Skip to main content

शंभूरायांचा रायगड


सह्याद्रीच्या भाळीचा साज म्हणजे रायगड...दुर्गदुर्गेश्वर रायगड ! रायरीच्या डोंगरावरील या किल्ल्याचा इतिहास थेट बाराव्या शतकापर्यंत पाठीमागे जातो. तेव्हापासून इंग्रजी राजवटीपर्यंत अनेक कर्तृत्ववान राज्यकर्त्यांनी रायगडावर आपली सत्ता गाजवली ; पण आपल्याला ‘रायगड’ हे नाव उच्चारले,म्हणजे आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड..शिवरायांचा रायगड ! शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावर छत्रपतीपद भुषविले शंभूरायांनी, मात्र दुर्दैव महाराष्ट्राचे, शंभुराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील दफ्तरखाना भस्मसात झाला आणि शिवशंभूछत्रपती व रायगड याविषयीची अत्यंत त्रोटक माहिती आपल्याकडे उपलब्ध राहिली. आज रायगडावर हिंडताना संभाजीराजांसंबंधी काही स्मरण होईल असं काहीही नाही, असं आदरणीय प्र.के. घाणेकर गुरुजी ‘छत्रपती संभाजी स्मारक-ग्रंथात’ खेदाने नमूद करतात (पृ. ३४९). तरीही आपल्याकडील उपलब्ध साधनांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..शंभूरायांचा रायगड !

  १७ अॉगस्ट १६६६, औरंगजेबासारख्या कावेबाज कोल्ह्याच्या जाळ्यातून सह्याद्रीचा सिंह आपल्या पुत्रासह अगदी अलगद सुटून बाहेर आला. मिर्झाराजा जयसिंगाच्या स्वारीतून धडा घेत आणि जंजिऱ्याच्या सिद्दीलाही धाक बसावा म्हणून शिवछत्रपतींनी अतिदुर्गम रायगडाची आपल्या राज्याची राजधानी म्हणून निवड केली. जुलै १६६७ ते डिसेंबर १६६७ याकाळात शिवछत्रपती आणि पोर्तुगीजांचा जो तह झाला होता,तो रायगडावरतीच ! (रा.जी. पृ.  २७) संभाजीराजांविषयी रायगडावरील पहिली नोंद सापडते,ती इंग्रजी वकील टॉमस निकल्स याला भेटल्याची (२४ मे १६७३). मुंबईकर इंग्रजांनी वाटाघाटी करण्यासाठी टॉमस निकल्स या इंग्रजी अधिकाऱ्याला पाठवले.शिवाजी महाराज त्यावेळी स्वत: रायगडावर उपस्थित नव्हते. निकल्सने संभाजीराजांच्या भेटीची परवानगी मागितली, त्यानुसार त्याला तशी परवानगी मिळाली आणि संभाजीराजांनी निकल्सला भेटीस बोलावले. रायगडावर झालेल्या या भेटीत संभाजीराजांनी टॉमस निकल्सचे संपुर्ण बोलणे ऐकून घेतले आणि ‘आता मी यावर काही बोलू शकत नाही, तुम्ही आल्याचे मी महाराजांना कळवतो, म्हणजे ते लवकर येतील. मात्र तुम्हाला इथे गडावरची हवा मानवणार नाही,तेव्हा तुम्ही खालीच थांबा.’ असे सांगून निकल्सला परतीच्या वाटेला लावले. ( E.R.S. Vol.1- 358). या भेटीसमयी संभाजीराजांचे वय होते सोळा वर्षे. ही भेट रायगडावर नक्की कुठे झाली,याची काहीच नोंद नाही. तत्पुर्वी ‘रायगडावर डोंगरमाथ्यावर बरीच साधारण बांधकामाची घरे असून सर्वात उंचावर शिवाजीचा चौसोपी (quadrangular) वाडा असून त्याच्या मधोमध एका भव्य सदनातून शिवाजी कारभार बघतो’, असे निकल्सने वर्णन केले आहे.

शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस (६ जून १६७४) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.याच सुमारास संभाजीराजांस युवराज्याभिषेक झाला.राज्याभिषेकप्रसंगी रायगडावर उपस्थित असलेला हेन्री ऑक्सेंडन ‘शिवाजी महाराज सिंहासनारुढ झाल्यावर संभाजीराजेही सिंहासनाखालील पायरीवर मोरोपंत पेशवे आणि एका श्रेष्ठ ब्राह्मणासमवेत बसले होते’, असे म्हणतो (राय.द.-दु.पु. पृ. ५४३). यानंतर लवकरंच माघ वद्य पंचमीस संभाजीराजांची मुंज करण्यात आली (४ फेब्रुवारी १६७५) (शिव.प्र. २७).

याच काळात (इ. स. १६७४-७५) संभाजीराजांनी ‘बुधभूषणम’ हा ग्रंथ लिहावयास प्रारंभ केला असावा. प्रस्तुत ग्रंथात पुढील दोन श्लोकांमध्ये रायगडाचा उल्लेख येतो.
आकर्णाटकदेशतो गिरिवरे सह्येपसह्ये परै-
दुर्गाणि क्षितिपालनाय नृपतेर्यो बागलाणावधि
आकृष्णातटमासमुद्रमभितः कृत्वा कृती दुर्गमे
दुर्गे रायरिसंज्ञके विजयते भूमीभृतामग्रणी ।। (अ.१-११)
[ कर्नाटकापासून ते सह्याद्रीपर्यंत डोंगरांवर नृपतिने (राजांनी) भूमीचे पालन करण्यासाठी बागलाणासारखे (कैक) किल्ले; बांधले (तद्वतच) कृष्णा नदीच्या तटापासून ते सागरावरही किल्ले (दुर्ग) बांधून (इतरांना अशक्य अशी) दुर्गम कृति केली, (परंतु त्यांतही) "रायरी" (रायगड) ही संज्ञा असलेली भूमि ही भुताग्रणी (समस्त मनुष्यांत श्रेष्ठ) ची भूमी सर्वांत शोभून दिसते ]

आणि

सोयं यस्य गडो नरेन्द्रवहितैः प्रासादहर्म्येरट्टै (?)
म्यरापपा (रम्येरापणा ? ) चत्वरैश्व परितः पुर्णेः सरोभिर्नवैः
विद्वद्वैदिकवैद्यवर्यगणकैराद्यैश्वः सन्मन्त्रिभिः
सैन्येश्वापि चतुर्विधेरगणितैर्भाति प्रतापान्वितैः ।। (अ.१- १४)
[ अशा या गडावर, नरेन्द्राने ( शिवाजी महाराजांनी ) बांधलेला रम्य प्रासाद, वाडा, बाजारपेठेतील चौकाने, काठोकाठ भरलेल्या नवजलाचे सरोवर शोभून दिसत आहे.
विद्वान, वैदिक, वैद्यमंडळी, उत्तम गणिती इ. तसेच चांगले मंत्री, व चतुरंग सैन्यासह प्रतापी राजाने तेथे निवास केला. ]

  युवराज संभाजीराजे रायगडावर सदरेवर बसून कारभार करत. सल्लामसलत करणे, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे,न्यायनिवाडे करणे अशी कामे युवराजास करता येतात,असा संकेत होता. अशा काही निवाड्यांची उदाहरणेही सापडतात (ज.सं. पृ.३४ ; उदाहरणादाखल पत्रांसाठी छ. सं. प. पत्र क्र. १ ते ४).

  शिवाजी महाराजांनी स्वतः कर्नाटक मोहिमेवर निघताना संभाजीराजांना प्रभावलीचा कारभार सांगून शृंगारपुरास धाडले (ऑक्टोबर १६७६). चैत्र शुद्ध पौर्णिमा,शा.शके १६०२ (३ एप्रिल १६८०) रोजी शिवछत्रपतींचा रायगडावर असतानाच मृत्यू झाला. शिवरायांच्या मृत्यूपश्चात ३ जून १६८० रोजी संभाजीराजे रायगडावर परत आले. ऑक्टोबर १६७६ ते जून १६८० अशी पावणेचार वर्ष संभाजीराजांचे वास्तव्य रायगडाबाहेरच होते. आपल्या वडिलांच्या अस्थींचे संभाजीराजांनी दर्शन घेतले. शिवरायांचे श्राद्धविधी उरकले; संभाजीराजांऐवजी छत्रपतीपद राजाराम महाराजांच्या हाती द्यावे, अशा विरोधी मताच्या पक्षाला शह देत, रायगडाचा सर्व कारभार संभाजीराजांनी स्वहाती घेतला. २० जुलै १६८० रोजी संभाजीमहाराजांचे रायगडावर मंचकारोहण झाले. याच वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात संभाजीराजांनी स्वतः तपासणी करत रायगडावरील सर्व संपत्तीची मोजदाद केली. जदुनाथ सरकार यांच्या House of Shivaji या पुस्तकात पृ. क्र १८७ ते १९४ वर सोने-चांदी, होन, इतर धातू, शस्त्रास्रे, जनावरे, शिधासामुग्री, मसाल्याचे व इतर सुगंधी पदार्थ अशी या संपत्तीची संपुर्ण यादी दिली आहे. विस्तारभयास्तव ती इथे देणे शक्य नाही; परंतू शिव-शंभूराजांच्या कारकिर्दीत रायगडावर साक्षात देवी लक्ष्मी नांदत होती हे नक्की ! या सुमारासच शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या कान्होजी जेधे यांच्या घराण्यातील ‘जेधे शकावली’त एक गंमतीदार नोंद आहे, ‘शके १६०२ रौद्र संवछरे श्रावण वर्दी २ दाभोळेस मोत्याची व्रुस्टि जाली श्रावण वद्य ५ रायगडास आणून राज्यानी (संभाजीराजांनी) पाहिलीं.’ ही घटना ऑगस्ट १६८०च्या पहिल्या आठवड्यात घडली आहे. ( खरे जंत्रीनुसार श्रावण वद्य पंचमी ही क्षयतिथी आहे ).

  शा.शके १६०२, माघ शुद्ध सप्तमीस अर्थात रथसप्तमीच्या मुहूर्तावर १४ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांचा विधीवत राज्याभिषेक झाला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. हा सोहळा १४,१५, व १६जानेवारी असा तीन दिवस रायगडावर चालला होता. या सोहळ्याचे वर्णन ‘परमानंदकाव्यम्’ या समकालीन संस्कृत ग्रंथात आले आहे.

आधीपासून मंत्रिमंडळाशी उडणारे खटके, एकमेकांबद्दलची कलुषित मनं यामुळे निमित्त होऊन संभाजीराजांनी काही जणांना मृत्यूदंड देऊन आपला वचक बसवला व एकछत्री अंमल प्रस्थापित केला. राज्याभिषेक होताच संभाजीराजे भराभर तयारीला लागले. बु-हाणपूर शहर म्हणजे मोगली सत्तेच्या अंगाखांद्यावर रूळणारा लखलखता दागिना ! एखाद्या सौंदर्यवतीच्या गालावरील तीळ शोभावा तसे मोगलांच्या राज्यात बुऱ्हाणपूर खुलून दिसते, असे त्या शहराचे वर्णन केले जाई. असे हे बुऱ्हाणपूर शहर लुटण्याचा डाव रायगडावर आखण्यात आला; मोहिमेचे नेतृत्व सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या हाती देऊन,त्यांना रवाना करण्यात आले. शंभूराजांनी या संपूर्ण शहराची राखरांगोळी करून मोगलांच्या वर्मावरच घाव घातला. खुद्द औरंगजेबाच्या नावाने वसवलेले औरंगाबाद शहर, संभाजीराजांनी जाळून,लुटून फस्त केले.वऱ्हाड, खानदेश, सोलापूर,अहमदनगर, पेडगाव या मोगली मुलखात सैन्य पाठवून लुटालूट केली (३० जानेवारी १६८१). जंजिऱ्याचे सिद्दी थोरल्या महाराजांच्या काळापासून स्वराज्याला उपद्रव देत होते; पण त्यांचा संपूर्ण बंदोबस्त कधीही होऊ शकला नाही. या सिद्दीचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी संभाजीराजांनी चार हजाराचे सैन्य रायगडावर जमा केले आणि नागोठाण्याच्या बंदरात २२ गलबते आरमारी स्वारीसाठी सिद्ध केली (रा.जी. पृ. ८९). जंजिरा मोहिम सुरू असतानाच कल्याण-भिवंडीत हसनअलीखान ससैन्य उतरल्याने स्वतः संभाजीराजांना जंजिरा सोडून तेथे दौड करावी लागली, परंतू संभाजीराजांची तडफ आणि आवेश पाहून सिद्दीला मात्र चांगलीच जरब बसली. पोर्तुगीजांवरील स्वारीत कुशल सेनानी म्हणून संभाजी राजांच्या शक्तीचा आणि आक्रमकतेचा प्रत्यय येतो. पोर्तुगीजांचे सामान्य प्रजेवर वाढते अत्याचार, जबरदस्तीने केली जाणारी धर्मांतरं आणि पोर्तुगीजांची मोगलांशी हातमिळवणी या सर्व गोष्टींमुळे संभाजीराजांनी ही पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला ( ८ ऑगस्ट १६८३ ). चौलच्या वेढ्याला प्रतिउत्तर म्हणून आणि संभाजीराजांचे लक्ष चौलवरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला,त्यास मराठ्यांनी जशास तसे उत्तर दिले.पुढे थेट गोव्यापर्यंत धडक मारून मराठ्यांनी पोर्तुगीजांचे प्राण कंठाशी आणले. मांडवी नदीतून मचव्यातून पळून जाणाऱ्या विजरईच्या पाठी संभाजीराजे जीवाची पर्वा न करता बेधडकपणे नदीत घुसले. कसाबसा सुटलेला बिचारा विजरई सेंट झेविअरचे शव बाहेर काढून त्याची करूणा भाकत बसला ( २४ नोव्हेंबर १६८३) (P. M. R. Pg 77-121 ). औरंगजेब आज नाहीतर उद्या महाराष्ट्रात उतरणार हे जाणून शिवप्रभुंनी आपल्या हयातीच्या अखेरीसंच दक्षिणेच्या राजकारणास प्रारंभ केला होता. शंभूराजांनीही यथावकाश रायगडावरुनंच दक्षिणेचे राजकारण आखले. गरज निर्माण झाली,तेव्हा ते स्वतःच दक्षिणेत उतरले ( इ. स. १६८२ ).

मोगलांनीही संभाजीराजांच्या हयातीत रायगडावर दोन वेळा हल्ले केले आहेत. दोन्ही वेळेस राजधानीच्या पायथ्यापर्यंत आलेल्या मोगलांना मराठ्यांनी परतवून लावले. इ.स. १६८३ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शहाबुद्दीनखान पुण्यास आला होता.डिसेंबर महिन्यात देवघाटाच्या मार्गाने उतरुन त्याने रायगडच्या पायथ्याशी लुटालूट आणि जाळपोळ केली. या कामाबद्दल शहाबुद्दीनला 'गाझीउद्दीन बहाद्दूर' हा किताब मिळाला. पुन्हा एकदा १६८४ च्या अखेरीस हा शहाबुद्दीनखान बोरघाटमार्गे रायगडाजवळ आला. याबाबतीत ‘जेधे शकावलीत’ नोंद मिळते ती अशी, ‘शके १६०६ पौश व ४ शाबुदीखान पुण्याहून आला दवड करोन बोरघाटें उतरोन गांगोलीस आला.कवी कलशें भांडण दिल्हें. फिरोन घाटावर घातला.’ आधीच्या हल्ल्याबद्दलही शकावलीतून त्रोटक माहिती मिळते. अन्यथा या हल्ल्यांबद्दल मोगल दरबारातील एकतर्फी अखबारांशिवाय अन्य माहितीचा स्त्रोत नाही (शि. सं. २७३-२७४ ).

संभाजीराजे आणि कवी कलश यांनी रायगडावरुन काही न्यायनिवडे केल्याचीही उदाहरणे आहेत (छ. सं. प. पत्र क्र.९,११,१९,२१,२३,४४,४६,४७,५०,५८,६० ). राज्यात अस्थिरता असतानाही सामाजिक व धार्मिक बाबींत कटाक्षाने लक्ष घालत होते. प्रजापालनात ते दक्ष होते ( छ.सं.प. पत्र क्र. ६४,११३ ते १७१ ).

संभाजीराजांच्या काळात रायगडावरील व्यवस्था कशी होती,याबाबतची माहिती आवळसकरांच्या रायगडची जीवनगाथा मध्ये आलेले आहेत.  १.राजगृहीची कामे रघुनाथभट पंडितराय नवहस्त हे दिवाकर गोसावी यांच्या वतीने करत असत. २.इ.स. १६८० ते १६८९ याकाळात राघो स्वानंद बापोजी दिवाकर चिमणगांवकर हे रायगडावर दप्तरदार म्हणून काम करत असत. ३.रायगडावरील इमारतींची डागडुजी करणारा व व्यवस्था करणारा अधिकारी म्हणून हिरोजी इंदुलकर ‘सुभेदार इमारती किल्ले रायगड’ म्हणून काम पहात असे. त्यावर संशय आला म्हणून संभाजीराजांनी त्याला कैद करुन कागदपत्रांची झडती घेतली म्हणूनही उल्लेख आहे. ४.बहिरजी नाईक घाटगे नावाचा माणूस हा रत्नशाळेतील अधिकारी होता. (रा. जी. पृ. ८७-८८). संभाजीराजांच्या आऊसाहेब सकलसौभाग्यसंपन्न सईबाईसाहेब संभाजीराजांच्या जन्मापासूनंच आजारी होत्या. त्यावेळस संभाजीराजांना दुध पाजण्यासाठी दुधआई नेमली होती, तिचं नाव धाराई ! या धाराईस वार्षिक २६ होनांची तैनात लावून दिली; धाराईच्या दोन पुत्रांपैकी एकजण पन्हाळ्यास सरनोबतांची चाकरी करत असे,तर धाकटा भाऊ रायाजी नाईक रायगडास ‘सुहेकेची’ (सेवेळा माची) नायकी करत असे, अशी गाडे करीन्यात नोंद आहे (ज्व. सं. पृ. ४७० ).

इ.स १६८८ पासून मात्र संभाजीराजांनी रायगडावर राहणे सोडले आणि ते पन्हाळा व विशाळगड यांदरम्यान राहू लागले. ( रा. जी. पृ.९१ ) फेब्रुवारी १६८९ मध्ये विशाळगडावरुन आंबाघाटमार्गे रायगडावर जात असताना संभाजीराजे संगमेश्वरास मुक्कामास थांबले. तेथेच पकडले जाऊन त्यांस औरंगजेबसमोर पेश करण्यात आले. फाल्गुन वद्य अमावस्येच्या दिवशी औरंगजेबाने शंभूराजांची क्रुर हत्या केली (११ मार्च १६८९) आणि ही अमावस्या मृत्युंजय अमावस्या ठरली.

संभाजीराजे हे रायगडावरुन राज्य करणारे स्वराज्याचे दुसरे आणि दुर्दैवाने शेवटचेच छत्रपती ठरले. आज रायगडावर गेल्यावर संभाजीराजांच्या पाऊलखुणा कुठे कुठे शोधाव्यात ? विस्तीर्ण रायगडाच्या अंगाखांद्यावर शंभूरायांचा साक्षात्कार कुठे कुठे व्हावा ..? कधी प्रयत्न करुन पहा तर खरं, रायगडाच्या रोमारोमांत तुम्हाला शिवरायांसोबतंच ठायीठायी शंभूरायही दिसू लागतील. महादरवाजाच्या उंबरठ्याकडे पहा, तो कित्येकदा संभाजीराजांनी ओलांडला असेल; सिंहासनाची जागा पहा,तेथल्याच पायरीवर स्वराज्याचे पहिले युवराज मुजरे स्विकारत होते; त्या तिथेच स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीवर छत्रचामरे ढळली होती; होळीच्या माळावर रायगडनगराच्या प्रमुख चौकात पुर्वाभिमुख असलेला तो विशाल चौथरा ,तो शिर्काई मंदिराचा पाया. त्याला अलीकडे ‘शिर्काईचा घरटा’ म्हणतात.त्या मंदिरात युवराज शिर्काई दर्शनास येत असत. शंभूपत्नी येसूबाईंनी याच शिर्काई देवीला नवस केला आणि शंभूराजांना ‘भवानीबाई’ नामे कन्यारत्न प्राप्त झाले. ( किल्ले रा. स्थ. पृ.८३ ). रायगडाच्या पालखी दरवाजातून आत येऊन,मेणा दरवाज्याकडे जाऊ लागलो, की उजव्या हाताला सहा वास्तूंचं संकुल आहे,आज याचीच ओळख राणीवसा अशी करुन दिली जाते. वास्तविक हा राणीवसा नसून भांडारगृहे असावीत असं आदरणीय प्र. के. घाणेकर म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार राजकुटूंबाचा निवास शिवसिंहासनाच्या मागील बाजूस जे तटबंदीयुक्त ३-४ समांतर जोती असणारं आवार आहे, तिथे असावा (दुर्ग. रा. पृ. १०१-१०२ )वास्तुशास्त्रानुसार बालेकिल्ला अथवा राजवाड्यातील पश्चिमेकडील नैऋत्य कोपऱ्यास कर्त्या पुरुषाचे निवासस्थान असावे ( किल्ले रा. स्थ. पृ. १६४). असे असेल, तर संभाजीराजांचाही तिथे निवास झाला असला पाहिजे.  आदरणीय श्री. आप्पा परब यांनी आपल्या ‘किल्ले रायगड स्थळदर्शन’ या पुस्तकात ‘युवराज निवासा’बद्दलही लिहिले आहे.तो भाग इथे जसाच्या तसा उद्धृत करत आहे; ‘वास्तुशास्त्रानुसार शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र युवराज शंभाजीराजे त्याच महालाच्या दक्षिण दालनांत राहात होते. हे सांप्रतच्या भूगोलानें सिद्ध केले आहे. त्या महालाकडे पूर्वेकडून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दक्षिणेकडे आजही एका विभाजक भिंतीचे अवशेष आहेत. तसेंच दक्षिण दालनास स्वतंत्र पायऱ्या आहेत.’ ( पृ. क्र. १६५ ). या विधानास अन्य काही प्राथमिक पुरावा आप्पांनी दिलेला नाही; हा त्यांचा अभ्यासाअंती आलेला तर्कंच म्हणावा लागेल. अशाचप्रकारे आप्पांच्या तर्कानुसार राज्ञीमहाल व दासी निवासामधून जो दक्षिणोत्तर उपवनमार्ग जातो, त्याच्या सुरुवातीस असलेला महाल हा युवराज्ञी येसूबाईंचा महाल असल्याचे म्हटले आहे. ( किल्ले रा. स्थ. पृ. १७१ ). या सर्व विधानांवर दुर्गप्रेमींनी अधिक विचार व अभ्यास करुन ठाम निष्कर्ष काढले पाहिजेत.  रायगडावरील हुजूरबाजार म्हणून जी वास्तू दाखवली जाते;ती बाजाराची जागा नसावी,असे काही अभ्यासकांचे अभ्यासांती मत आहे. संभाजीराजांच्या ‘बुधभूषणम्’ मध्येही रायगडावर बाजार असल्याचा उल्लेख येतो. ( बुधभूषणम् मधील उपरोक्त श्लोक पहा.) त्या उल्लेखित बाजाराची स्थाननिश्चिती व्हायला हवी. रायगडाच्या टकमक टोकावरुन गुन्हेगारांवर कडेलोटाच्या शिक्षेची अंमलबजावणी होत असे. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अशा शिक्षेची अंमलबजावणी झाल्याची नोंद नाही. संभाजीराजांनी मात्र आपल्याविरुद्ध कटकारस्थान केल्याच्या संशयावरुन रागाच्या भरात  काहींचा टकमकटोकावरुन कडेलोट करत त्यांच्या देहाच्या चिंधड्या उडवल्या. रायगडावर हत्तीतलावाजवळ एक लोखंडी खांब आहे. कोणी त्यास मल्लखांब म्हणत, कोणी 'संभाजीराजांचा मल्लखांब' म्हणूनही त्यास प्रसिद्ध केला, जे चुकीचे आहे. मल्लखांब लोखंडी नसतो तसेच मल्लखांब विद्येचा शोध १९व्या शतकातला आहे (दुर्ग. रा. पृ. ७१-७२ ). मग हा लोहस्तंभ म्हणजे वेळ ठरवण्यासाठी बांधलेली सूर्यघंटी म्हणून किंवा ध्वजस्तंभ म्हणून किंवा चाबकाच्या फटक्यांची शिक्षा झालेल्यांना बांधण्यासाठी म्हणून वापरत असावेत, असे विविध तर्क मांडले जातात. या स्तंभावर देवनागरीत काही लेखही कोरला आहे; पण तो अस्पष्ट आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगड मध्ये आदरणीय प्र. के. घाणेकर यांनी त्या लेखाचे त्यांना तसेच कै. गो. नी. दांडेकर यांनही उमजलेले वाचन पृ. क्र. ७१ वर दिले आहे.

अॅम्सटरडॅम येथील रिक्स म्युझियममध्ये एका ‘दख्खनी राजा’चे चित्र आहे. चित्राच्या पाठीमागे डच भाषेत मजकूर असून, त्याचे स्पेलिंग कळत नसल्याने चित्र कोणाचे आहे, हे ठरविणे कठीण जाते. तरी त्याचा अर्थ ‘शंभूजी हिंदुस्थानच्या राजाचे चित्र पाहतो.’ असा असावा, असे वाटते. हा हिंदुस्थानचा राजा म्हणजे औरंगजेबाचा मुलगा अकबर असावा. त्याचप्रमाणे चित्राच्या पार्श्वभुमीवर दिसणारे विश्रांतीस्थान रायगडचे मनोरे आणि गंगासागर तलाव यामधील परिसर असावा ( छ. सं. स्मा. ग्रं. पृ. ३६६,४९३ ). या चित्राचा व त्याबद्दलच्या स्थळकाळाचाही अधिक अभ्यास व्हायला हवा.

शंभूराजांची कारकिर्द वादळी होती. महाराष्ट्राचे दुर्दैव असे, की पारतंत्र्याच्या फेऱ्यात या वादळाच्या खुणा पुसल्याशा जाऊन फिकट झाल्या; महाराष्ट्राला गरज आहे, ती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत या खुणा धुंडाळणाऱ्या भटक्यांची..जे हाती लागेल, त्यास उजाळा देणाऱ्या अभ्यासकांची..ज्यावर प्रकाश पडतोय, त्याचे गुण गाणाऱ्या लेखकांची, कलाकारांची अन् शाहीरांची……. !!

- ©डॉ. सागर पाध्ये.

सदर लेख 'बा रायगडवारी' या दुर्गअंकात प्रसिद्ध झाला आहे.

(सदर लेखाचे हक्क लेखकाकडे राखीव असून,लेखकाच्या नावाशिवाय लेख अन्यत्र प्रसारीत केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

संदर्भ :
( लेखात जे संदर्भग्रंथांचे संक्षेप वापरले आहेत, ते इथेच संबंधित संदर्भग्रंथाच्या नावापुढे कंसात दिले आहेत; यादी अकारविल्हे)
संदर्भ –
१. किल्ले रायगड स्थळदर्शन (किल्ले रा. स्थ. ) – आप्पा परब
२. खरे जंत्री अथवा शिवकालीन संपूर्ण शकावली – गणेश सखाराम खरे.
३. दुर्गदुर्गेश्वर रायगड ( दुर्ग. रा. ) – प्र.के. घाणेकर.
४. छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे ( छ. सं. प.) - संपादक, डॉ. सदाशिव शिवदे.
५. छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ - संपादक, डॉ. जयसिंगराव पवार.
६. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा ( ज. सं.) - डॉ.सदाशिव शिवदे.
७. बुधभूषणम् – छत्रपती संभाजी महाराज ( संपादक - एच्. डी. वेलणकर ),
( लेखातील श्लोकांचा मराठी अनुवाद- श्री. सुधांशू कविमंडन )
८. मराठी रियासत (खंड २ उग्रप्रकृती संभाजी,स्थिरबुद्धी राजाराम) - गो. स. सरदेसाई.
९. रायगडची जीवनगाथा ( रा. जी. ) – शां. वि. आवळसकर.
१०. रायगड दर्शन – दुर्मिळ पुस्तकांतून ( राय. द. दु. पु. ) – संपादक, प्र. के. घाणेकर.
११. शिवचरित्रप्रदीप ( शिव. प्र. ) – संपादक - द. वि. आपटे, स. म. दिवेकर.
१२. शिवपुत्र संभाजी ( शि. सं. )  - डॉ. कमल गोखले.
१३. English records on Shivaji ( E. R. S. ) – Shiv Charitra Karyalaya, Pune.
१४. House of Shivaji – Sir Jadunath Sarkar.
१५. Portuguese-Mahratta relations ( P. M. R. ) - Dr. P.S.Pissurlencar,translated by T.V. Parvate.

Comments

  1. अप्रतिम लेख.पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो.

    ReplyDelete
  2. ​खूप छान लेख, खरंच संभाजी राजांविषयी अभ्यास व्हावयास हवा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज