Skip to main content

पत्ररूप शंभूदर्शन

छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी नऊ वर्षांची.. तीसुद्धा सतत युद्धमान; याकाळातले 'शंभूछत्रपती' खरोखरच जाणून घ्यायचे, तर त्यांची उपलब्ध पत्रे वाचण्याखेरीज पर्याय नाही. पुढील दोन पत्रे पाहिली; म्हणजे शंभूराजे युद्धाच्या काळातही प्रजाहित व धर्माबाबत कसे सदैव तत्पर होते. हे लक्षात येते.

१.
बापोली आणि सिडकोली या गावांना सिद्दी आणि पोर्तुगीजांनी उपद्रव दिला. रयत परगंदा होत आहे. तेव्हा त्याची चौकशी करावी. तसेच दादाजी कुलकर्णी यांचा शेतीचा भाग कारळे येथे होता. तो प्रजाभाग म्हणून खर्च केला म्हणून त्याने तक्रार केली. तेव्हा राजभाग वजा करुन उरलेला भाग त्यास परत द्यावा अशा राजाज्ञेचे पत्र आहे.

श.१६०५ माघ वद्य १४
इ. स. १६८४ फेब्रु. ५

                                श्री
  स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १० रुधिरोद्रारी नाम संवत्सरे माघ बहुल चतुर्दसी भोमवासरे राजश्री चिमणाजी आऊजी यांसि राजाज्ञा ऐसीजे कुदे बापोली हे दोन्हीं गाव व तिसरे मौजे सिडकोली मा। चेऊल तीन्ही गाव गनीम हबसी व फिरंगी यानी मारुन नेलें तेसमई रयेतीचा गळा कुळ लुटून नेळा याकरिता रयेती दिलगीर होऊन परागंदा होऊ पाहते तरी रयेतीस काही मज [कागद फाटला आहे] [म्हणोन] चेऊलच्या हवालदारे हुजूर लि। होतें त्यावरुन तुम्हांस लिहिळे असे तरी तुम्हीं चौकसी करुन मनास आणणें आणि हुजूर लिहिणे तुम्ही ल्याहाल तेणेप्रमाणे त्याची विल्हे होईळ व दादाजी कुलकर्णी याचे सेतीचा गळा मौजे कारळे येथें होता तो दिवाणांत साराच राजभाग प्रजाभाग कुल घेऊन खर्च केला म्हणोन दादाजीने सांगितले तरी जो गला आणिला असेली तो मनास आणणे आणि राजभाग वजा देऊन उरला प्रजाभाग जितका गला होईल तितका दादाजीस परतोन देणे. छ. २८सफर ['मर्या । देवं वि । राजते' असा चौकोनी मोर्तब ]

[ पत्रामागे ] सुरु सुद
संदर्भ- छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे - डॉ. सदाशिव शिवदे, पत्र क्र. ४०

२.
सुलतानतारा या सरदाराने मोगली लष्करासमवेत नवलगुंद या गावामध्ये लूट केली व तेथील प्रजेची वाताहात केली. तेथील देवळे नष्ट केली. नवलगुंदच्या आधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी संभाजीराजांना विनंती केली, की आपण आमच्या येथे देवस्थान उभारून त्याचे श्रेय आपण घेणे. त्या विनंतीनुसार संभाजीराजांनी तेथील देवस्थानास ३६ बिघे जमिनीचा दुमाला करून दिला.


या सनदेत छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, "ग्रामदेवस्थानाच्या दिवसापासून पांढरी बसली. त्या दिवसाच्या स्थापनेच्या पुरातन स्थळेस मुर्ती होत्या. त्या दुरात्म्यांनी विछिन्न केल्या. त्यांची स्थापना झाली पाहिजे. महाराज राजश्री महाराष्ट्र राजा आहे. देवस्थाने छिन्नभिन्न असो नये. या कारणे देवालये बांधावी. उरजा चालवावी. हयात आपण व स्वामी मिळोन जे करणें ते करीत आहोत.

संदर्भ - १. मुळ संपूर्ण पत्र - सनदापत्रांतील माहिती - संपादक गणेश चिमणाजी वाड, प्रकरण ५, ले. ५
२. संभाजीकालीन पत्रसारसंग्रह ले. १५८
दुय्यम संदर्भ - ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे, पृ. क्र. ३८५.

डॉ. सागर पाध्ये.

पत्रातील कठीण शब्दांचे अर्थ -
१.कसबे - गाव (हरहुन्नरी माणसं असलेले)
२. कसबे मजकुरी - उपरोल्लेखित (यापूर्वी ज्याचे नाव घेतले असे गाव )
३.तलफ - नाश
४.मरग - महामारी, मृत्यूची साथ
५. हुगी घालणे - (वाक्प्रचार) अभय देणे
६. अजरामहामत - कृपेने
७. दुमाला करणे - इनामाचा प्रकार; हवाली करणे, पाठपुरावा करणे इ. अर्थाने

Comments

Popular posts from this blog

शिवचरित्र कोणते वाचावे ?

"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे. १. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा ! २. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल. ३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचा

शिवचरित्र आणि आपण

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती !  श्रीशालिवाहननृप शके १५५१,शुक्लनाम संवत्सरे,फाल्गुन वद्य तृतीया,अर्थात ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, हृदयस्थ नारायणाने प्रेरणा केली आणि तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" महाराष्ट्राच्या कणाकणांत स्वाभिमानाचा वन्ही चेतवला; त्याचे स्फुल्लिंग आजही आमच्या हृदयात धगधगत आहेत. शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.   शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?   खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्या

विजयुदुर्गावरील पराजय : मराठा राजकारणाची शोकांतिका

रा. रा. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आपल्या लिखाणातून मराठेशाहीच्या विविध अंगावर अनेकदा टिका केली आहे. गो. स. सरदेसाईलिखित 'नानासाहेब पेशवे' चरित्राची प्रस्तावना शेजवलकरांनी लिहिली आहे. आपल्या धारदार लेखणीने शेजवलकरांनी पेशव्यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत, पण काही शब्दांत मराठेशाहीचे दुर्गुण विषद करताना ते म्हणतात, "...प्रत्येक सरदार मुलुखगिरीवर निघण्याच्या आधीच जिंकावयाच्या मुलुखाची सनद छत्रपतींकडून करून घेई. छत्रपतींच्या दरबारचे प्रधान हे निदान इतका तरी मान ठेवतात, असेच समजत. शाहूच्या आगमनाने या प्रकारांत वाढच झाली. पेशव्यांनी जुन्या शिरजोर सरदारांस मोडण्याचा प्रयत्न केला, पण असे करण्यासाठी त्यांस नवीन स्वतःचे सरदार निर्माण करावे लागले. तात्पर्य काय, एकसुत्रीपणास बाध यावयाचा तो आलाच. नानासाहेबास जयाप्पा शिदेंसारख्या सरदारांस जे चुचकारावे लागे व मल्हाररावाच्या मनस्वीपणापुढे मान वाकविण्याची पाळी येई, ते यामुळेच ! मात्र असे पेशवे न करते तर मराठ्यांचे जे नाव गाजले तेहि गाजले नसतें..." (प्रस्तावना - पृ. क्र. १४) १२ फेब्रुवारी १७५६ रोजी नानासाहेब पेशवे व इंग्रज