपसांतील व्यवहार -

सर्वप्रथम हा काल आपण लक्षात घ्यायला हवा. इंग्रज आणि फ्रेंचांनी हिंदुस्तानी राजकारणात हळूहळू शिरकाव केला होता. ताराराणीसाहेब, पेशवे, आंग्रे, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, जंजिरेकर अशा या सत्ता कायम एकमेकांवर कुरघोडी करून आपापला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात होत्या. दुसरीकडे आंग्रेही पोर्तुगीजांना सोबत पेशव्यांना व पेशव्यांच्या पाठीराख्यांंचा सतत उच्छेद करत असत. पेशवे दफ्तर खंड ४० मधील लेखांक ८६ हे एक पत्र तुळाजी आंग्र्यांनी पोर्तुगिजांची मदत घेऊन कोकणात "भगवंतगडावर" हल्ला चढवला, असा उल्लेख आहे.


आंग्रे-पोर्तुगीज युती ही काही नव्याने अस्तित्वात आली नव्हती. १७४४च्या अखेरीस आंग्रे-पोर्तुगीज लढाई झाल्यानंतर पुढे हे दोघेही वाटाघाटीस लागले. यावेळेस आंग्र्यांकडचा एक वकील पोर्तुगीजांकडे गेला, तिथे जी बोलणी झाली,त्याचा वृत्तांत ११ फेब्रुवारी १७४५ला पोर्तुगीजांचा विजरई 'मार्केज दु कास्तेलु नोव्हु' याने पोर्तुगालला एक पत्र लिहून कळवला आहे, "....ह्या वकिलाने आपल्या धन्याचा मला गुप्त संदेश आणिला असून वसई प्रांत व मुख्यत्वे करांजाचा किल्ला मराठ्यांकडून परत घेण्याची माझी इच्छा असल्यास मला या कामी आंग्रे मदत करण्यास तयार असल्याचे त्याने कळविले आहे..." थोडक्यात पेशव्यांना बुडवण्यासाठी आंग्रे उत्तर कोकण पोर्तुगीजांच्या घशात घालायला तयार होते आणि हा कट शाहू छत्रपतींच्या हयातीतंच शिजत होता, हेही लक्षात घेतले पाहिजे. (पोर्तुगीज-मराठे संबंध, पृ. क्र. २१५). पेशव्यांचा शत्रू तो आपला मित्र, असा पवित्रा राखून तुळाजींनी पेशव्यांच्या कर्नाटकस्वारीत सावनूरच्या नबाबाशीही संधान बांधले होते. (कित्ता, पृ. क्र. २४०)

दुसरीकडे पोर्तुगीज आणि फ्रेंच याचीही युती होताना दिसत होती. ७ डिसेंबर १७४६ रोजी पेशव्याने रामचंद्रबाबास लिहिलेले पत्र छापलेले उपलब्ध आहे. त्यात पेशवे म्हणतात, "फिरंगी व फरासीस एक जहाले. फरासिसांंनी मध्रास व फुलचरी दोन बंदर अर्काटप्रांते इंग्रेजांची होती ती घेतली. मुंबईस यावयाची आवई घातली आहे..." नानासाहेबांची ही भिती अनाठायी नव्हती. इंग्रजांनीही पेशव्यांना ही भिती बोलून दाखवली आहे. (पोर्तुगीज-मराठे संबंध, पृ. क्र. २२७,२२८)

अशा परिस्थितीत जो आपल्या सोबत नाही, तो आपल्या विरुद्ध अशी सरळ परिस्थिती होती. उद्या समजा, फ्रेंच-पोर्तुगीज किंवा इंग्रज-पोर्तुगीज-आंग्रे अशी युती झाली असती, तर ते निश्चितंच परवडणारे नव्हते ! त्याशिवाय आंग्रेंच्या बंडखोरीस आवरायचे, पोर्तुगीज व फ्रेंचांशी लढा द्यायचा, तर पेशव्यांकडे किमान एकतरी आरमारी सत्ताधीश मित्र म्हणून जोडण्यावाचून गत्यंतर होते का ?

तुळाजी आंग्रेंचे व्यक्तीत्व -
तुळाजी आंग्रे अतिशय शूर होते. त्यांच्या आरमाराची जरब इतर सर्वच सत्तांना होती. पण तुळाजींचे हे शौर्य स्वराज्याच्या मात्र कामी येत नव्हते. स्वैर कारभार चालवण्याकडे त्यांचा अधिक कल होता. तुळाजींच्या मुजोरीबाबतचे उल्लेख शाहू छत्रपती, ताराराणीसाहेब, ब्रह्मेंद्रस्वामी, तुळाजींचे बंधू मानाजी, नानासाहेब पेशवे असे प्रत्येकाच्या पत्रात येतात. जसे तुळाजींचे शौर्य नाकारता येत नाही, तसा त्यांचा हा मुजोर स्वभावही नाकारता येत नाही. त्यांच्या या वागण्याची काही उदाहरणे पाहू -

१. दस्तुरखुद्द छत्रपतींच्या आदेशासही अनेकदा तुळाजी जुमानत नसत. स्वतःची मनमानी करत. अनेकदा याबाबत छत्रपतींनी सरखेल तुळाजी आंग्रे यांना समजपत्रे धाडली आहेत.
एका पत्रात शाहू महाराज म्हणतात -
....जंजिरियाचा अंमल कैसा चालेल हा विचार काहीच ध्यानात न आणता कजिया करता हे गोष्ट अपूर्व आहे. (छत्रपती थोरले शाहू महाराज यांची रोजनिशी भाग - १, लेखांक २२५)


२. १७५३ सालचे पत्र आंग्रे यांना समजावताना नानासाहेब लिहितात "स्वारी पाठवून लाकडे सागवानी तोडीता, रयतेस धास्त निर्माण जाहली आहे म्हणून कलो आले. ऐसियास तुमच्या वडिली राजश्री पंत अमात्य यांसी निष्ठेनेच वर्तणूक केली. हरएक वीसई ममताधरून स्नेहभाव चालविला त्याप्रमाणे तुम्ही घरोबा चालविल्यास उत्तम आहे " पुढे अजून एक सुंदर वाक्य आहे, ते असे "वडिलार्जित स्नेहाभिवृध केल्याने उचित आहे" ( पेशवे दप्तर ४०. ७९)


३. पोर्तुगीजांचे याविषयीचे उल्लेख अधिक धक्कादायक आहेत. ते म्हणतात, "तुळाजी हा अत्यंत असंस्कृत, क्रूर व आपल्या शब्दास न लेखणारा, तसेच नेहमी दारुच्या नशेत असणारा असा आहे.." पुढे गोव्याचा विजरई म्हणतो, " पोर्तुगीज सैन्याचा उपयोग केवळ किल्ल्याच्या रक्षणार्थ करावा असा उपदेश तुळाजीस त्याच्या आईने केला तेव्हा त्याने तिला इतका चोप दिला की ती मरणावस्थेस पोहोचली." तुळाजी आग्रेंचे शौर्य हा एक गुण पाहता, त्यांच्या या बाकी सर्व कृत्यांकडे डोळेझाक करावी का ?

४. तुळाजी आंग्रेंचे स्वतःच्या भावाशीच पटत नव्हते. पण त्यातही आपल्याच भावाचे कबिले, बायका धरण्यापर्यंत तुळाजी आंग्रेंची मजल गेली होती. याविषयी त्यांना स्वतः ब्रह्मेंद्रस्वामींनी समज दिली होती. (ब्रह्मेंद्रस्वामींची पत्रे, लेखाकं ३२५). मानाजी आंग्रें यांनीही पेशव्यांकडे तुळाजींच्या तक्रारी केलेल्या दिसतात (काव्येतिहाससंग्रह पत्रे,यादी,लेख -११३).



तुळाजी आंग्रेंची बंडखोरी -
आपली स्वैर सत्ता चालवण्याचे तुळाजींचे मनोगत काही पत्रे व घटना यांतून व्यक्त होताना दिसते.
तुळाजी आंग्रे सावकारांची जहाज पकडतात त्यावर स्वतःचा कर लावतात , सरकारचे लक्ष असतानाही स्वतःचा कर लावू नये तरीही लावतात अशाने बंदरे पडतील असे पत्र कर्त्याने म्हटले आहे . या पुढे जाऊन पत्र लिहिणारा म्हणतो की, "आंग्रे माल परत देतानाही घालमेल करतात." याच पत्रात पत्रकर्त्याने असे लिहिले आहे की ,"आपले आरमार स्वारीस जाते ,तेव्हा तुळाजी आंग्रे उपद्रव करितात." याच पत्रात पत्रलेखक पुढे म्हणतो की ,"परस्परात कर बसवायचा झाले तर जकातदार यांचे दिवाळे निघेल ,आंग्रे स्वतः हा हक्क मागतात वर म्हणतील की ,आंग्रे आणि शामल यांचा तसाच तह होता , आता स्वराज्य झाल्यावर मी माझा हक्क का सोडू? " पत्रकार पेशव्यांना हेच लिहितोय की, शामल परकीय ,आता स्वराज्य आहे ,(पेशवे दप्तर ४०. ६३) थोडक्यात स्वराज्याच्या नितीनुुुसार तुळाजी वागत नाहीत, हेच लेेखकाला सुचवायचे आहे.


शाहू महाराजांना त्यांच्या हयातीतही तुळाजी आंग्रेंनी कधीच जुमानीले नाही. डिसेंबर १७४९ मध्ये शाहू छत्रपतींचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूच्या सात महिने आधीच तुळाजी आंग्र्यांंनी स्वतंत्र होण्यासाठी केलेल्या खटपटी पाहिल्या, तर त्याविषयी वैषम्य वाटल्याशिवाय राहत नाही. मे १७४९मध्ये रुद्राजी धुळप याने गोव्यास जाऊन तुळाजीचा निरोप विजरईस कळवला, "सर्व मराठे राज्यातील होते तेवढे द्वेश करून प्रतिकूल जाहाले. आपली स्वयात असोन दावा सांगावयास लागले. याजकरिता फिरोन त्यांसीच मित्रत्व करावे तो अर्थ विचारास न ये. याजबद्दल तुम्हा लोकांपासी दोस्ती करून, सावंताने चडाई केली आहे त्यास नतिजा पोहचऊन राज्यांत नकशा करून दाखवावा...." (पोर्तुगीज-मराठे संबंध, पृ. क्र. २४३)जिथे तुळाजी आंग्रे स्वतःच मराठमंडळाची साथ सोडून पोर्तुगीजांशी संग जोडण्याचे मनोरथ बोलून दाखवतात, तिथे त्यांचे आरमार हे जवळपास स्वराज्यापासून वेगळेच झाले होते. त्यामुळे तुळाजींचे आरमार म्हणजे 'स्वराज्याचे आरमार' म्हणणे चुकीचे वाटते.

पुढे शाहू महाराजांच्या पश्चात तर तुळाजींनी पेशव्यांना त्रास देण्याच्या हेतून पुष्कळदा खोड्या काढल्या. इ.स. १७५३ मध्ये तुळाजी आंग्रे काहीएक कारण नसताना विशाळगडावर चालून गेला. केवळ प्रतिनिधी हे पेशव्यांच्या पक्षातले म्हणून! विशाळगडचा किल्लेदार लिहीतो, ‘...आंगर्‍याने मर्यादा सोडून मुलकाचा उच्छेद केला. प्रभावळी, साखरपे दोनही तोंडास शह देऊन बसला आहे.... सर्व सत्याधारि आपण होऊन प्रजेचा उच्छेद मांडला आहे. प्रतिनिधीच्या जिल्यांची खराबी केली. कोणी खावंद त्यास विचारता नाही (तो कोणासही जुमानीत नाही) ...' (पे. द. २४ -८८) थोडक्यात निव्वळ पेशव्यांच्या पक्षातील म्हणून तुळाजींनी केवळ प्रतिनिधींनाच त्रास दिला असे नव्हे, तर तेथील प्रजेचाही छळ केला असे दिसते. याबद्दल खुद्द ताराराणीसाहेबांनीच तुळाजींची कानउघाडणी केल्याचे दिसते. (पे.द. २४ -८५)

तुळाजी आंग्रेंच्या बंडखोरीस मुरड घालण्याचा प्रयत्न पेशव्यांनी शाहू छत्रपतींच्या हयातीतंच केला होता, असे दिसते. खुद्द शाहू छत्रपती यांनीही यास विरोध केल्याचा पुरावा नाही, तेव्हा त्यांचीही संमती असावी, असे दिसते. या मोहिमेस, मुडागडची मोहीम असेसुद्धा म्हणतात, प्रतिनिधी, वाडीकर सावंत, करवीर छत्रपती आणि यसाजी आंग्रे एकत्र आले होते. सुरूवातीला जरी या संयुक्त फौजांना यश मिळाले तरी पुढे तुळाजीचे पुर्ण उच्चाटन झाले नाही. शाहू राजांनीही प्रकरण जमेल तितके शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण शेवटी १७५५-५६ पर्यंत ताणले गेले. (मराठी रियासत खंड ४, पृ. १०६,१०७)

इ. स. १७५५मध्ये तुळाजींनी पोर्तुगीजांस दोन लक्ष रुपये देण्याचे कबूल करून त्यांच्या फौजेची पेशव्यांविरुद्ध मदत घेतली. तुळाजींची बंडखोरी रोखण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी रामाजी महादेव बिवलकर यांना मुखत्यारी दिली. रामाजी महादेव बिवलकर हे जवळपास तीस वर्षांपासून कोकण प्रांताचे सरसुभेदार म्हणून कामकाज पाहत होते. रामाजी महादेव, तुळाजींचा भाऊ मानाजी आणि वाडीकर सावंत, अमात्य, प्रतिनिधी, मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर व इतर काही मुत्सद्दी यांची तुळाजींविरुद्ध एकजुट झाली. त्यांनी इंग्रजांचा गव्हर्नर रिचर्ड बर्शियर याच्याशी तह केला, तो असा -
  • सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यात असावे; परंतू कारभार मात्र उभयतांच्या संमतीने व्हावा.
  • तुळाजी आंग्र्याकडून जी जहाजे काबिज करण्यात येतील ती इंग्रज-मराठ्यांनी निम्मी निम्मी वाटून घ्यावी. 
  • बाणकोट व हिम्मतगड (नंतरचा फोर्ट व्हिक्टोरीया) आणि नदीच्या दक्षिण काठावरील पाच गावे मराठ्यांनी इंग्रजांस कायमची द्यावीत.
  • पश्चिम किनार्‍यावरून आंग्र्यांनी कोणत्याही किल्ल्यास समुद्रातून मदत पोहोचवू नये असा बंदोबस्त इंग्रजांनी ठेवावा.
  • आंग्र्यांच्या किल्ल्यात जे द्रव्य, सामान, दारुगोळा, तोफा वगैरे सापडेल ते सर्व मराठ्यांस देण्यात यावे.
  • मानाजीच्या मुलुखावर उभयतांनी हल्ला केल्यास खांदेरी बेट, बंदर व कित्येक गावे(?) इंग्रज यांस द्यावीत.
  • जरुरीप्रमाणे जास्त कलमे नानासाहेबांच्या संमतीने ठरवण्यात यावीत. 
(मराठी रियासत खंड ४, पृ. क्र. ३८९)

पेशवे-इंग्रज विरुद्ध आंग्रे अशी लढाई झाल्यावर इंग्रजांनी १२ फेब्रुवारी १७५६रोजी किल्ल्यावर तोफांचा मारा केला. तेव्हा वॉटसनच्या आरमाराचा एक गोळा आंग्र्यांच्या जहाजावर पडून त्याची सर्व लढाऊ जहाजे जळून भस्मसात झाली, असे इंग्रज लिहितात. २२ जानेवारी १७५७ रोजी लिहिलेल्या एका पत्रात गोव्याच्या विजरईने पोर्तुगालच्या राजाला 'तुळाजीने आपले विजयदुर्गचे आरमार स्वतःच जाळून नष्ट केले', असे कळवले आहे. (पोर्तुगीज-मराठे संबंध पृ. २४२) विजरईच्या या विधानास दुजोरा देणारा कागद सापडत नाही, मात्र ही एकंदरीत घटना संशयास्पद ठरते. शिवाय आंग्र्यांचे आरमार जळून नष्ट होणे, हे नानासाहेब पेशव्याचे धोरण नसून, तो एक अपघातंच होता; याचीही खात्री पटते.


सर्व पुरावे पाहता, काही गोष्टी निष्कर्षस्वरुप मांडता येतील -
१. छत्रपती शाहू महाराजांच्या पश्चात पेशव्याने सर्व सरदारांना आपल्या अधिकाराखाली आणण्याचा प्रयत्न केला, म्हणून आंग्रेंनी बंड केले, अशी सरधोपट मांडणी बरेचदा केली जाते. वास्तविक, तुळाजींचा पोर्तुगीजांना १७४५ सालीच वसई तोडून देण्याचा मनोदय, शाहू छत्रपतींच्या हयातीतंच झालेल्या आंग्रेंविरुद्धच्या मोहिमा, छत्रपतींच्या मृत्यूच्या सहा महिने आधीच मराठमंडळास सोडून पोर्तुगीजांशी संबंध जोडण्याचा तुळाजींचा कावा यावरून तुळाजी स्वतःस स्वतंत्र समजू लागले होते, हे लक्षात येते.

२. तुळाजी अत्यंत शूर होते, हे सदर लेखात मी दुसऱ्यांदा नमूद करत आहे. परंतू वेळप्रसंगी स्वतःच्या आईस चोप देणारी, भावाचा कबिला अटकेत ठेवणारी व्यक्ती जर पेशव्यांना आपला शत्रू मानत असेल, तर कुठल्या थराला जाऊन पेशव्यांना विरोध करेल, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. तुळाजींमुळे 'रयतेस धास्त निर्माण होते...', 'प्रजेचा उच्छेद मांडला आहे..', सावकारांच्या आरमारास उपद्रव होणे इ. असे उल्लेख समकालीन पत्रांत दिसत असताना, पेशव्यांना तुळाजींचे पारिपत्य करणे, अतिशय गरजेचे झाले होते.

३. खुद्द छत्रपती शाहू महाराज तसेच महाराणी ताराबाई यांनीसुद्धा तुळाजींची कानउघाडणी केल्याची उदाहरणे आहेत.

४. वारंवार परकीय सत्ता आपल्याविरोधात एकवटत असताना, पेशव्यांनीही आपले मित्र जोडणे भाग होते. तथापि 'स्वराज्याचे आरमार नष्ट करावे', असे पेशव्यांचे मनोगत कुठेही व्यक्त झालेले दिसत नाही; पण "... कित्येक फितवे अंग्रेज लोकास बोटे घालावयास जागा होणार ऐसे चित्तात येते" असे म्हणणाऱ्या पेशव्यास इंग्रजांची धुर्तता अशाप्रसंगी ध्यानी येऊ नये, याचे वैषम्य वाटते.

५. तुळाजींना कैद केल्यावर पेशव्यांनी तुळाजींच्याच सेवेतील रुद्राजी धुळप यांच्याकडे आरमाराची जबाबदारी सोपवली. तेव्हा पेशव्यांनी आरमार नष्ट केले, या आरोपासही अर्थ उरत नाही.

६. इंग्रजांना सोबत घेण्यामागची नानासाहेबांची अपरिहार्यता स्पष्ट केली आहे. खरेतर नानासाहेबांचे पिता बाजीराव पेशवे यांनीही यापूर्वी इंचबर्ड या इंग्रजी वकिलाशी अशाच प्रकारची बोलणी केली होती; पण नानासाहेबांंवर टीका करताना पुढे 'दिडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले' हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर असतो. प्रत्यक्षात गोष्ट अशी, की आंग्रे किंवा कोल्हापुरकरही पोर्तुगीजांना सोबत घेऊन त्यांना वसई देण्यास तयार होते. अशावेळी जर पोर्तुगीजांचे राज्य आपल्यावर आले असते, तर तितकाच दोष त्यांच्यावरंही लागला असता. खरी बाब अशी, की या तिघांसही हे भविष्य कळले नव्हते !

कारणे काहीही असली, तर या एकूण भांडणात इंग्रजांचा मात्र फायदा झाला, हे सत्य नाकारता येत नाही. मात्र निव्वळ पेशव्यांची जात पाहून, त्यांच्यावर 'या पेशव्याने शिवछत्रपतींनी उभे केलेले आरमार बुडवले' असा आरोप करण्यात येतो, जो पूर्णतः एकांगी ठरतो.

एकूण हिंदुस्तानचा इतिहास पाहता, पाश्चात्य व्यापारी एतद्देशीय सत्तांच्या सेवेत असत, हे स्पष्ट दिसतं. या पाश्चात्यांचा आपसांतील लढाईत उपयोग करून घेणं, हीसुद्धा काही नवीन गोष्ट नव्हती. पूर्वीपासून मराठ्यांनी जंजिरेकरांविरुद्ध इंग्रजांची, नानासाहेबाने आंग्रेंविरुद्द इंग्रजांची, राघोबाने नाना फडणविसाविरुद्ध इंग्रजांची, नागपूरकर भोसल्यांनी पेशव्यांविरुद्ध इंग्रजांची किंवा अगदी निजाम, टिपू आदिंनी फ्रेंचांची मदत घेतल्याचे दिसते. अशी मदत घेत असताना बाहेरुन आलेले पाश्चात्य त्यांस परके वाटत नाहीत, फार काय नानासाहेब वा आंग्रे या दोघांसही इंग्रज वा पोर्तुगीज जवळचे वाटतात. 'मराठे राज्यातील होते तेवढे द्वेश करून प्रतिकूल जाहाले' ही तुळाजींच्याच पत्रातील वाक्य आहेत. हीच मराठेशाहीतील शोकांतिका आहे !

डॉ. सागर पाध्ये.

संदर्भग्रंथांची यादी -
१. मराठी रियासत खंड ४ - गो. स. सरदेसाई, २०१२.
२. पोर्तुगीज - मराठे संबंध - पांडुरंग पिसुर्लेकर, १९६७.
३. मराठे - इंग्रज संबंध - न. चि. केळकर, २००९.
४. नानासाहेब पेशवे चरित्र - गो. स. सरदेसाई, १९२६.
५. पेशवे दफ्तर खंड २४, ४० - संपादक, गो. स. सरदेसाई.
६. ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र - रावबहादूर द. ब. पारसनीस.

Comments

  1. सर्व ठीक आहे पण या प्रकरणी मराठी राज्यकर्त्यांचा दुरदृष्टीकोण कुठेतरी कमी पडत होता हे मात्र नक्की..

    ReplyDelete
  2. तुमचा इतिहासाबद्दलचा अभ्यास खूप उत्तम आहे. आणि तो असाच कायम राहावा.ह्यातून आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी वाचायला आणि शिकायला मिळतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या